Children's Day 2022: 'लहानपण देगा देवा' असे तुकाराम महाराज का म्हणतात? बालदिनानिमित्त जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 11:51 AM2022-11-14T11:51:40+5:302022-11-14T11:51:57+5:30

Children's Day 2022: असे बालपण एक दिवसापुरते नाही तर कायम स्वरूपी अंगीकारून घ्या, तुमचा निश्चितच उत्कर्ष होईल याची खात्री तुकोबा देतात!

Children's Day 2022: Why does Tukaram Maharaj say 'Lahanpan Dega Deva'? Let's find out on Children's Day! | Children's Day 2022: 'लहानपण देगा देवा' असे तुकाराम महाराज का म्हणतात? बालदिनानिमित्त जाणून घेऊ!

Children's Day 2022: 'लहानपण देगा देवा' असे तुकाराम महाराज का म्हणतात? बालदिनानिमित्त जाणून घेऊ!

googlenewsNext

आज बालदिनानिमित्त सोशल मीडिया बालपणीच्या फोटोंनी, आठवणींनी, गाण्यांनी भरून गेले आहे. हे बालपण हवेहवेसे का वाटते आणि ते का जपले पाहिजे? संतांच्या मनावरही बालपणीचे गारुड का होते, चला जाणून घेऊ!

लहानपण देगा देवा, 
मुंगी साखरेचा रवा।

तुकाराम महाराजांच्या या अभंगातल्या ओळी आपण अनेकदा वेगवेगळ्या आशयाने वापरतो. आज पूर्ण अभंगाचे रसग्रहण करू. तुकोबा राय लहानपण मागतात, का आणि कशासाठी? एक तर आयुष्याची नव्याने सुरुवातीपासून सुरुवात करता यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणी सगळे अपराध पोटात घातले जातात. लहान म्हणून प्रत्येक गोष्टीत मुभा मिळतो. सोबतच कानउघडणीदेखील केली जाते, मात्र त्यावेळी झालेल्या चुकांना अपराधाचे लेबल लावले जात नाहीत, तर मोठ्या मनाने क्षमा केली जाते. म्हणून वयाने, पदाने, परिस्थितीने कितीही मोठे झालात तरी मनाने, आचरणाने लहानच राहा असे तुकोबा रायांना सुचवायचे आहे. याचे उदाहरण देताना महाराज म्हणतात, एखाद्या घरात बलाढ्य हत्ती प्रवेश करू शकत नाही, पण छोटीशी मुंगी प्रवेश करते आणि साखरेची गोडीही विनासायास चाखते. तशी नम्रता बाळगायला शिका. 

ऐरावत रत्न थोर, 
त्यासी अंकुशाचा मार।

हत्ती दिसताच आपण कुतूहलाने बघायला जातो. त्याची ऐट पाहण्यासारखी असते. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर रोखलेल्या असतात. मात्र हा विशाल ऐरावत माहुताच्या अंकुशाखाली असतो. त्याची टोचणी त्याला सहन करावी लागते. याचाच अर्थ, मोठे पद, सत्ता यांची इच्छा धरताना त्याबरोबर येणारे आव्हान, जबाबदाऱ्या, टक्के टोणपे सहन करण्याची क्षमता ठेवावी लागते. ऐरावत होणे सोपे नाही, त्यापेक्षा मुंगी होऊन साखर खा असे तुकोबा आपल्याला सुचवतात. 

जया अंगी मोठेपण,
तया यातना कठीण।

बालपणी आपल्याला कधी एकदा मोठे होऊ असे वाटते तर मोठे झाल्यावर बालपण परत मिळावे असे वाटते. म्हणून वयाने मोठे झालो तरी मनातल्या मनात शक्य तेवढे बालपण जपण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण मोठे झाल्यावर अनेक यातना सहन कराव्या लागतात तेव्हा वाटते, बालपण होते तेच बरे होते. मात्र वय थांबत नाही की काळ थांबत नाही, यावर पर्याय हाच की मन लहान मुलांसारखे आनंदी ठेवा. सतत नाविन्याची ओढ ठेवा, नवे काही ना काही शिकत रहा. लहान मुले जशी राग झटकून पुन्हा खेळायला लागतात, एकत्र होतात, तसे आपापसातले हेवे दावे सोडून एकत्र या आणि आनंदाने जगा. 

तुका म्हणे बरवे जाण, 
व्हावे लहानाहुनी लहान। 

एवढे मोठे संत शिरोमणी तुकोबा राय सांगतात, व्हावे लहानाहूनि लहान. ज्याची शिकायची तयारी असते त्याची प्रगती कधीच खुंटत नाही. अध्यात्मातले अधिकारी पुरुष असूनही तुकोबांनी कायम अंगी नम्रता बाणली आणि कमी पण स्वतःकडे घेऊन चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. एकदा का दुसऱ्याला मोठेपण दिले की आपोआप कमीपणा नव्हे तर विनम्र भाव अंगात भिनतो. 

असे बालपण एक दिवसापुरते नाही तर कायम स्वरूपी अंगीकारून घ्या, तुमचा निश्चितच उत्कर्ष होईल याची खात्री तुकोबा देतात!

Web Title: Children's Day 2022: Why does Tukaram Maharaj say 'Lahanpan Dega Deva'? Let's find out on Children's Day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.