'जसा आहार तसा विचार', म्हणून गरुड पुराणात दिलेले नियम जरूर पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:00 AM2022-03-16T08:00:00+5:302022-03-16T08:00:02+5:30

परान्न खाताना विचारपूर्वक खा अन्यथा त्या अन्नाचा विपरीत परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. वाचा नियम!

Choose your food wisely, so be sure to follow the rules given in Garuda Purana! | 'जसा आहार तसा विचार', म्हणून गरुड पुराणात दिलेले नियम जरूर पाळा!

'जसा आहार तसा विचार', म्हणून गरुड पुराणात दिलेले नियम जरूर पाळा!

Next

पुरातन काळापासून परान्न अर्थात दुसऱ्याच्या घरचे जेवण हे निषिद्ध सांगितले आहे.  उठसुठ कोणाकडेही जेवू नये. ज्याठिकाणी जेवायला बोलवले जाते, तिथेही अन्नपरीक्षा घेतल्याशिवाय जेवू नये. असे काही नियम आपले पूर्वज कटाक्षाने पाळत असत. परंतु, अलीकडच्या काळात आपण मागचा पुढचा विचार न करता आवडती वस्तू दिसली की पटकन तोंडात टाकतो. त्याचे विपरीत परिणामही भोगावे लागतात. म्हणून स्व-गृहाव्यतिरिक्त बाहेर कोणाकडेही जेवताना किंवा खाताना गरुड पुराणात दिलेले नियम आपण पाळतोय ना, ते लक्षात घ्या. 

जसे अन्न खातो, तसे आपले विचार तयार होतात. म्हणून अन्न ग्रहण करताना काही नियम कटाक्षाने पाळायला हवेत. ते नियम पुढीलप्रमाणे आहेत-

>>एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नसेल आणि या गोष्टीची आपल्याला पूर्ण कल्पना असेल, तर त्या व्यक्तीच्या घरी कदापिही जेवू नका. तसे केल्याने तुम्हीदेखील अप्रत्यक्षपणे त्याच्या पापात सहभागी होतात. 

>>जे लोक दुसऱ्यांना लुबाडून धन संपत्ती कमावतात, अशा लोकांची संगत आणि सहभोजन टाळा. 

>>चारित्र्यहीन व्यक्ती, व्यसनी व्यक्ती, वाईट विचारधारणा असणारी व्यक्ती त्यांच्या वाऱ्यालाही थांबू नका. सहभोजन तर दूरच! वाईट लोकांच्या संगतीत येऊन आपणही वाईटच बनतो. 

>>आजारी व्यक्तीच्या घरी जेवू नका. आजारी व्यक्तीच्या घरी आजाराच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. 

>>जे लोक इतरांच्या चुगळ्या करतात, एकमेकांच्या मागे नावे ठेवतात, असे लोक विचाराने हीन दर्जाचे असतात. अशा लोकांची मानसिकता आपण सुधारू शकत नाही. मग त्यांनी शिजवलेले अन्न देखील नकोच!

>>शीघ्रकोपी लोकांकडे जेवण टाळा. त्यांना कोणत्या गोष्टीचा राग कधी येईल सांगता येत नाही. रागाच्या भरात ते तुम्हाला भरल्या ताटावरून उठवायलाही कमी करणार नाहीत. चार चौघात अपमानित करतील. म्हणून अशा लोकांबरोबर जेवणे नको!

>>ज्यांना दुसऱ्यांप्रती सहानुभूती नाही, दया नाही, क्षमा नाही, शांती नाही अशा लोकांचे वाईट विचार अन्नात समाविष्ट होतात आणि ते अन्न ग्रहण केल्याने आपलीही मानसिकता तशीच बनत जाते. 

>>व्यसनी लोकांबरोबर जेवणे टाळा. तुम्ही व्यसनी नसलात, तरीदेखील व्यसनी लोक तुम्हाला व्यसन लावायला मागे पुढे पाहणार नाहीत. उलट तसे करणे त्यांना आणखीनच गौरवाचे वाटते. म्हणून अशा लोकांबरोबर जेवण आणि मैत्री टाळा. 

 

Web Title: Choose your food wisely, so be sure to follow the rules given in Garuda Purana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.