Christmas Day 2022: सर्वांची इच्छापूर्ती करणारा नाताळ बाबा वास्तवातला की कल्पनेतला? वाचा त्याची उगम कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:34 PM2022-12-24T17:34:14+5:302022-12-24T17:35:02+5:30

Christmas Day 2022: अलीकडे नाताळ सण परदेशाइतकाच भारतातही उत्साहाने साजरा होतो, पण इच्छापूर्ती करणारा हा बाबा नक्की आला कुठून? सविस्तर वाचा.  

Christmas Day 2022: Santa Claus who fulfills everyone's wishes in reality or fantasy? Read its origin story! | Christmas Day 2022: सर्वांची इच्छापूर्ती करणारा नाताळ बाबा वास्तवातला की कल्पनेतला? वाचा त्याची उगम कथा!

Christmas Day 2022: सर्वांची इच्छापूर्ती करणारा नाताळ बाबा वास्तवातला की कल्पनेतला? वाचा त्याची उगम कथा!

googlenewsNext

>> सिद्धार्थ अकोलकर

ख्रिस्तमस किंवा नाताळ जवळ येऊ लागला की देश-विदेशातल्या बऱ्याचशा दुकानांमधून खास नाताळसाठी केलेली सजावट नजरेस पडू लागते. शहरांमधील व्यापारी संकुलं ग्राहकांना आणि त्यांच्या छोट्या मुलांना आकर्षित करून घेण्यासाठी मोठी रोषणाई करतात, नाताळची सजावट उभारतात. या सजावटींमध्ये हमखास दिसणारी एक आकृती असते. सामान्यतः गोंडस आणि आनंदी दिसणारा, पांढर्‍या दाढीचा एक माणूस त्या चित्रात दाखवलेला असतो. अनेकदा त्याच्या नाकावर चष्मा असतो, पांढरी फर कॉलर आणि त्याच रंगाचे कफ्स असलेला लाल कोट त्याने घातलेला असतो, डोक्यावर सफेद फर असलेली लाल गोंड्याची टोपी असते, कंबरेला काळ्या चामड्याचा जाडजूड पट्टा, पाठीवर भेटवस्तूंनी खच्चून भरलेली मोठी पिशवी आणि पायात उंच काळे गमबूट घातलेलं असं ते चित्र असतं. हाच तो नाताळ-बाबा अर्थात् सांता क्लॉज!

सांता क्लॉज हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ख्रिस्तमससाठीचं खास प्रतीक म्हणून ओळखलं जातं. जगाच्या ज्या ज्या भागात ख्रिश्चन धर्म पोचलेला आहे तिथे तिथे हा म्हातारबाबा प्रत्येक नाताळात दर्शन देत असतो. त्याला जगभरात फक्त ते एकच नाव नसून तो फादर ख्रिसमस, गिफ्ट-ब्रिंगर, सेंट निकोलस, क्रिस क्रिंगल, सेंट निक किंवा फक्त सांता म्हणूनही ओळखला जातो. तशी त्याला बाकीच्या भाषांमध्येही बरीच नावं आहेत आणि ती पुढे येतीलच. आपल्यासाठी हे पाश्चात्य ख्रिश्चन संस्कृतीतून उद्भवलेलं एक पौराणिक पात्र आहे. ख्रिसमसच्या काळात रात्री उशिरा तो मुलांसाठी भेटवस्तू आणतो, म्हणजे मुलांची तशी समजूत घालून दिलेली असते. मूल कशा प्रवृत्तीचं आहे, गुणी आहे की खोडकर, यावर सांता त्या मुलाला काय भेटवस्तू द्यायची, कुठली खेळणी किंवा कँडी द्यायची की फक्त काळा कोळसा द्यायचा की यापैकी काहीच द्यायचं नाही हे ठरवतो, असं मुलांना सांगितलं जातं.

हा सांता क्लॉज, ख्रिस्तमस दूत आणि वनदेवतांच्या सहाय्याने लहान मुलांना खुश करण्यासाठी कंबर कसून कामं करीत असतो, असा समज आहे. पौराणिक कथांनुसार हे सगळे सांताच्या मदतीसाठी तत्पर असणारे नाताळ दूत, सांताच्या उत्तर ध्रुवावरच्या कार्यशाळेत खेळणी तयार करतात आणि हवेमध्ये उडू शकणारे त्याचे रेनडियर्स त्याची बर्फावर चालणारी गाडी, म्हणजे स्लेज, भरभरून ती खेळणी जगभरातल्या मुलांना वाटतात - अशी सांताची गोष्ट ढोबळमानाने सर्वत्र सांगितली जाते. जगभरातील हजारो मुलं सांता क्लॉजला त्याच्या घरच्या पत्त्यावर पत्रं पाठवतात आणि नाताळच्या रात्री बर्फावरून घसरत आपल्या गाडीवरून तो मुलांना भेटण्यासाठी आणि भेटवस्तू देण्यासाठी येतो - ही कल्पना लहान मुलांच्या कथा, गाणी यांमधून सर्वत्र मांडलेली दिसते. आपल्या हातातील घंटा वाजवत, मेरी ख्रिस्तमस अशा नाताळच्या शुभेच्छा देत सांता क्लॉज येतो ही वास्तविक एक काल्पनिक धारणा आहे.

सांताचं हे आधुनिक पात्र म्हणजे सेंट निकोलस किंवा फादर ख्रिस्तमसची इंग्लिश आवृत्ती आणि सिंटरक्लास ही डच व्यक्तिरेखा असलेल्या लोककथा वा परंपरांवर आधारित आहे आणि सांता क्लॉज हा शब्दच मुळी सिंटरक्लास या डच शब्दाचं अपभ्रंशित रुपडं आहे.

सांताची निर्मिती ज्या व्यक्तिरेखेपासून तयार झाली ते सेंट निकोलस हे चौथ्या शतकातील एक ग्रीक ख्रिश्चन बिशप होते. मायरा (आताचं डेमरे) या रोमन साम्राज्यातील लिसिया प्रदेश (हल्लीचं टर्की) त्यांच्या हाताखाली होता. हे संत निकोलस गरीबांना उदारहस्ते भेटी देत असत. बाकीच्या सर्व ख्रिस्ती संतांप्रमाणेच ते सुद्धा लहानपणापासूनच अतिशय धार्मिक होते आणि त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे ख्रिस्ती धर्माला वाहून घेतलेलं होतं. महाद्वीपीय युरोपमध्ये म्हणजेच नेदरलँड्स, बेल्जियम, ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक आणि जर्मनीमध्ये सामान्यतः त्यांना कॅनोनिकल पोशाखधारी सफेद दाढी असलेले बिशप म्हणून चित्रित केलं जातं.

मध्ययुगीन काळात ६ डिसेंबर या निकोलसच्या नामदिनाच्या संध्याकाळी मुलांना त्यांची आठवण राहावी म्हणून भेटवस्तू दिल्या जात असत. सुधारणेच्या कालखंडामध्ये ही तारीख बदलून ती २४ आणि २५ डिसेंबरच्या आसपास आणली गेली. याच सुमारास अनेक देशांमध्ये संतांची पूजा करण्याला विरोध सुरू झाला आणि संतांच्या पूजांऐवजी मुलांची आवड ख्रिस्ताकडे केंद्रित व्हावी म्हणून ख्रिस्तमसच्या वेळी मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा मार्टिन ल्यूथरने सर्वप्रथम सादर केली. परंतु तरीही सेंट निकोलस हा लहानग्यांच्या भेटवस्तूंचा वाहक म्हणून लोकप्रिय होत गेलाच.

फादर ख्रिस्तमस हे पात्र सोळाव्या शतकातील इंग्लंडमध्ये आठव्या हेन्रीच्या कारकिर्दीत उदयास आलं. तेव्हा त्याला हिरव्या किंवा लाल रंगाची फर असलेल्या कपड्यांमध्ये, वयस्कर माणसाच्या रूपात, चित्रित करण्यात आलं होतं. त्याच्या आगमनाने ख्रिस्तमसच्या सणामध्ये आनंदाची भावना, शांतता, चांगलं अन्न आणि वाइन यांची भर टाकण्यास मदत झाली. इंग्लंडने नंतर सेंट निकोलसचा ६ डिसेंबर रोजीचा उत्सव रद्द करून त्या जागी फादर ख्रिस्तमसचा उत्सव ख्रिस्तमसच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी साजरा करण्यास सुरुवात केली. फादर ख्रिस्तमस हे एका सज्जन भावनेचं प्रतीक म्हणून हळूहळू प्रस्थापित होत गेलं.
नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये, सांता क्लॉजचं पात्र सेंट निकोलसवर आधारलेल्या सिंटरक्लास नामक पात्राशी स्पर्धा करतं. सांता क्लॉजला डच भाषेमध्ये ‘डे कर्स्टमन’ (ख्रिस्तमस मॅन) आणि फ्रेंचमध्ये ‘पेरे नोएल’ (फादर ख्रिस्तमस) म्हणून ओळखलं जातं. नेदरलँडमधील सिंटरक्लास हे पात्र मुलांना डिसेंबर महिन्यामध्ये भेटवस्तू देणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. बऱ्याच डच घरांमध्ये आजही ६ डिसेंबर या निकोलस-दिनीच लहान मुलांना भेटवस्तू दिल्या जातात. काही ठिकाणी तर ६ आणि २५ डिसेंबर या दोन्ही दिवशी भेटी देण्याची परंपरा सांभाळली जाते. इकडे स्विस-जर्मन प्रदेशातल्या ‘सॅमिक्लॉस’सोबत तर अशुभ समजला जाणारा श्मुट्झली असतो आणि तो व्रात्य मुलांना चोप देण्यासाठी झाडाच्या डहाळ्यांपासून तयार केलेली झाडू घेऊन हिंडत असतो, असं समजलं जातं. फिनलंड देशामध्ये सांता क्लॉजला जौलुपुक्की (ख्रिसमस गोट) असं म्हटलं जातं तर त्याची उडती हरणं म्हणजे सामी तांत्रिकांच्या फ्लाय अॅगारिकचं (लाल रंगाचं, पांढऱ्या ठिपक्यांचं मश्रूम) प्रतीक आहे असं समजतात.

पूर्वीच्या नॉर्वेमध्ये युलेटाइडच्या काळात (ख्रिस्तमसच्या अली-पलीकडचे दिवस) ओडीन या नॉर्स पौराणिक देवतेची प्रतिमा सेंट निकोलस आणि सांता क्लॉजच्या संकल्पना वापरून चितारलेली दिसते. यामध्ये त्याची लांब पांढरी दाढी तर दाखवली जातेच पण रात्रीच्या प्रवासासाठी तो राखाडी रंगाचा घोडा (ओडिनच्या स्लीपनीरची घोड्याशी तुलना) किंवा उत्तर अमेरिकेप्रमाणे रेनडिअर्स वापरतो असं दाखवलं जातं. तिथल्या लोकसाहित्यकार मार्गारेट बेकर म्हणतात, "सांता क्लॉज किंवा फादर ख्रिस्तमसचे २५ डिसेंबरचे देखावे हे ओडिन किंवा उत्तरेकडील पांढऱ्या दाढीच्या गिफ्ट-ब्रिंगरचे आहेत, जो हिवाळ्यामध्ये आकाशावर स्वारी करतो आणि त्याचा आठ पाय असलेला स्लीपनीर घोडा, लोकांची गाठभेट घेऊन त्यांना भेटवस्तू देतो. मूळ आमची असलेली ओडिन देवता फादर ख्रिस्तमसमध्ये रूपांतरित होऊन नंतर सांता क्लॉज, सेंट निकोलस आणि क्राइस्ट-चाइल्डसह ख्रिस्तमसच्या मंचावर एक प्रमुख खेळाडू म्हणून ओळखली जाऊ लागलेली आहे”.

