दत्त गुरुंचे चोवीस गुरु : तिसरे गुरु : वायू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 03:51 PM2020-12-14T15:51:14+5:302020-12-14T15:51:40+5:30
ब्रह्मादिकों देह पाळावे व डुकरादिकांचे टाळावे, अशी विषम दृष्टी वायूची नसते. राजाचा देह आवडीने प्रतिपाळावा व भिकाऱ्याचा देह टाळावा, असा भेद प्राणाच्या ठायी नसतो. तसाच योगी देखील उच्चनीच, वर्णावर्ण आणि उत्तम अधम गुणावगुण पाहून आपला समभाव सोडत नाही. असा समभाव धारण करण्यासाठी वायुला गुरु करावे.
गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही चोविस गुरुंचा देवदत्त परुळेकर यांच्या लेखणीतून आजपासून दत्तजयंतीपर्यंत रोज थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल.
हेही वाचा : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण- दत्तगुरुंचे चोवीस गुरु; लेखमाला!
पृथ्वी आणि पर्वत यानंतर अवधूताचा पुढचा गुरु आहे, `वायु'. या वायुगुरुचे दोन प्रकार वर्णिले आहेत. देहस्थ प्राण वायु आणि बाह्य वायु. देहस्थ प्राणवायुकडून आहारादि बाह्य विषयामध्ये अनासक्तीचे शिक्षण घेतले असे अवधुत सांगतो. हे सांगताना कोणतीही साधना करणाऱ्या विद्यार्थ्याने आहार विहाराचे नियंत्रण कसे करावे, हे नाथांनी सुंदर सांगितले आहे. प्राणाच्या व्यापारामुळे भूक लागते. भुकेने प्राण क्षोभतो. त्यामुळे काया, वाचा, मन, इंद्रिये अशक्त अकार्यक्षम होतात. त्या वेळी प्राणरक्षणापुरता कसलाही आहार मिळाला तरी तो गोड आहे का नाही, हा विचार प्राणी करत नाही. त्याप्रमाणे योगी देहाची अहंता धरीत नाही. विषय सेवन केल्यावर प्राणाला जसा अहंकार उत्पन्न होत नाही, तसा योग्याला पण होत नाही. साधकाचा, विद्यार्थ्याचा आहार कसा असावा पहा-
क्षुधेचिया तोंडा, मिळो कोंडा अथवा मांडा,
परी रसनेचा पांगडा, न करी धडफुडा तयासी,
ज्ञानधारणा न ढळे, इंद्रिये नव्हती विकळे,
तैसा आहार युक्तिबळे, सेविजे कवळे निजधैर्ये।
भुकेच्या तोंडाला कोंडा मिळो की मांडा मिळो, योगी रसनेचा अंकित होत नाही. ज्ञानधारणा ढळणार नाही आणि इंद्रिये विकल होणार नाहीत अशा युक्तीने व धीरपणे योगी आहार सेवन करतो. समता वर्तावी हे पारमार्थिक जीवनाचे एक मुख्य ध्येय आहे. प्राणवायूकडून अवधुताने समत्व हा गुण ग्रहण केला आहे.
ब्रह्मादिकांचा देह पाळू, का सूरकरादिकांचा देह टाळू,
ऐसा न मानीच विटाळू, प्राणू कृपाळू देहभावे।
ब्रह्मादिकों देह पाळावे व डुकरादिकांचे टाळावे, अशी विषम दृष्टी वायूची नसते. राजाचा देह आवडीने प्रतिपाळावा व भिकाऱ्याचा देह टाळावा, असा भेद प्राणाच्या ठायी नसतो.
तैसे उंच नीच वर्ण, अधमोत्तमादि गुणागुण,
देखोनिया यागी आपण, भावना परिपूर्ण न सांडी।
तसाच योगी देखील उच्चनीच, वर्णावर्ण आणि उत्तम अधम गुणावगुण पाहून आपला समभाव सोडत नाही. असा समभाव धारण करण्यासाठी वायुला गुरु करावे.
हेही वाचा : आधी गुरुपारख, मगच गुरुसेवा!