Chaturmas 2024: धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाआधी संपवून टाका घरातील कांदा लसूण; वाचा फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:18 AM2024-07-10T11:18:31+5:302024-07-10T11:19:43+5:30
Chaturmas 2024: १७ जुलै पासून चातुर्मास सुरु होत आहे, या चार महिन्यात सात्विक जीवनशैली स्वीकारल्यामुळे होणारे असंख्य लाभ जाणून घ्या!
सत्व म्हणजे सात्विक भाव, रज म्हणजे राजस भाव आणि तम म्हणजे तामस भाव! आपला देह या त्रिगुणांनी भरलेला आहे. मात्र ज्यांचे सत्व जागे असते तेच रज आणि तम गुणांवर अंकुश घालू शकतात. रजोगुण अधिक असेल तर संसार आसक्ती कमी होणार नाही आणि तमोगुण अधिक असेल तर आपला आपल्या भावभावनांवर विशेषतः क्रोधावर नियंत्रण राहणार नाही. म्हणूनच आपला सत्व गुण अधिक कार्यक्षम करण्यासाठी धर्मशास्त्राने दिलेले पथ्य पाळयला हवे. त्यामागचे कारणही जाणून घेऊ.
पलाण्डुभक्षणं पुनरुपनयम् ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते. म्हणजे कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे धर्मशास्त्र सांगते. यातच धर्मशास्त्राने कांदा सेवनाला केलेला निषेध लक्षात येतो.
वास्तविक जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद निषिद्ध आहेत. पण हिंदू धर्मात विशेषकरून कांदा व लसूण हे सर्वथैव त्याज्य मानलेआहेत. खाद्यपदार्थांची हिंसात्मक व निषेधात्मक प्रतवारी काढल्यास पाणी हे कमीतकमी म्हणजे दहा बारा टक्के निषिद्ध असते. ताजी फळे वीस पंचवीस टक्के निषिद्ध असतात. हविष्यान्नाचे पदार्थ म्हणजे दूधाचे पदार्थ त्याहून अधिक म्हणजे तीस ते पस्तीस टक्के निषिद्ध. नेहमीचे शाकाहारी पदार्थ चाळीस ते पंचेचाळीस टक्के निषिद्ध. कंदहार साठ टक्क्यांपर्यंत, कांदा लसूण ऐंशी टक्यांपर्यंत, अंडी नव्वद टक्क्यांपर्यंत, तर मांस-मासे-मद्य शंभर टक्के निषिद्ध मानले जातात.
हिंदू धर्मात ऐंशी टक्क्याच्या आत असलेल्या पदार्थांच्या सेवनाला परवानगी आहे. म्हणून कांदा, लसूण वर्ज्य मानले आहे. कांद्याचे शास्त्रीय व मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रयोग झाले आहेत.
कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा आहे. म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन म्हटले आहे. कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात. कांदा खाल्यावर काही वेळाने वीर्याची घनता कमी होते व गतीमानता वाढते. परिणामी विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णसारखे उदरविकार संभवतात. इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे. हृदयरोग असल्यास लसूण उपकारक ठरतो.
त्याचप्रमाणे कांदा हा उष्णताहारक असल्यामुळे अंगात ज्वराधिक्य झाल्यास पोटावर, मस्तकावर कांद्याचा खिस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात. पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात, त्याचा सर्रास चवीसाठी वापर केल्यास ते प्रकृतीस व संस्कारास निश्चित हानीकारक ठरू शकते.
धार्मिक कार्यात, देवाला नैवेद्य दाखवताना कांदा, लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत. ते पावित्र्य जपले जाते.
सद्यस्थितीत आपण कांदा, लसूण यांच्या एवढे आहारी गेलो आहोत, की त्यांच्याशिवाय स्वयंपाकघराचे पान हलत नाही. म्हणून त्यांचा वापर पूर्णपणे बंद करता आला नाही, तर निदान कमी करता येईल. तसेच उपवासाच्या दिवशी, सकाळच्या जेवणात त्यांचा वापर निश्चितपणे टाळता येईल. आणि ज्यांना हे व्रत अंगिकारायचे असेल त्यांनी १७ जुलैपासून अर्थात आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशीपर्यंत हे व्रत पाळावे असे शास्त्र सांगते!