तर, चर्चचा इतिहास आणि लोककथांमध्ये सापडणारं, विशेषत: सेंट निकोलसचं भेटवस्तू देणारं प्रारंभिक निरूपण, इंग्लिशमध्ये रूपांतरीत होताना फादर ख्रिसमसमध्ये विलीन झालं आणि उर्वरित जगामध्ये ‘सांता क्लॉज’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. वरती म्हणालो तसं, ‘सांता क्लॉज’ हा शब्द म्हणजे डच पौराणिक पात्र सिंटरक्लासची ध्वन्यात्मक व्युत्पत्ती आहे. इरविंग वॉशिंग्टनच्या १८०९ सालच्या ‘हिस्ट्री ऑफ न्यूयॉर्क’मध्ये, “सिंटरक्लास या शब्दाचं १७७३ साली यू.एस. प्रेसमध्ये ‘सांता क्लॉज’ या शब्दाने इंग्रजीकरण संपन्न झालं”, असा उल्लेख आहे.

परंतु इरविंगचं हे पुस्तक म्हणजे न्यूयॉर्कच्या त्या काळातील स्वैर डच संस्कृतीचं विडंबन असून त्यामधलं बरंचसं वर्णन हा त्याचा स्वतःचाच विनोदी आविष्कार आहे. सांताचं वर्णन करताना त्याने त्याचा मूळ बिशपचा पोशाखच बदलून टाकलेला दिसतो. त्या जागी त्याने हिरव्या रंगाचा हिवाळी फर-कोट, तोंडात पाईप आणि जाडजूड पोट असलेला, जणू उच्श्रृंखल डच खलाशीच वाटावा असा, सांता क्लॉज रंगवलेला आहे. इरविंगची सांता क्लॉजची व्याख्या हा त्या काळातील अनिष्ट (ख्रिस्तमसचे) उत्सव थोपवू पाहणाऱ्या व्यापक चळवळीचा एक छोटासा भाग होता. म्हणजे, एकीकडे तोंडाने म्हणायचा ख्रिस्तमस उत्सव पण खरं करायचं काय तर वॉसलिंग, म्हणजे विवाहपूर्व लैंगिक संबंधांसाठीची घरगुती आक्रमणं किंवा शॉटगन दाखवून केले जाणारे जबरदस्तीचे विवाह! त्या काळच्या उच्चवर्गीय आणि ख्रिश्चन शुद्धवाद्यांनी लैंगिक विकृतीचं असं सार्वजनिक प्रदर्शन करणाऱ्या गैर-उत्सवांची पुरेपूर खिल्ली उडवलेली अनेकदा दिसते.

सन १८२३ सालच्या ‘अ व्हिजिट फ्रॉम सेंट निकोलस’ या कवितेच्या प्रभावामुळे आजची ही दृश्य प्रतिमा एकोणिसाव्या शतकात अमेरिका आणि कॅनडामध्ये सर्वप्रथम लोकप्रियतेच्या शिखरावर स्थानापन्न झाली. जसजशी वर्षं मागे पडत गेली तसा सांता क्लॉज एका व्यक्तिमत्वामध्ये विकसित होत गेला. सांता क्लॉजची आधुनिक प्रतिमा परिभाषित करणाऱ्या पहिल्या कलाकाराचं नाव होतं थॉमस नास्ट! हा एकोणिसाव्या शतकातला एक अमेरिकन व्यंगचित्रकार होता. ३ जानेवारी १८६३ च्या हार्पर विकलीच्या अंकातील चित्रातून त्याने सांता क्लॉजला अमरत्व बहाल केलं. त्या चित्रात सांताने अमेरिकन ध्वज परिधान केलेला होता आणि त्यावर ‘जेफ’ असं नाव चितारलेलं होतं. अमेरिकन यादवी युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रात सांता रेनडियर्स ओढत असलेल्या स्लेजमध्ये बसलाय असं दाखवलेलं आहे.

