Chaturmas 2024: चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:37 IST2024-07-17T16:37:28+5:302024-07-17T16:37:41+5:30
Chaturmas 2024: आजपासून सुरु झालेल्या चातुर्मासात आपण रोज एका अभंगाची उजळणी करूया आणि भक्तिमय होऊया.

Chaturmas 2024: चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण!
आज आषाढी एकादशी; आजपासून सुरु झालेला चातुर्मास कार्तिकी एकादशीला समाप्त होईल. या चार महिन्यात आपल्याकडून भजन श्रवण, पठण, गायन व्हावे या हेतून संतांच्या अभंगांची उजळणी करूया आणि त्याचा भावार्थ जाणून घेत चातुर्मास भक्तिमय करूया!
आज पहिला अभंग घेतला आहे तो संत शिरोमणी तुकोबा रायांचा! हाच अभंग पहिल्यांदा निवडण्याचे कारण म्हणजे, गेले कित्येक महिने पायी वारी करून, शरीराला, मनाला ताण देऊन विठोबाच्या राउळी पोहोचलेल्या वारकऱ्यांची भावावस्था तुकोबा रायांनी अचूक टिपली आहे. ते लिहितात...
आतां कोठें धांवे मन ।
तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला ।
अवघा जाला आनंद ॥२॥
प्रेमरसें बैसली मिठी ।
आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका ह्मणे आह्मां जोगें ।
विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥
अलीकडे वारीत कोणीही सहभागी होतात. जणू काही त्याचा इव्हेन्ट झाला आहे. वारीत सहभागी झाल्याची खूण म्हणून फोटो काढून सोशल मीडियावर लाईक घेण्याची चढाओढ सुरु आहे. मात्र त्यात आत्मानंद हरवत चालला आहे. या अभंगात महाराजांनी वर्णन केलेली वारकऱ्यांची भावावस्था अतिशय सात्विक आहे. त्यांनी वर्णन केलेला क्षीण हा केवळ वारीतल्या प्रवासाचा नाही तर संसार तापाचा आहे. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांसह सांभाळून घेणारा विठोबा पाहिला की निश्चिन्त झालेला वारकरी यात सापडतो. जो खरोखरच भाविक आहे, देवभोळा नाही!
दुसऱ्या कडव्यात मारलेली मिठी ही उराउरी दिलेली नाही, तर ही जिवाशिवाची भेट आहे. जी स्पर्श विरहित आहे. जी आत्मसुख देणारी आहे. देवाने रागाने कितीही दूर लोटले तरी त्याच्यावरचे प्रेम तसूभरही कमी होणारे नाही, याची ग्वाही तुकोबा देतात.
आमचं पूर्ण विश्व हेच पांडुरंग आहे. आमचं अस्तित्त्व आम्ही त्याच्या ठायी पाहतो. ही समरसता मोजायची असेल तर विठ्ठल नामाची व्याप्ती शोधावी लागेल, त्या नामात आम्ही सामावून गेलो आहोत. भक्त कोण आणि भगवंत कोण हा विसर आम्हाला पडलेला आहे. अशा स्थितीत तुम्हीच सांगा... 'आता कोठे धावे मन?'