चातुर्मासातील पहिला प्रदोष: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, ‘हे’ मंत्र म्हणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:43 AM2024-07-18T10:43:26+5:302024-07-18T10:44:33+5:30
Pradosh Vrat Puja in Marathi: चातुर्मासातील पहिल्या प्रदोष व्रताचे सोप्या पद्धतीने पूजन कसे करावे? पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग अन् महात्म्य...
Pradosh Vrat Puja in Marathi: देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. मराठी वर्षांत चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या काळात महादेव सृष्टीचे चालन पालन करतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे या काळात महादेवांचे पूजन, उपासना, नामस्मरण याला अधिक महत्त्व असल्याचे सांगिततले जाते. चातुर्मासातील श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यातील विविध सण-उत्सव, व्रते यांना केवळ धार्मिक, सांस्कृतिकच नाही, तर नैसर्गिक महत्त्वही अनन्य साधारण आहे. चातुर्मास काळातील पहिले प्रदोष व्रत १९ जुलै रोजी असून, शुभ मुहूर्त अन् मान्यता जाणून घ्या...
प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते. शुक्रवारी प्रदोष तिथी असेल, तर त्याला शुक्र प्रदोष म्हटले जाते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील शुक्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते. प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. शत्रूंपासून बचाव होऊ शकतो. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.
प्रदोष व्रताचे महत्त्व अन् मान्यता
प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते. शुक्रवारी प्रदोष आल्यामुळे या दिवशी शंकरासह पार्वती देवीचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. काही पौराणिक उल्लेखानुसार, प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
शुक्र प्रदोष व्रत: १९ जुलै २०२४
प्रदोष तिथी प्रारंभ: १८ जुलै २०२४ रोजी रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे.
प्रदोष तिथी समाप्ती: १९ जुलै २०२४ रोजी रात्रौ ७ वाजून ४२ मिनिटे.
प्रदोष व्रत पूजनाचा शुभ मुहूर्त: १९ जुलै रोजी रात्रौ ०७ वाजून १८ मिनिटे ते रात्रौ ९ वाजून २२ मिनिटे.
प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवेलागणीला केले जात असल्यामुळे १९ जुलै रोजी हे व्रताचरण करावे, असे सांगितले जाते. या दिवशी अनेक शुभ संयोग जुळून येत आहेत. शुक्र प्रदोष तिथीला रवियोग, ऐंद्र योग, लक्ष्मी नारायण योग असे शुभ योग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये शंकर आणि पार्वतीचे पूजन करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे.
कसे करावे प्रदोष व्रतपूजन? सोपी पद्धत पाहा
प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. तसेच यासह 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते.