उत्तम आचरणाचा संकल्प म्हणजेच सुसंस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:16 PM2020-11-04T19:16:03+5:302020-11-04T19:16:11+5:30

संस्कार ते संकल्प हा प्रवास विवेकाच्या मदतीने पूर्ण केला जाऊ शकतो.

Culture is the determination to behave well | उत्तम आचरणाचा संकल्प म्हणजेच सुसंस्कार 

उत्तम आचरणाचा संकल्प म्हणजेच सुसंस्कार 

Next

   'आजकालच्या मुलांवर चांगले संस्कार नाहीत ' अनेक ठिकाणी सहज कानावर पडणारं हे वाक्य . मग काळ आणि स्थळांनुरूप मुलांची जागा मुली , महिला, माणसं यांनी घेतलेली असते. तक्रार मात्र एकच, संस्कार पहायला मिळत नाहीत .
     खरंतर संस्कार ही दृश्य वस्तू नाही, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे . परंतु तिचं दर्शन मात्र संबंधित व्यक्तीच्या वर्तनातून आपल्याला घडत असते .त्यामुळे संस्कारांविषयी आपले मत व्यक्त करताना परिस्थितीचा विचार करणे आवश्यक ठरते .संस्कार म्हणजे नेमकं काय ?या प्रश्नाचे उत्तर शोधताना ठराविक चौकटीत ही संकल्पना सीमित करता येत नाही एवढा अनुभव मात्र नक्की येतो . मग संस्काराची व्याख्या कशी करायची ? तर एखाद्या व्यक्तीचा मानवतेच्या दृष्टिकोनातून होत असलेला जीवनप्रवास त्याच्या एकंदरीत वागण्या-बोलण्यातून प्रदर्शित होत असेल तर ते उत्तम संस्कारांचे प्रतिबिंब असते . या संस्कारांचे विविध पैलू आपल्याला अनुभवायला मिळतात . वेगवेगळ्या माध्यमातून हेच संस्कार दिसू लागतात . मग तो व्यवहार , वेशभूषा , वागणं-बोलणं आणि बरंच काही . एकंदरीत काय तर तुमचं असणं .
      हल्ली फारसे चांगले संस्कार होत नाहीत, अशी तक्रार कुटुंबव्यवस्था, शाळा आणि समाजव्यवस्थेविषयी  केली जाते . त्याची कारणमीमांसा करणे हा या चर्चेचा उद्देश नाही . तर प्रत्येकाने इतरांकडून अपेक्षा करत असताना स्वतःसोबत संवाद साधणे गरजेचे आहे . आपल्या मनाशी काही संकल्प केले तर हे उत्तम संस्कार निश्चितच आपल्या वर्तनातून प्रतिबिंबित होतील . 
     परिस्थिती सुधारली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्या सुधारण्याची सुरुवात माझ्यापासून होत असते, याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते . संस्कारांचं अगदी तसंच . सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना साधे-साधे संकेत पालन करण्याचे भान लोकांना राहत नाही. अशी आपली सर्वसामान्य तक्रार . मग ते करत नाहीत तर मी का करू ?अशा विचाराने जर का आपल्या प्रतिक्रियांची सुरुवात होत असेल तर संस्कार स्वीकारायला आपलं मन अजूनही तयार नाही असं समजावं . लहान मुलांच्या बाबतीतही संस्कारांबद्दल बोलताना मोठे अगदी सहज बोलून जात असतात . ' हेच शिकवलं का आई-बाबांनी ?', 'हेच शिकवलं का शिक्षकांनी?', 'असेच संस्कार आहेत का तुझ्यावर?'  असंच विचारण्यात मोठे धन्यता मानतात .एखादी लग्न झालेली मुलगी पहिल्यांदा सासरी गेल्यानंतर तिच्याकडून झालेल्या चुकीला माहेरच्या संस्कारांचा संदर्भ देण्यात मोठेपण मानणारी आपली कुटुंब आणि समाजव्यवस्था जोपर्यंत आहे, तोपर्यंत सुसंस्कारांची अपेक्षा करणे फार धाडसाचे ठरत आहे. मुळात सासरी आलेली मुलगी ही आपल्याच कुटुंबाची एक सदस्य झाली आहे, तिच्या वर्तनातील बदल प्रेमाने घडवून आणता येऊ शकतात .त्यासाठी तिला आपलं मानण्याची गरज असते. 
      अगदी त्याच पद्धतीने लहान मुलं आणि आपलंही आहे. प्रत्येकाचा आत्मसन्मान दुखावून संस्कारांची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. मोठ्या मनाने चांगल्या गोष्टींचे महत्त्व लक्षात आणून दिल्यास तो संस्कार दीर्घकाळ टिकतो . अलीकडे लहान मुलांना सुसंस्कारांसाठी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये संस्कारवर्गांमध्ये प्रवेश दिला जातो . हा प्रवेश देऊन आई-बाबा आपलं पालकत्वाचा काम पूर्ण केल्याच्या समाधानात वावरत असतात.परंतु आपण पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं की, संस्कार ही करण्याची गोष्ट नाही. लहान मुलं किंवा इतर आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या मोठ्यांच्या वर्तनाचे साक्षीदार असतात. त्यांची ज्ञानेंद्रिये ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या टिपत नाहीत तर त्या मनावर कायमस्वरूपी कोरून ठेवतात . त्यामुळे घरातील मोठ्यांची जबाबदारी खूप जास्त असते . आपलं वागणं, बोलणं, व्यवहार या सगळ्या गोष्टी लहानांच्यासमोर अतिशय जबाबदारीपूर्वक केल्या तर त्यांना संस्कार वर्गांना घालण्याची गरज पडणार नाही .  पैसे देऊन संस्कार विकत घेण्याचं कामही पडणार नाही . 
     आपल्या क्षमता आणि मर्यादा यांची जाणीव होऊन चांगलं काय ? आणि वाईट काय ?या विचाराचा मनाला स्पर्श झाला की संस्कारांच्या दिशेने वाटचाल सुरू होते . याच मार्गावरून चालत राहावं असा मनाशी संकल्प ठरवला जातो . संस्कार ते संकल्प हा प्रवास विवेकाच्या मदतीने पूर्ण केला जाऊ शकतो .
     माझ्यापासून कोणीतरी एखादी चांगली गोष्ट शिकावी, त्याचं अनुकरण करावं . एवढ्या लहानशा गोष्टीपासून संस्कारांची सुरुवात होते . सुसंस्कार केवळ भाषणातून व लेखनातून होत नाहीत तर त्यासाठी आचरण अधिक महत्त्वाचे . उत्तम आचरणाचा संकल्प म्हणजेच सुसंस्काराचा मार्ग .
 
-अरविंद शिंगाडे
खामगाव

Web Title: Culture is the determination to behave well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.