दासबोधातील समासात समर्थांनी संततीनियमनाचा विषय चपखलपणे मांडला आहे : विश्वजनसंख्या दिन!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 11:39 AM2021-07-09T11:39:38+5:302021-07-09T11:40:32+5:30
संततीनियमनाचे महत्त्व सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. अन्यथा समर्थांच्या वचनाप्रमाणे उदंड लेकुरे झालेल्या पित्याची, समाजरक्षण करणारऱ्या राजाची, देश चालवणाऱ्या मंत्र्यांची अवस्था दयनीय होईल!
येत्या रविवारी म्हणजे ११ जुलै रोजी जागतिक विश्वजनसंख्या दिन आहे. दिवसेंदिवस पृथ्वीवरचा वाढता भार आणि त्यावर आळा घालण्याची गरज पाहता, हा दिवस योजला असावा. `वाढता वाढता वाढे' अशी स्थिती झाल्यामुळे काम करणारे हात दोन आणि खाणारी तोंडे दहा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्माण झाली म्हणण्याऐवजी केली गेली आहे. लोकसंख्येला आळा घालण्यासाठी संततीनियमनाचा कायदा करण्यात आला, मात्र अंमलबजावणी अजूनही होताना दिसत नाही. या विषयात संतांनीदेखील वेळोवेळी कानउघडणी केली आहे. जसे की, समर्थ रामदास यांनी दासबोधाच्या तिसऱ्या दशकातील चौथा समास या विषयाला वाहिलेला आहे. समर्थ लिहीतात-
लेकुरे उदंड जाली, तो ते लक्ष्मी निघोन गेली।
बापडी भिकेसी लागली, खावया अन्न मिळेना।
लेकुरे खेळती धाकुटी, येके रांगती येके पोटी।
ऐसी घरभरी जाली दाटी, कन्या आणि पुत्रांची।
दिवसेंदिवस खर्च वाढला, यावा होता तो खुंटोन गेला।
कन्या उपवरी जाल्या त्याला, उजवावया द्रव्य नाही।
मायेबापे होती संपन्न, त्यांचे उदंड होते धन।
तेणे करिता प्रतिष्ठा मान, जनी जाला होता।
भरम आहे लोकाचारी, पहिली नांदणूक नाही घरी।
दिवसेंदिवस अभ्यांतरी, दरिद्र आले।
ऐसी घरवात वाढली, खाती तोंडे मिळाली।
तेणे प्राणीयास लागली, काळजी उद्वेगाची।
कन्या उपवरी जाल्या, पुत्रास नोवऱ्या आल्या।
आता उजवणा केल्या, पाहिजेत की।
जरी मुले तैसीच राहिली, तरी पुन्हा लोकलाज जाली।
म्हणता कायसा व्याली, जन्मदारिद्र्ये।
ऐसी लोकलाज होईल, वडिलांचे नाव जाईल।
त्यांचे परतोन नाही दिल्हे, ऐसे आभाल कोसळले उद्वेगाचे।
आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी।
सर्वकाळ मानसी, चिंतातुर।
पती अवघीच मोडली, वस्तभाव गहाण पडली।
अहा देवा वेळ आली, आता दिवाळ्याची।
काही केला तोडामोडा, विकिला घरीचा पाडा रेडा।
काही पैका रोकडा, काळांतरे काढिला।
ऐसे रुण घेतले, लोकिकी दंभ केले।
सकळ म्हणती नाव राखिले, वडिलांचे।
ऐसे रुण उदंड जाले, रिणाइती वेढून घेतले।
मग प्रयाण आरंभले, विदेशाप्रती।
सोप्या शब्दात समर्थांनी दूरदृष्टीने संततीनियमनाचे महत्त्व किती छान समजावून सांगितले आह़े आज बेरोजगारी, गुन्हेगारी, कुपोषण, आजार या सगळ्या समस्यांचे मूळ पाहिले तर ते लोकसंख्यावाढीत आहे. भारताची वाढती लोकसंख्या ही प्रगतीच्या, विकासाच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. भारत हा तरुणांचा देश असला, तरी येथील तरुण मोठ्या संख्येने बेरोजगार असणे सर्वांसाठी धोकादायक आहे. अशा पार्श्वभूमीवर संततीनियमनाचे महत्त्व सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. अन्यथा समर्थांच्या वचनाप्रमाणे उदंड लेकुरे झालेल्या पित्याची, समाजरक्षण करणारऱ्या राजाची, देश चालवणाऱ्या मंत्र्यांची अवस्था दयनीय होईल...
अरण्यरुदन करिता, कोणी नाही बुझाविता,
मग होये विचारिता, आपुले मनी।
आता कासया रडावे, प्राप्त होते ते भोगावे,
ऐसे बोलोनिया जीवे, धारिष्ट केले।