‘सांता क्लॉज उत्तर ध्रुवावर राहतो’, या कथेचा जनकही हाच थॉमस नास्ट! २९ डिसेंबर १८६६च्या हार्परच्या अंकातील ख्रिस्तमसच्या चित्रांमध्ये, ‘सांता क्लॉज ॲन्ड हिज वर्क्स’ नावाच्या चित्रमालेमध्ये एक कोलाज होतं. त्यामध्ये ‘सांताक्लॉसविले, एन.पी.’ असा मथळा समाविष्ट होता. जॉर्ज पी. वेबस्टरनेही ‘सांता क्लॉज अँड हिज वर्क्स’ याच शीर्षकाखाली १८७०च्या सुमारास लिहिलेल्या कथेमध्ये, “सांता क्लॉजचं घर उत्तर ध्रुवाजवळ आणि बर्फामध्ये होतं”, असं लिहून ठेवलेलं आहे. कोलोरॅडोमधील एका मुलाने १८७४च्या उत्तरार्धात ‘द नर्सरी’ नामक मुलांच्या नियतकालिकामध्ये एक विनोदी विधान केलेलं दिसतं - "जर आपण उत्तर ध्रुवापासून इतके दूर राहत नसतो तर मी सांता क्लॉजला माझ्यासाठी एक गाढव आणण्यास सांगितलं असतं”. असं त्याने लिहून ठेवलंय. या सर्व कलाकारांनी चितारलेली सांताची प्रतिमाच पुढे विविध गाणी, रेडिओ, दूरदर्शन, मुलांची पुस्तकं, कौटुंबिक ख्रिस्तमस परंपरा, चित्रपट आणि जाहिरातींद्वारे आजतागायत सांभाळून राखलेली आहे, सावकाशीने मजबूत करीत नेलेली आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस, सन १९०२ साली, एल. फ्रँक बॉमचं ‘द लाइफ अँड अॅडव्हेंचर्स ऑफ सांता क्लॉज’ हे लहान मुलांसाठीचं पुस्तक प्रकाशित झालं. त्या वेळी सांता क्लॉजच्या प्रचलित असलेल्या बऱ्याचशा पुराणकथा आजच्यासारख्या ठोसपणे प्रस्थापित झालेल्या नव्हत्या. त्यामुळे बॉमला त्याच्या ‘नेक्लॉस’मध्ये (नेसिल्स लिटल वन) मुक्तपणे विविध कल्पना-प्रकार मांडता आले. सांताचं ‘होहाहो’ नावाच्या लाफिंग व्हॅलीमध्ये असलेलं घर, त्याचे दहा रेनडियर - जे खरं तर उडू शकत नव्हते, परंतु प्रचंड मोठी, उड्डाणसदृश्य उडी मारत होते, इ. कथासूत्रांना जणू अमरत्व प्राप्त झालं. इतकंच कशाला पण त्याच्या नावाचा शॉर्टफॉर्म सांता हा सुद्धा त्याच वेळी ठरवला गेला आणि एकूणच सांता म्हणजे मुलांचं आनंदी बालपण असंही चित्र रंगवलं गेलं. पण त्याच वेळी काही जागरूक प्रतिभावंतांनी त्यावर आक्षेप घेऊन बाकी बाहेरच्या जगातल्या मुलांचं दुःख आणि गरिबी यावरही विचार केला जावा असा मुद्दा मांडला. आता मात्र सांताने जगातील सर्व लहान मुलांच्या जीवनात आनंद आणण्याचा मार्ग शोधायचा प्रयत्न केला. त्या विचारमंथनामधून मुलांना सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे खेळणी हे गृहित धरलं गेलं आणि सांताच्या मागे खेळण्यांची निर्मिती आणि त्यांचं वितरण ही नवी ब्याद लावून देण्यात आली.

