Dahi Handi 2024: दही हंडी हा केवळ सण नाही, तर त्यात आहे सामाजिक बांधिलकीचा संदेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:03 AM2024-08-27T10:03:28+5:302024-08-27T10:05:34+5:30
Dahi Handi 2024: सद्यस्थितीत उत्सवाचे स्वरूप बीभत्सतेकडे झुकत असल्याने त्याचे मूळ स्वरूप समजावून घेणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे!
आज दही हंडी (Dahi Handi 2024). बाळकृष्णाने सुरु केलेला हा उत्सव अगदी कलियुगातही आनंदाने साजरा केला जातो. पण उत्सवाचा मूळ उद्देश विसरून चालणार नाही. मग ती दही हंडी असो नाहीतर गणेशोत्सव. आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे, उन्माद नाही. पुढच्या पिढीसमोर चांगला आदर्श ठेवायचा असेल आणि संस्कृतीचे योग्य प्रकारे हस्तांतरण करायचे असेल तर मूळ गाभा आपणही समजून घेऊया.
दही हंडी हा उत्सव एकतेचा संदेश देणारा सण आहे. अलीकडच्या काळात या उत्सवाचे स्वरूप व्यापक बनले आहे. दही हंडीमध्ये सहभागी होणारे बालगोपाल आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला जमलेली गर्दी उत्सवमय झालेली असते. ही बाब एकार्थी आनंदाची आहेच, पण उत्सवादरम्यान बॉलिवूडच्या उत्तेजक गाण्यांवर नाच, मद्यपान केलेल्या मंडळींची झिंग आणि लाखो रुपयांच्या किमतीचे बक्षीस मिळण्यावरून गोविंदा पथकांमध्ये होणारी हमरी तुमरी, उंचच उंच थर लावण्याच्या नादात झालेले अपघात, मृत्यू यामुळे उत्सवाच्या मूळ हेतूला गालबोट लागते. बीभत्स स्वरूप प्राप्त होते. कर्णकर्कश स्पीकर मुळे कधी एकदा तो दही काला उत्सव संपतो याची स्थानिक वाट बघत बसतात आणि अशी परिस्थिती निर्माण होणे हे दुर्दैवी आहे.
श्रीकृष्णने सर्व स्तरातल्या, सर्व वयोगटातल्या सवंगड्यांना सोबत घेऊन दह्या दुधाची चोरी केली आणि कंसाच्या दुष्ट वागणुकीला आळा घातला. त्याच्या घरात दह्या दुधाचे डेरे होते. त्याला कसलीही कमतरता नव्हती. तरीसुद्धा श्रीमंत घरात वाढलेला कृष्ण सवंगड्यांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि गोकुळ वासियांमध्ये कंसाची दहशत कमी करण्यासाठी मानवी मनोरे रचतो. संघटन केल्याशिवाय अशा कामांना यश मिळत नाही हे दाखवून देतो आणि आनंदाचे नवनीत स्वतः खातो आणि मित्रांना खिलवतो. ही निरागसता आणि सच्चा भाव आजच्या उत्सवातही अभिप्रेत आहे. जेणेकरून संस्कृतीचे मांगल्य टिकून राहील.
हा 'पण' आपल्याला पूर्ण करायचा आहे तोही संस्कृती रक्षक बनून. त्यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल आणि ढाक्कू माकुम्म करायला आबाल वृद्धही आनंदाने पुढे सरसावतील! समानता ही केवळ हक्काची बाब नाही तर ती समाजातल्या प्रत्येक दुर्बल घटकाला मिळवून देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊया आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करूया.
Dahi Handi 2024: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत? जाणून घ्या कारण!