Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 10:06 AM2024-11-07T10:06:14+5:302024-11-07T10:06:48+5:30
Chhath Puja 2024: यंदा ५ ते ८ नोव्हेंबर छठ पूजेचे व्रत केले जाईल, त्यात कार्तिक षष्ठीचा अर्थात ७ नोव्हेंबरचा दिवस महत्त्वाचा; वाचा या व्रताचे महत्त्व आणि पार्श्वभूमी!
महाराष्ट्रीय लोक संक्रांतीला जशी सूर्याची उपासना करतात, त्याप्रमाणे उत्तर भारतीय लोक छठ पूजेच्या निमित्ताने सूर्याची उपासना करतात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठीपासून अर्थात दिवाळीनंतर छठ पूजेची (Chhath Puja 2024)सुरुवात होते. या पूजेला छठ पूजा तसेच सूर्य षष्ठी पूजा असेही म्हणतात.यंदा ५ नोव्हेंबरपासून छठ पूजेला सुरुवात झाली असून ७ तारखेला सूर्याला अर्घ्य दिले जाणार आहे आणि ८ नोव्हेंबर रोजी व्रताची पूर्तता केली जाणार आहे. छठ पूजेचे व्रत अतिशय कठीण असते. हे व्रत करणारे भाविक ३६ तासांचा निर्जला उपास करतात.
छठ पूजा ही सूर्यदेवाची उपासना आहे. वेद पुराणातील माहितीनुसार छठ देवी, सूर्यदेवाची बहीण आहे. छठ पूजेच्या वेळी त्या दोहोंची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. छठ पूजा विशेषत: बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, नेपाळ या ठिकाणी केली जाते. या प्रदेशातील लोक विश्वभर पसरले असल्यामुळे त्यांच्याबरोबर छठ पूजेची परंपराही पसरली आहे. संतानप्राप्तीसाठी, पुण्यसंचयासाठी, सुख-समृद्धीसाठी आजही छठ पुजा भक्तीभावाने केली जाते.
छठ पूजेमागील पौराणिक कथा: (Mythological story behind Chhath Puja 2024)
असे म्हणतात, की छठ पूजेचा प्रारंभ सूर्यपुत्र कर्णाने केला. कर्ण हा दानशूर होताच, शिवाय तो सूर्यपुत्र असल्यामुळे जन्मत:च त्याला कवचकुंडले प्राप्त झाली होती. त्या कवचकुंडलाची शक्ती वाढावी, म्हणून कर्ण रोज सकाळी पाण्यात राहून सूर्यदेवाची उपासना करत आणि सूर्याला अर्घ्य देऊन मगच दिवसाची सुरुवात करत असत.
महाभारताच्या राजकारणात, द्युतात आपले सर्वकाही गमावल्यानंतर पांडवांना त्यांचे गतवैभव परत मिळावे, म्हणून द्रौपदीनेदेखील सूर्याची उपासना केली होती. सूर्य देवांच्या आशीर्वादाने तिची मनोकामना पूर्ण झाली.
राजा प्रियंवदाने पुत्रकामेष्टी केला होता. त्याच्या पत्नीला मूल झाले, परंतु ते जन्मत: मृत होते. राजा खूप उदास झाला. महत्प्रयासानंतर पुत्रप्राप्तीचा योग आला, तोही असा, या विचाराने तो आत्मसमर्पण करू लागला. त्यावेळेस देवसेना नामक देवी प्रगट झाली आणि तिने राजाला सूयोपासना करायला सांगितली. राजाने तसे केले. कालांतराने त्याच्या वंशात तेजस्वी बालक जन्माला आले.
पौराणिक कथेनुसार जरासंध राजाच्या पूर्वजांना कुष्ठ रोग झाला होता. तत्कालीन राजाची महारोगातून सुटका व्हावी, म्हणून धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्यत्वे सूर्यदेवाची पूजा केली होती. त्या पूजेचे फळ राजाला मिळाले आणि तो रोगमुक्त झाला. तेव्हापासून आजतागायत ही पूजा श्रद्धेने केली जाते.
छठ पुजेचे शास्त्रीय कारण: (Benefits of Chhath Puja 2024)
सर्व प्रकाराच्या रोगातून, तापातून मुक्तता व्हावी, हीदेखील या पूजेची शास्त्रीय बाजू आपल्याला मानता येईल. सूर्याची किरणे प्रखर असतात. त्यात अनेक जीवजंतूचा नायनाट करण्याची क्षमता असते. तसेच सकाळची कोवळी किरणे शरीराला पोषक असतात. म्हणून डॉक्टरदेखील डी व्हिटॅमिन मिळवण्यासाठी रोज सकाळी अर्धा तास सूर्यप्रकाशात चालण्याचा किंवा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. सूर्यप्रकाशाचे महत्त्व जाणून आपल्या संस्कृतीने सूर्योपासनेचे आणि सूर्यनमस्काराचे संस्कार घातले आहेत. दिवाळीचा कालावधी थंडीचा. अशात उबदार किरणांनी शरीराला हायसे वाटावे, सर्दी, ताप यांसारख्या किरकोळ आजारांपासून सुटका व्हावी, यादृष्टीनेही छठ पूजेचे महत्त्व लक्षात घेता येते.