घराच्या चिमणीमधून रात्री-अपरात्री येणाऱ्या सांतासाठी अमेरिका आणि कॅनडामधली मुलं एक ग्लास दूध आणि कुकीजची प्लेट सोडतात. ग्रेट ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याऐवजी शेरी किंवा बिअर आणि मटण खिम्याचे पाई ठेवले जातात. आयर्लंडमध्ये सांतासाठी ख्रिसमस पुडिंग किंवा मिन्स मटण पाई सोबत गिनीज किंवा दूध ठेवणं जास्त लोकप्रिय आहे. डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडनमधली मुलं सांतासाठी साखर आणि दालचिनीची पखरण केलेली तांदळाची खीर/ दलिया ठेवतात. हंगेरीमधला सेंट निकोलस ५ डिसेंबरच्या रात्री येतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना त्यांच्या भेटवस्तू मिळतात तर ख्रिस्तमसच्या पूर्वसंध्येला मात्र लहानगा येशू येतो आणि प्रत्येकाला काही भेटवस्तू देतो. स्लोव्हेनियामध्ये सेंट निकोलस ६ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला चांगल्या मुलांसाठी भेटवस्तू आणतो, तर ख्रिस्तमस मॅन २५ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला भेटवस्तू देतो आणि डेडेक म्राज (ग्रँडफादर फ्रॉस्ट) ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी भेटवस्तू देतो ज्या नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी उघडल्या जातात.

सन १९३० च्या दशकात कोका-कोला कंपनीच्या ख्रिस्तमसच्या जाहिरातींसाठी हॅडन संडब्लॉमने चित्रित केलेल्या सांता क्लॉजच्या प्रतिमा मांडल्या गेल्या. कोका-कोला कंपनीने ‘सांता क्लॉज फक्त लाल आणि पांढरा रंगच वापरतो’ असा शोध(!) लावला कारण ते कोका-कोला ब्रँडचा प्रचार करण्यासाठी वापरले जाणारे मुख्य रंग होते. पुढे कोका-कोलाची स्पर्धक पेप्सी-कोलाने १९४० आणि १९५० च्या दशकात आपल्या जाहिरातींमध्येही त्याच रंगातल्या सांता क्लॉज पेंटिंगचा वापर केला. मात्र ऐतिहासिकदृष्ट्या, व्हाइट रॉक बेव्हरेजेसने १९१५ मध्येच मिनरल वॉटर विकण्यासाठी लाल आणि पांढर्‍या सांताचा वापर केला होता आणि नंतर पुन्हा १९२३ साली त्यांनी त्यांचं जिंजर एल पेय विकण्यासाठी तसाच लाल-पांढरा सांता वापरून घेतला.

अमेरिकेच्या ओहियो राज्यातील कायद्यानुसार अल्कोहोलयुक्त पेयं विकण्यासाठी सांता क्लॉज किंवा त्याच्या प्रतिमेचा वापर करण्यास मनाई आहे. बड लाइट या बिअरच्या ब्रँडने डिसेंबर १९८७ च्या जाहिरात मोहिमेदरम्यान सांता क्लॉजच्या पोशाखात त्यांचा शुभंकर स्पड्स मॅकेन्झी वापरण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा कायदा वापरात आला आणि बड लाइटला ती प्रतिमा वापरण्यास बंद करणं भाग पाडलं गेलं.

ऐतिहासिक दंतकथांचा वापर करून सीबरी क्विनने १९४८ साली रोड्स ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी खास सांताची कथा आणि ख्रिसमसची उत्पत्ती सांगण्यासाठी लिहिली गेलेली होती. याच सुमारास सांताच्या कथांवर आधारित बाकीच्या गोष्टीही लिहिल्या जाऊ लागल्या. उदा. ‘रुडॉल्फ द रेड-नोस्ड रेनडिअर’ ही अशीच एक वाढीव कथा आहे. जीन ऑट्रीने १९३९ च्या गाण्यात अमर केलेलं ‘लीड रेनडिअर’ हे ही असंच एक जास्तीचं कथानक म्हणता येईल. ‘जिंगल बेल्स’ हे १८२२ सालचं जेम्स पियरेपॉन्टने लिहून संगीतबद्ध केलेलं (थॅंक्स गिव्हिंगचं) गाणं तर आज सांताचं ख्रिस्तमस गाणं म्हणूनच ओळखलं जातं.

