चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण : गुरु परमात्मा परेशु
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 04:47 PM2024-07-19T16:47:14+5:302024-07-19T16:47:33+5:30
चातुर्मासानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमात आपण संतांनी लिहिलेल्या अभंगांचे चिंतन करत आहोत.
२१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने चातुर्मासाच्या मुहूर्तावर सुरु केलेल्या या उपक्रमात आज आपण संत एकनाथांच्या अभंगाचे चिंतन करणार आहोत! हा अभंग आपण सुरेश वाडकर यांच्या सुस्वरात ऐकला आहे, त्याचे शब्द आणि भावार्थ जाणून घेऊ.
गुरु परमात्मा परेशु ।
ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला ।
स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनीं गुरुदेव ।
येथें नाहीं बा संशय ॥३॥
अवघ्या सहा ओळींचा हा अभंग, पण त्यात संत एकनाथांनी गुरु महिमा अतिशय चपखल पणे वर्णून सांगितला आहे. त्यांनी गुरूला परमात्मा परेशु म्हटले आहे. अर्थात देवांच्याही वरचे स्थान दिले आहे. कारण जर गुरु नसतील तर देवाची ओळख आपल्याला पटणार नाही. म्हणून देवाची भेट करून देणारे गुरु अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्यांची गुरूंवर अढळ श्रद्धा असते त्यांच्या बाबतीत काय घडते? तर ते पुढच्या कडव्यात सांगतात-
जे गुरुचे परम शिष्य असतात, गुरूंच्या आज्ञेत असतात, अशा शिष्याना देव देखील अंकित होतो. अर्थात त्यांच्या आज्ञेत राहतो. ते सांगतील तसं करतो. आणि यात तिळमात्र शंका नाही. माता पिता गुरु समजणाऱ्या पुंडलिकाचेच उदाहरण बघा ना, त्यांची सेवा करताना भेटीला आलेल्या पांडुरंगाला त्याने थांबवून ठेवलं आणि तो थांबला सुद्धा! हीच गुरुभक्ती!
जनार्दन स्वामींचा आठव करून नाथ महाराज शेवटच्या कडव्यात म्हणतात, जो गुरूला शरण जातो त्याला सर्वसुख प्राप्ती होते, यात शंका नाही. अर्थात हे त्यांचे स्वानुभवाचे बोल आहेत, म्हणून हा अभंग देखील तेवढाच प्रासादिक आहे.
अशी अनुभूती आपल्यालाही यावी असे वाटत असेल तर गुरूंना शरण जा, कारण तेच सर्व सुखाचे आगर आहेत!