चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण : आरंभी वंदीन अयोध्येचा राजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 04:43 PM2024-07-18T16:43:42+5:302024-07-18T16:43:47+5:30
चातुर्मासानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमात आपण संतांनी लिहिलेल्या अभंगांचे चिंतन करत आहोत.
समर्थ रामदास स्वामींचा हा अभंग आहे. समर्थांची भाषा तशी परखड, वास्तवाचे वर्णन करणारी आणि समाज प्रबोधनासाठी प्रसंगी खडे बोल सुनावणारी! मात्र जिथे विषय येतो राम भक्तीचा, तिथे हेच समर्थ लोण्याहून मऊ शब्दात रामरायाचे गुणगान गातात. अशीच ही सुंदर रचना जी वाचता क्षणी पं. भीमसेन जोशी यांचे शब्द कानी घुमायला लागतात-
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ।
भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥
पावतसे महासंकटीं निर्वाणीं ।
रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥
उच्चारितां राम होय पापक्षय ।
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥
पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे ।
पापीया नाठवे कांहिं केल्यां ॥४॥
कांहिं केल्यां तुझें मन पालटेना ।
दास ह्मणे जन सावधान ॥५॥
मंगल कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतो, पण रामभक्तीत आकंठ बुडालेले समर्थ या कवनात म्हणतात अयोध्येचा राजा रामचंद्र याला वंदन करेन. याचा अर्थ त्यांचा गणेश भक्तीला विरोध होता का? तर अजिबात नाही! समर्थांनी गणेशाचेही कवन लिहिले आहे. परंतु तो काळच असा होता, की लोक आपले स्वत्व गमावून बसले होते. स्वधर्म, स्वाभिमान, स्वदेश याची कोणालाही आत्मीयता राहिली नव्हती. अशा वेळी जनतेसमोर आदर्श राजा कोण हे सोदाहरण पटवून देण्यासाठी समर्थांनी रामाचा आदर्श ठेवला. तोही सीतापती राम किंवा वनवासी राम नाही, तर रघुकुलाचा राजाराम!
श्रीरामाची थोरवी वर्णन करताना ते दुसऱ्या ओळीत म्हणतात, भक्तांच्या हाकेला तो धावून येणारा आहे. संकटात खंबीरपणे कस उभं राहावं हे त्याच्याकडून शिकावं. म्हणून संकटकाळी देखील त्याचं स्मरण करावं. राम नामाने दगड तरून गेले तर आपणही संकटातून सहज तरून जाऊ असा विश्वास ते दुसऱ्या कडव्यात देतात.
तिसऱ्या कडव्यात समर्थांनी खोचक टोला मारला आहे, ते म्हणतात राम नामाने तरून जालही! पण ते घ्यायचं हे त्याक्षणी आठवलं तर पाहिजे ना. पापी माणसांना तेही भान उरत नाही. मात्र पुण्यवान माणूस सजग असतो आणि तो रामाला आधी हाक मारतो. थोडक्यात रामभक्त व्हायचे तर नित्य स्मरण करा, तरच संकट काळी रामाचे स्मरण राहील, असे त्यांना सुचवायचे आहे.
रामाची एवढी थोरवी सांगूनही लोकांमध्ये सुधारणा नाही, हे पाहून समर्थ त्यांना सावधानतेचा इशारा देतात आणि म्हणतात वेळीच सावध झाला नाहीत तर नुकसान तुमचेच आहे. म्हणून आरंभी त्या रामाला वंदन करा असे ते सांगतात.
या अभंगाचे वैशिष्ट्य असे की यात प्रत्येक कडव्यातले शेवटचे चरण घेऊन पुढच्या कडव्याची सुरुवात केली आहे. साहित्याच्या दृष्टीनेही हे कवन सुंदर आणि अर्थपुर्ण आहे असे म्हणता येईल!