जीवनशिल्पाची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 04:19 AM2020-08-18T04:19:56+5:302020-08-18T04:20:03+5:30
माती ही ‘मूलभूत वस्तू’ असल्याशिवाय तुम्ही वस्तू बनवू शकत नाही. त्यानंतर त्या मातीपासून एखादी वस्तू बनविणार कोण?
-प्रल्हाद वामनराव पै
मित्रांनो, जीवनविद्येने दिलेला एक महामंत्र म्हणजे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’ आपण आपलं जीवनशिल्प घडवितो म्हणजे काय आणि ते कसं घडतं? एखादं शिल्प घडविताना कोणकोणत्या गोष्टींची गरज असते बरं? तुम्ही मुलं रंगीत मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचा खेळ खेळता. ते करताना आवश्यक असते ती म्हणजे ‘माती’. म्हणजे तो झाला कच्चा माल. माती ही ‘मूलभूत वस्तू’ असल्याशिवाय तुम्ही वस्तू बनवू शकत नाही. त्यानंतर त्या मातीपासून एखादी वस्तू बनविणार कोण? तर ‘तुम्ही’. म्हणजे तुमच्याशिवाय वस्तू बनणारच नाही. नंतर तुम्ही विचार करता, की या मातीपासून काय बनवू? एखादा प्राणी, पक्षी की फूल, फळ बनवू? सहज बनविता येईल अशी वस्तू बनविण्याची तुमची ‘इच्छा’ होते. तुमच्या ज्ञानानुसार ती तुम्ही बनवायला सुरू करता. आता तुम्हाला ‘उपकरणे’ हवीत. ती उपकरणे म्हणजे तुमचे हात! आपली वस्तू अधिक छान, सुंदर, खरीखुरी दिसण्यासाठी ‘कल्पकता’ वापरता. त्यानुसार कौशल्याने त्या वस्तूला तसा आकार देण्याचा ‘प्रयत्न’ करता! ती वस्तू बनविण्यासाठी मातीपासून प्रयत्नांपर्यंत कितीतरी गोष्टींची गरज आपल्याला लागते. एक जरी घटक नसेल, तर ती वस्तू हवी तशी आकार घेणार नाही. म्हणजे बघा - माती आहे, तुम्ही आहात; पण खेळण्याची, वस्तू बनविण्याची इच्छाच नाही. बरं इच्छा आहे; पण कसं बनवायचं याच ज्ञानच नाही, तर ती वस्तू तयार होऊ शकते का? समजा, ज्ञानही आहे; परंतु प्रयत्नच जर केले नाहीत, तरी काही निर्माण होईल का? नाही! अगदी असंच आपल्या जीवनशिल्पाबाबतही आहे. साध्या मातीच्या वस्तूसाठी एवढा खटाटोप करावा लागतो आपल्याला, तर सर्वांना हेवा वाटावा असं सुंदर जीवनशिल्प घडविण्यासाठी काय-काय करावं लागेल बरं? या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आपण जाणून घेणार आहोत पुढील भागात.
‘घडवू चला घडवू चला, जीवनशिल्प घडवू चला,
चला शिकूया आपण सारे, जीवन जगणे एक कला!’