Dasnavami 2025: मृत्युची भीती प्रत्येकाला वाटते, त्यावर मात करण्याचा कानमंत्र समर्थांकडून जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:44 IST2025-02-21T10:42:47+5:302025-02-21T10:44:04+5:30

Dasnavami 2025: २२ फेब्रुवारी रोजी दासनवमी अर्थात समर्थांनी अवतारकार्य संपवले तो दिवस, त्यानिमित्ताने त्यांच्याकडून मृत्युच्या भीतीवर मात कशी करायची ते जाणून घेऊ.

Dasnavami 2025: Everyone fears death, learn the mantra to overcome it from the experts! | Dasnavami 2025: मृत्युची भीती प्रत्येकाला वाटते, त्यावर मात करण्याचा कानमंत्र समर्थांकडून जाणून घ्या!

Dasnavami 2025: मृत्युची भीती प्रत्येकाला वाटते, त्यावर मात करण्याचा कानमंत्र समर्थांकडून जाणून घ्या!

माघ वद्य नवमी, समर्थ रामदासांनी इहलोकीचा प्रवास संपवला तो दिवस. त्यांच्या जाण्याने त्यांचे सगळे शिष्य व्यथित झाले होते. त्यावेळी समर्थांनी त्या सर्व शिष्यांचा निरोप घेत त्यांना एका श्लोकांची आठवण करून दिली-

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
आकस्मात तोही पुढे जात आहे
पुरे ना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ||१६||

कोणी मरण पावला तर दुसरा त्याच्याबद्दल शोक करतो पण पुढे कधीतरी त्या शोक करणाऱ्यालाही मरणे आहेच. म्हणून माणसांची माया लावून घेतलेली नसावी कारण मायेपोटी मनस्ताप होतो आणि पुन्हा जन्म घ्यावा लागतो.

समर्थांनी या उदाहरणातून जणू काही आपल्या मनातील मृत्यूची भीती काढून टाकली आहे आणि त्या परिस्थितीकडे तटस्थपणे बघायला शिकवले आहे. मृत्यू, एक अटळ घटना. जी प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारच आहे, तरी आपण ती स्वीकारत नाही. उलट मरणाच्या भीतीने बऱ्याचदा जगणं सोडून देतो. याउलट जे लोक प्रत्येक दिवस शेवटचा असं समजून जगतात, ते आयुष्याचा भरभरून आनंद घेतात.

अर्थात, हे तत्वज्ञान वाचायला सोपं आणि जगायला कठीण आहे. नीट विचार केला, तर आपल्या लक्षात येईल, की आपण स्वतःच्या मृत्यूला जितके घाबरत नाही, तितके आपल्या आप्त जनांच्या मृत्यूला घाबरतो. त्यांच्या नंतर आपलं काय, हा विचार जास्त क्लेशदायक असतो. पण दुःखाचा आवेग ओसरला, की आयुष्य पूर्व पदावर येतं आणि पुढे मागे आपणही या प्रवासाचे प्रवासी होतो.

आपला मृत्यू आपण स्वीकारला नाही, तरी तो येणारच आहे, कधी ते माहीत नाही, पण येणार हे नक्की! ज्योतिष असो वा विज्ञान मृत्यूची पूर्वकल्पना देऊ शकत नाही. अशात आपल्या हाती राहतं, ते जीवनाचा भरभरून आस्वाद घेणं. दुःखं, संकटं येतच राहणार, वाईट घटना घडतच राहणार, पण खरा कस तेव्हा लागतो, जेव्हा आपण सहजतेने त्यांचा स्वीकार करतो. नव्हे, तो करावाच लागतो.

प्रत्येक कलाकार कार्यक्रमाआधी आपले सादरीकरण कसे होईल याचा पूर्व विचार करतो आणि त्यादृष्टीने तयारी करतो. तशी तयारी या शेवटच्या कार्यक्रमाची आपण केली पाहिजे. शेवटचा शो हिट झाला पाहिजे, असं वाटत असेल, तर संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचावं लागतं. 

अंत्य यात्रेत किती गर्दी होती, यावरून गेलेल्या व्यक्तीची लोकप्रियता कळते. आता आपल्या वेळी किती डोकी जमतील, याचा हिशोब आपण करायला हवा. जसा कठीण पेपर गेल्यावर किमान पास होण्यापूरते मार्क आपल्याला मिळतील की नाही, याचा आपण हिशोब करतो, अगदी तसा! म्हणजे उर्वरित पेपरवर चांगला जोर मारता येतो. 

आपल्या पश्चात कोणी चांगलं बोललं नाही, तरी चालेल, पण कोणी वाईट बोलता कामा नये, यासाठी आपली वागणूक आतापासून सुधारायला हवी. अशा वेळी बाबांचा मंत्र आठवतो, कोणी मित्र नसलं तरी चालेल, पण एकही शत्रू नको! मनुष्य चांगल्या चारित्र्याचे सर्टिफिकेट लोकांकडून मिळावे, यासाठीच आयुष्यभर खस्ता खात असतो.

आपण जे कमावतो, त्यापैकी आपल्या सोबत काहीच येणार नाही. हे सत्य स्वीकारून उर्वरित आयुष्यात लोकांसाठी किती आणि स्वतः साठी किती जगायचं, याचं गुणोत्तर ठरवायला हवं. आपल्या पश्चात आपण लोकांकडे फक्त चांगल्या आठवणींचा ठेवा देऊन जाऊ शकतो. बाकी गोष्टी चेक इन होताना यमराज काढून घेतात. त्यामुळे अपेक्षांचं लगेज वेळीच कमी केलेलं बरं!

लिहिण्यासारखं काहीतरी करून जा किंवा जाण्यापूर्वी काहीतरी लिहून जा, असं कोणीतरी म्हटलेलं आहे. यापैकी आपली कॅटेगरी लक्षात ठेवून कामाला लागायला हवं. 

आपल्या मरणाने कोणाच्या डोळ्यात आपसूक पाणी आलं, तर ती आपली खरी कमाई. ते वैभव बघायला आपले डोळे उघडे नसतील, पण जमलेले लोक आपली श्रीमंती बघून नक्कीच हेवा करतील. प्रत्येकाला जायचं तर आहेच, मग मरेपर्यंत दिलखुलास जगा आणि जगू द्या!

Web Title: Dasnavami 2025: Everyone fears death, learn the mantra to overcome it from the experts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.