चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण, पाहा, महत्त्व अन् चंद्रोदय वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 07:07 AM2023-07-05T07:07:07+5:302023-07-05T07:10:02+5:30
Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2023: चातुर्मासातील संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. या दिवशी गणपती बाप्पाचे व्रताचरण कसे करावे? चंद्रोदय वेळा जाणून घ्या...
Ashadhi Sankashti Chaturthi 2023: मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा आणि अनेक वैविध्य तसेच वैशिष्ट्यांनी भारलेला चातुर्मास सुरू झाला आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासात अनेकविध प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. तसे पाहिल्यास वर्षभरात अनेक व्रते, सण-उत्सव साजरे केले जातात. वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रतांची आणि सण-उत्सवांचे महत्त्व वेगळे आहे. यातील वर्षभर साजरे केले जाणारे एक महत्त्वाचे व्रत म्हणजे प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाणारी संकष्टी चतुर्थी. मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या दोन्ही चतुर्थी भाविक मनोभावे साजऱ्या करतात. पैकी वद्य पक्षातील संकष्ट चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला करावयाचे व्रताचरण आणि काही प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घेऊया... (Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2023)
सन २०२३ चे विशेष म्हणजे यावर्षी श्रावण मास अधिक असल्यामुळे वर्षभरात १३ संकष्ट चतुर्थी करण्याचे पुण्य भाविकांना मिळणार आहे. संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो. कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय आहेत. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर एकवेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा. (Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2023 Date And Time)
आषाढ संकष्ट चतुर्थी: गुरुवार, ०६ जुलै २०२३
आषाढ वद्य चतुर्थी प्रारंभ: गुरुवार, ०६ जुलै २०२३ रोजी सकाळी ०६ वाजून ३० मिनिटे.
आषाढ वद्य चतुर्थी समाप्ती: गुरुवार, ०६ जुलै २०२३ रोजी मध्यरात्री ०३ वाजून १२ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन गुरुवार, ०६ जुलै २०२३ रोजी करावे, असे सांगितले जाते. (Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2023 Vrat Puja Vidhi)
गणपती बाप्पाच्या व्रत पूजनाची सोपी पद्धत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2023 Chandrodaya Timing)
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ १० वाजून १४ मिनिटे |
ठाणे | रात्रौ १० वाजून १४ मिनिटे |
पुणे | रात्रौ १० वाजून १० मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ १० वाजून १० मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ १० वाजून ०६ मिनिटे |
सातारा | रात्रौ १० वाजून ०८ मिनिटे |
नाशिक | रात्रौ १० वाजून १२ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ १० वाजून ०७ मिनिटे |
धुळे | रात्रौ १० वाजून ०९ मिनिटे |
जळगाव | रात्रौ १० वाजून ०६ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून ५४ मिनिटे |
बीड | रात्रौ १० वाजून ०२ मिनिटे |
सांगली | रात्रौ १० वाजून ०५ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ १० वाजून ०६ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ १० वाजून ०० मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०९ वाजून ५७ मिनिटे |
अकोला | रात्रौ १० वाजून ०० मिनिटे |
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) | रात्रौ १० वाजून ०५ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ १० वाजता ०५ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून ५८ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे |
धाराशीव | रात्रौ १० वाजून ०० मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ १० वाजून ०३ मिनिटे |
मालवण | रात्रौ १० वाजून ०८ मिनिटे |
पणजी | रात्रौ १० वाजून ०६ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ १० वाजून ०४ मिनिटे |
इंदौर | रात्रौ १० वाजून ०७ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ १० वाजून ०२ मिनिटे |