निरंतर अभ्यास यशाचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:40 AM2020-06-18T05:40:38+5:302020-06-18T05:40:54+5:30
- फरेदुन भुजवाला प्रमादरहित होऊन आणि सतत सजग राहूनच निर्वाण प्राप्त होऊ शकते़ त्यासाठीच भगवान गौतम बुद्ध यांनी मार्ग प्रशस्त ...
- फरेदुन भुजवाला
प्रमादरहित होऊन आणि सतत सजग राहूनच निर्वाण प्राप्त होऊ शकते़ त्यासाठीच भगवान गौतम बुद्ध यांनी मार्ग प्रशस्त केला़ जसे वसंत ऋतूत वृक्षवेली फळाफुलांनी बहरून येतात़ त्याचप्रकारे त्यांनी फळ देणारा उत्तम मार्ग शिकविला, जो परम हितकारी आहे़ निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे़ असा धर्म शिकविला, जो सुरुवातीला कल्याणकारी आहे, मध्यभागी कल्याणकारी आहे आणि शेवटीही कल्याणकारीच आहे, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका सांगतात़ विपश्यना विद्या लोकांच्या विशुद्धीसाठी आहे़ विमुक्तीसाठी आहे़ दु:ख आणि संताप यांचे चांगल्याप्रकारे क्षमन करण्यासाठी आहे. दुर्भावना मावळण्यासाठी आहे; परंतु यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात़ भगवान गौतम बुद्धांचा उपदेश कोणत्या वाद-विवादी, दार्शनिक मान्यतेच्या तर्क-वितर्कांसाठी नाही़ कोणाला नीच लेखून स्वत:लाच उच्च दाखविण्याासाठी नाही़ ती पूर्णपणे भव विमुक्त झालेल्या महाकारुणिकाची स्वानुभूतीजन्य अमृतवाणी आहे़ ज्या करुणानिधीची हीच करुण इच्छा होती की, भव-संसरणाने होरपळलेल्या मानवाने ही लोकहितकारिणी विद्या शिकून आणि त्यात परिपक्व होऊन नित्य, शाश्वत, धु्रव, अमर, अचल, अटल निर्वाणाचा साक्षात्कार करावा़ भगवान बुद्धांच्या वाणीत निर्वाणाची चर्चा भरपूर आहे़ निर्वाणापर्यंत पोहोचविण्याच्या मार्गाची आणि निर्वाणापर्यंत पोहोचलेल्या अनुभूतीची चर्चासुद्धा भरपूर आहे़ आजसुद्धा या विद्येचे लाभ स्पष्ट आहेत़ जो जेवढा-जेवढा अभ्यास करतो, तेवढा-तेवढा तो निर्वाणाच्या जवळ पोहोचतो़ दुर्भाग्याने भगवान गौतम बुद्धांच्या मूळ वाणीचे विपुल साहित्य आणि त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारी विपश्यना विद्या या देशातून पूर्णपणे विलुप्त झाली़ त्याला नवसंजीवनी देण्याचे काम विपश्यनाचार्य गोएंका यांनी केले. नि:स्वार्थपणे या विद्येचा केवळ भारतातच नाही, तर जगात प्रचार आणि प्रसार केला.