‘चला, सकाळ झाली, आता उठा, कामावर जायचे आहे ना?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 06:12 AM2020-05-18T06:12:19+5:302020-05-18T06:12:54+5:30
घरातले शिकवायचे, डोळे उघडताच मुखात भगवंताचे नाव, सर्वांसाठी शुभभावना मनात असेल तर रोज आपली प्रभात सुरेख होऊ शकेल. आपल्या मनात शक्तींचा भंडार आहे. फक्त स्मृतीची कळ दाबण्याची गरज आहे.
- नीता ब्रह्माकुमारी
आकाशामध्ये पसरलेली सूर्याची लालिमा, पक्षांची किलबिल, हवेचा मंद झोका, अशा वातावरणात मंदिरातील भक्तिगीतांचा सुमधूर आवाज कानी पडत होता. ‘चला, सकाळ झाली, आता उठा, कामावर जायचे आहे ना?’ स्वत:शीच संवाद झाला. मोबाईलवर नजर पडली. सुप्रभातचे संदेश यायला सुरुवात झाली. आज गूड मॉर्निंग करायची तर फॅशनच झाली आहे. लहानपणी कानावर शब्द पडायचे, ‘सकाळी- सकाळी कोणाचे तोंड बघितले कोणास ठाऊक?’ नुकसान झाल्यावर कोणाला प्रथम बघितले, हा प्रश्न स्वत:ला विचारला जायचा व आज सर्वप्रथम मोबाईलवर कित्येकांना एकावेळी बघतो. या मेसेजने आपली सुप्रभात होते? उठताक्षणी कामाचा रगाडा, मित्रमंडळी आठवत असतील तर एखाद्या मेसेजने बॅड मॉर्निंगही होऊ शकते. घरातले शिकवायचे, डोळे उघडताच मुखात भगवंताचे नाव, सर्वांसाठी शुभभावना मनात असेल तर रोज आपली प्रभात सुरेख होऊ शकेल. आपल्या मनात शक्तींचा भंडार आहे. फक्त स्मृतीची कळ दाबण्याची गरज आहे. अनिष्ट गोष्टींचा प्रभाव मनावर खोलवर होतो; पण असे कोणाचेच जीवन नाही की ज्यात काहीच चांगले झालेले नाही. फक्त स्मृतिकोशामध्ये काय भरले आहे, हे बघण्याची गरज आहे. दिवसभरात वेगवेगळ्या विचारांची धूळ घेऊन आपण काम करत असतो व त्याच मळलेल्या मनाला घेऊन झोपी जातो. विज्ञानही याला मान्यता देते की ज्या विचारांनी आपण झोपी जातो त्याच विचारांनी आपली सुरुवात होते. शरीर उठण्याआधी मन उठते. या गोष्टींचा अनुभव करून पाहा. म्हणूनच सांगावेसे वाटते की, सुंदर आणि श्रेष्ठ विचारांनी आपली सकाळ चांगली बनवा.