Chaturmas 2024: आषाढीपासून विष्णुंची योगनिद्रा असेल ११९ दिवसांची; त्यानंतरच सुरू होतील मंगलकार्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:31 PM2024-07-16T16:31:35+5:302024-07-16T16:31:58+5:30

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात, परंतु या चातुर्मासाच्या कालावधीत देव खरोखरंच झोपतात का? वाचा.

Chaturmas 2024: Vishnu's yoga sleep will be 119 days from Ashadhi; Then the blessings will begin! | Chaturmas 2024: आषाढीपासून विष्णुंची योगनिद्रा असेल ११९ दिवसांची; त्यानंतरच सुरू होतील मंगलकार्य!

Chaturmas 2024: आषाढीपासून विष्णुंची योगनिद्रा असेल ११९ दिवसांची; त्यानंतरच सुरू होतील मंगलकार्य!

आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी असे म्हणतो व कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतो. याचाच अर्थ चार महिने देव झोपतात असे आपण म्हणतो. यंदा १७ जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. देवाच्या झोपेचे चार महिने आपण मंगलकार्य वगळता सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करतो. तो काळ चतुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिक मासात देव उठले की नंतर मंगलकार्याला सुरुवात होते.

आपल्या सनातन धर्माने अत्यंत विचारपूर्वक देश-काल-स्थिती सांभाळून या गोष्टींची आखणी केली आहे व त्याचा संबंध धर्म तसेच ईश्वराशी जोडला आहे. धर्म व्यवस्था ही आपल्या सुरक्षिततेसाठी, विकासासाठी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली रचना असते. त्यानुसार नियमांचे पालन करून आपले आयुष्य सुकर व्हावे, एवढाच त्यामागील हेतू असतो. 

एखादी गोष्ट सहज सांगितली तर त्याकडे दुर्लक्ष करणे, हा मनुष्यस्वभाव असतो. परंतु त्याला धाकदपटशा लगेच कळतो. शिक्षा होईल या भितीने नियमांचे पालन करतो. हा मनुष्यस्वभाव ओळखून सनातन धर्माने प्रत्येक गोष्टीची सांगड देव-धर्माशी लावून दिली आहे. समाजाने नियमांचे पालन करावे यासाठी 'धाक', `लोभ' नाहीतर `प्रेम' यापैकी एक मार्ग अनुसरावा लागतो. सद्यस्थितीत देवाबद्दल प्रेम पहायला मिळणे दुर्लभ झाले आहे. मग मार्ग राहतो धाकाचा नाहीतर लोभाचा! म्हणून तोच मार्ग अनुसरून `देवशयनी एकादशी'चे आयोजन धर्मशास्त्राने केले आहे. 

आषाढात पावसाचे आगमन होते. पृथ्वी हरीत होते. सृजनतेचा सोहळा रंगतो. धान्य रुजते. पिक फोफावते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते त्यामुळे या चार महिन्यात मनुष्याला आपली उणीव भासणार नाही, अशी देवानेच व्यवस्था लावून दिलेली असते. अशी व्यवस्था लावून देत पुढील चार महिने सृष्टीचा कारभार तू आपल्या हाती घे आणि नवनिर्मितीचा आनंद घे असे म्हणत परमेश्वर मनुष्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकतो. काही अडीअडचण आली तर तो आहेच, परंतु त्याच्या अनुपस्थितीत आपण प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडू शकू हा त्याला विश्वासही आहे. तो विश्वास सार्थ ठरवून भक्ताने चातुर्मासात देवाला स्मरून प्रत्येक कार्य करावे आणि देवाला समर्पित करावे. 

अशा काळात मनुष्य जर मंगल कार्यात अडकून राहिला, तर जबाबदारी पूर्ण करणार कधी? तसेच या काळात निसरडे रस्ते, धुसर वातावरण, वादळी वारा यात अपघात होऊ नये आणि मंगलकार्यात विरझण पडू नये, म्हणूनही मंगलकार्य टाळले आहे. 

ही दूरदृष्टी पाहिल्यावर आपल्याला आपल्या पूर्वजांचा, संस्कृतीचा आणि धर्माचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही. देवशयनी एकादशीच्या निमित्ताने आपण आपली जबाबदारी ओळखून परमेश्वर आणि परिस्थितीवर अवलंबून न राहता कर्मावर भर दिला पाहिजे, हाच या उत्सवाचा हेतू आहे. 

Web Title: Chaturmas 2024: Vishnu's yoga sleep will be 119 days from Ashadhi; Then the blessings will begin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.