तारतम्य कौटुंबिक जीवनाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 12:03 PM2021-07-29T12:03:51+5:302021-07-29T12:04:31+5:30
कौटुंबिक सभासदांच्या अंतर मनातील स्वर आपल्याला ऐकू येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने कौटुंबिक जीवनाचे तारतम्य आपल्या लक्षात येईल.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत तारतम्य या शब्दाचा उल्लेख ७२ वेळा केलेला आहे. मानवी जीवनात तुमचा आमचा वेगवेगळ्या क्षेत्रात संबंध येतो. पण या क्षेत्राशी संबंधित जे तारतम्य आहे हे कसं सांभाळायचं या बाबतीत आपण अनभिज्ञ असतो. ते आपल्या लक्षात आले म्हणजे कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी वाटचाल करु शकतो. याबाबतीत असलेले 'तारतम्य' राष्ट्रसंतानी अगदी आवार्जन सांगितले आहे.
प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्तींचा सुसंवाद असणे हे तारतम्य सांभाळणे ही आज काळाची गरज आहे. कोणाच्याही कुटुंबात सर्वच सदस्य खराब नसतात. तर त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल पणाचे जर भान करुन दिले तर घराच घरपण टिकवणे सहज शक्य आहे. काही दिवसांपूर्वी झोपडीच्या घरात लोक गुण्यागोविंदाने जीवन जगत होते. आज गगनचुंबी इमारतीत सर्व वैभव अनुकुल असतांना समाधान नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे आज कौटुंबिक संवाद लोप पावला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आज एकत्र बसण्याची नितांत गरज आहे. एकमेकाच्या विचाराची देवाण घेवाण, कुटुंबाची मिळकत, अपेक्षित खर्च, इतर समस्या यावर एकत्रित बसून जर चर्चा झाली तर प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव निर्माण होईल व घरगुती एकोपा साधल्या जाईल. त्याकरीता प्रत्येक घरात किमान महिन्यातून एकदा एकत्र बसणे गरजेचे आहे. तरच आपल्या घराचे घरपण आपण कायम टिकवून ठेवू शकतो. आजच्या परिस्थितीत घराच घरपण हरवल्या सारख आहे. काही दिवसा अगोदर प्रत्येक गावाला गावपण होत ते आता अदृश्य झालं. ज्या गावात आपलं घर आहे त्या घरात बसून हजारो कि.मी. अंतरावरचं संगीत आपण ऐकतो. पण ज्या दिवशी आपल्या कौटुंबिक सभासदांच्या अंतर मनातील स्वर आपल्याला ऐकू येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने कौटुंबिक जीवनाचे तारतम्य आपल्या लक्षात येईल.
- हभप मुरलीधर महाराज हेलगे (मृत्यूंजय) किन्ही सवडत