दत्त गुरुंचे चोवीस गुरु : पर्वत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 08:12 PM2020-12-12T20:12:11+5:302020-12-12T20:12:25+5:30

पर्वताकडून अवधुताने परोपकार हा गुण घेतला आहे. रत्नादि पदार्थ, गवत, पाणी आणि इतर नाना पदार्थ पर्वतावर सापडतात. पण हे सगळे केवळ परोपकारासाठीच तो बाळगतो.

Datta Guru's Twenty-Four Guru: Mountain! | दत्त गुरुंचे चोवीस गुरु : पर्वत!

दत्त गुरुंचे चोवीस गुरु : पर्वत!

Next

गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही चोविस गुरुंचा देवदत्त परुळेकर यांच्या लेखणीतून आजपासून दत्तजयंतीपर्यंत रोज थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल. 

अवधुताचा पहिला गुरु 'पृथ्वी' या पृथ्वीवर असलेले पर्वत व वृक्ष यांनाही अवधुताने गुरु मानले आहे. पर्वताकडून अवधुताने परोपकार हा गुण घेतला आहे. जो स्वत:साठी, केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी जगला, त्याचे जगणे कसले? जो दुसऱ्यासाठी जगला तोच खरा जगला. परोपकार हा गुण पर्वताकडून आपण कसा शिकलो याचे नाथांनी सुंदर वर्णन केले आहे.

हेही वाचा : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण- दत्तगुरुंचे चोवीस गुरु; लेखमाला!

रत्न निकर समस्त, पर्वत परार्थीच वाहत,
वृणजळ नाना अर्थ, तेही परार्थ धरितसे।
कोणासी नेमी ना निवारी, उबगोनि न घाली बाहेरी।
याचकाचे इच्छेवरी, परोपरकारी देतसे।
ग्रीष्माअंती सर्व सरे, परी तो देता मागे न सरे।
सवेचि भगवंते की जे पुरे, वर्षोनि जळधरे समृद्धी।

रत्नादि पदार्थ, गवत, पाणी आणि इतर नाना पदार्थ पर्वतावर सापडतात. पण हे सगळे केवळ परोपकारासाठीच तो बाळगतो. पर्वत कोणाला या म्हणत नाही, नको म्हणत नाही किंवा कंटाळून कोणाला बाहेर घालवीत नाही. याचकाची जी इच्छा असेल ती परोपकारबुद्धीने तो पूर्ण करतो. ग्रीष्मऋतुु संपताना त्यावरील गवत, पाणी, धान्य वगैरे सगळे संपून जाते. पण याचकाला देताना तो मागे सरत नाही. म्हणून भगवंत देखील लागलीच मेघवृष्टी करून त्याला समृद्ध करून सोडतो.

या ठिकाणी नाथांनी 'दातृत्वाबद्दल' एक महत्त्वाचे रहस्य सांगितले आहे. आपण देत राहिले की आपल्याला मिळत राहते. नेहमी मागत राहणाऱ्याला कधी मिळत नाही. देण्याने धन, संपत्ती, विद्या, ज्ञान सर्व वाढते. कारण देणाऱ्याची काळजी भगवान स्वत: घेतो.

जंव जंव उल्हासे दाता देतु, तंव तंव पुरवी जगन्नाथु।
विकल्प न धरिता मनाआतु, देता अच्युतु अनिवार।

खरा दाता जसजसा उल्हासाने दान देऊ लागतो, तसतसा भगवंत त्याला पाठपुरवठा करीत जातो. मनात विकल्प धरला नाही, शंका घेतली नाही, तर भगवंत अनिवारपणे दाता होतो. खरा दाता तर भगवंतच आहे. या विश्वाचा खरा मालक, खरा स्वामी कोण? भगवंतच खरा मालक नव्हे काय? आपण कोणीही हे दान देता ते भगवंतानेच आपल्याला दिले आह. मन देताना हात मागे का घेता? नाथ म्हणतात, भगवंत खरा दाता आहे, हे संशयाने पछाडलेल्या लोकांना पटत नाही. म्हणून त्यांना दारिद्र्य भोगावे लागते.'

हेही वाचा : दत्तगुरुंच्या चोवीस गुरुंपैकी पहिला गुरु : पृथ्वी!

Web Title: Datta Guru's Twenty-Four Guru: Mountain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.