सन १९१२मध्ये अभिनेता लीडहॅम बॅंटॉक हा चित्रपटात सांता क्लॉजची भूमिका करणारा पहिला अभिनेता ठरला. सांता क्लॉज असंच नाव असलेल्या त्या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यानेच केलेलं होतं. तेव्हापासून अनेक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांमध्ये सांता क्लॉजला नायक म्हणून दाखवण्यात आलेलं आहे, ज्यात ‘मिरॅकल ऑन 34th स्ट्रीट’, ‘द सांता क्लॉज’ आणि ‘एल्फ’ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कार्टून फिल्म्समध्ये, सांताला स्टॅन फ्रान्सिस, मिकी रुनी, एड अस्नर, जॉन गुडमन आणि किथ विकहॅम यांच्यासह अनेक लोकांनी उसना आवाज दिलेला आहे. सांताची व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून असंख्य गाणीही रचली गेलेली आहेत. त्याच स्वरूपाची अनेक बालनाट्यंही परदेशांत प्रसिद्ध आहेत. थोडक्यात काय, तर सांताने त्याच्या परिने पाश्चात्य साहित्यक्षेत्रात अढळ स्थान प्राप्त केलेलं आहे.

सांता क्लॉजच्या सर्वात मोठ्या मेळाव्यासाठीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या केरळातल्या त्रिच्चूर शहराच्या नावे जमा आहे. दिनांक २७ डिसेंबर २०१४ रोजी सांतासारखे कपडे घातलेल्या तब्बल १८,११२ लोकांनी एकत्र जमून हा विक्रम प्रस्थापित केलेला होता. ही अशी अमाप लोकप्रियता वाट्यास आलेला सांता अनेकदा टीकेचा धनीसुद्धा झालेला आहेच. खास करून निरागस लहान मुलांना सांगितल्या जाणाऱ्या त्याच्या खोट्या गोष्टी हा अनेक मनोविकार तज्ज्ञांनी वादाचा मुद्दा म्हणून चर्चेला घेतलेला आहे. सांता क्लॉज ही अंधश्रद्धा म्हणून ओळखली जावी असाही अनेक विचारवंतांचा गेल्या काही शतकांपासूनचा आग्रह आहे. सेंट निकोलस फक्त गरीब आणि गरजूंचीच मदत करायचा तर सांता हे पात्र आजच्या जगात फक्त सरसकट बाजाराचा विचार करूनच वापरात आणलं जातंय असेही मतप्रवाह प्रचलित आहेतच. असो!!

पूर्वीच्या कथानकांमधून आढळणारी सांताची छोटीशी झोपडीसारखी ध्रुवीय कार्यशाळा आजच्या कथांमध्ये मात्र अजस्त्र कारखान्यांत रुपांतरीत झालेली आहे. वनदूतांनी केवळ हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेली तिथली खेळणी आजच्या युगात मात्र संपूर्णतः यांत्रिकी पद्धतीने तयार होत आहेत. वनदूत व्यवस्थापकांच्या नव्या रूपात त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. शांतिदूत म्हणून ओळखला जाणारा सांता आता त्या मोठ्या खेळण्यांच्या फॅक्टरीचा मालक आणि मॅनेजर झालेला आहे. फावल्या वेळात तो मुलांसाठी तिथूनच चक्क एक आकाशवाणी केंद्रही चालवताना दिसतोय…
संपूर्ण जगच बदलत चाललंय आता, मग मुलांचा लाडका सांता तरी त्यात कसा मागे राहील, नाही का?

Web Title: Christmas Day 2022: Santa Claus who fulfills everyone's wishes in reality or fantasy? Read its origin story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Christmasनाताळ