Datta Jayanti 2022: गुरुचरित्राचे पारायण सुरु करायचे असेल तर दत्तजयंतीपूर्वीची हीच ती वेळ; वाचा सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 01:04 PM2022-11-30T13:04:00+5:302022-11-30T13:04:25+5:30

Datta Jayanti 2022: गुरु चरित्राचे पारायण चार पद्धतीने केले जाते, पैकी दत्त जयंतीपूर्वीचे वाचन कसे करावे ते जाणून घेऊ!

Datta Jayanti 2022: Before Datta Jayanti is the time to start recitation of Gurucharitra; Read the detailed information! | Datta Jayanti 2022: गुरुचरित्राचे पारायण सुरु करायचे असेल तर दत्तजयंतीपूर्वीची हीच ती वेळ; वाचा सविस्तर माहिती!

Datta Jayanti 2022: गुरुचरित्राचे पारायण सुरु करायचे असेल तर दत्तजयंतीपूर्वीची हीच ती वेळ; वाचा सविस्तर माहिती!

googlenewsNext

आपल्या भारतात अनेक धार्मिक संप्रदाय आहेत. त्यात दत्तसंप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय आहे. यालाच अवधूत संप्रदाय असेही संबोधले जाते. दत्तात्रेय हे त्याचे आराध्य दैवत होय. ७ डिसेंबर रोजी दत्त जयंती (Datta Jayanti 2022)आहे. ज्यांना त्या निमित्ताने गुरुचरित्राचे वाचन करायचे आहे, त्यांच्यासाठी ही सविस्तर माहिती!

केशवतनय लिहितात, दत्तगोरक्ष संवाद, सह्याद्री वर्णन, सह्याद्री महात्म्य, दत्तभार्गव संवाद इ. दत्त संप्रदायाचे मान्यताप्राप्त ग्रंथ असून या शिवाय दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा शके १४८० च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच श्रीगुरुचरित्र. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे. वारकऱ्यांना जसे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे ग्रंथ प्रिय, रामदासी पंथीयांना जसा दासबोध प्रिय, तसा दत्तभक्तांना श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. 

या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे, याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. प.पू. टेंबेस्वामी महाराज सांगत असत, की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही, तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या.

धर्मरक्षणाचे कार्य : ज्ञानेश्वरीनंतर तब्बल २५० वर्षांनंतर सिद्ध झालेल्या श्रीगुरुचरित्रात या बदललेल्या परिस्थितीची दखल घेतली गेलेली आहे. श्रीगुरुचरित्राच्या ५० व्या अध्यायात सार्वभौमस्फोटकशमनाच्या निमित्ताने मुसलमान राजाची कथा सांगितली आहे. 

कठिण दिवस युगर्ध, म्लेच्छ राज्य क्रूरकर्मा,
प्रकट असता घडे अधर्म, समस्त म्लेच्छ येथे येती।

असाही निर्देश याच अध्यायात आहे. अशा प्रसंगी धर्माधर्मात फारशी कटुता न वाढावी आणि हिंदू धर्माचे व समाजाचे परधर्मीयांपासून संरक्षण व्हावे, या उदात्त व थोर हेतूने श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांनी जे धर्मरक्षणाचे कार्य केले, त्याचे दर्शन श्रीगुरुचरित्रातून प्रकर्षाने घडते. 

या दिव्य ग्रंथाचे पारायण कसे करावे?

एखाद्या धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथाचे ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने, अत्यंत श्रद्धापूर्वक वाचन करणे यालाच `पारायण' म्हणतात. पारायण नेहमी निष्काम असावे. परमेश्वराची उपासना नेहमी निष्काम भावनेने करावी. कारण भोग संपवण्यासाठी, कमी करण्यासाठी पारायण करू नये. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. पारायणामुळे भोग संपवण्याची ऊर्जा मिळते. म्हणून साधकाने निष्काम मनाने पारायण कराव़े

गुरुचरित्राचे चार पद्धतीने वाचन केले जाते: 

काही दत्तभक्त रोज ठराविक ओव्या म्हणजे ५१ किंवा १०० ओव्या वाचतात. काही जण वेळेअभावी फक्त पाच ओव्या वाचतात. काही जण वर्षातून एकदाच पारायण करतात. हे पारायण एक दिवसाचे, तीन दिवसांचे विंâवा सात दिवसांचे करण्याची पद्धत आहे. यापैकी एक दिवसाचे पारायण करू नये. कारण त्यासाठी तब्बल १४-१५ तास लागतात आणि सहाजिकच एवढा वेळ एका अवस्थेत मांडी घालून बसणे, यासाठी मनाची एकाग्रता साधली जात नाही. परिणामी हेतू साध्य होत नाही. तीन दिवसांच्या पारायणात पहिल्या दिवशी ज्ञानकाण्ड, दुसऱ्या दिवशी कर्मकाण्ड आणि तिसऱ्या दिवशी भक्तिकाण्ड अशी विभागणी केलेली असते. सप्ताह म्हणजे सात दिवसाचे पारायण सर्वच दृष्टीने सोयीचे ठरते. महिलांनीदेखील या ग्रंथाचे वाचन केले तरी चालते. सोयर, सुतक आणि मासिक धर्म टाळून ग्रंथवाचन करावे.

अध्याय वाचनाचा क्रम : सप्ताहाच्या काळात दररोज किती अध्याय वाचावेत, याबाबत एकवाक्यता आढळत नाही. प. पू. टेंबेस्वामींच्या मते हा क्रम ७, १८,२८,३४, ३७, ४१, ५१ असा ठेवावा. 

ज्यांना वर्षातून एकदाच पारायण करायचे असेल, त्यांनी दत्तजयंतीपूर्वी सात दिवस अगोदर सुरु करावे व दत्तजयंतीच्या दिवशी संध्याकाळी दत्तजन्माचा फक्त चौथा अध्याय वाचावा. 

औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर, कारंजा, कुरवपूर, पीठापूर इ. दत्तक्षेत्रात, सत्पुरुषांच्या समाधी स्थानावर किंवा औदुंबराच्या वृक्षाच्या खाली श्रीगुरुचरित्राचे वाचन केल्यास अतींद्रिय अनुभव येतात, असे भाविकांनी वेळोवेळी नोंदवले आहे. 

 

Web Title: Datta Jayanti 2022: Before Datta Jayanti is the time to start recitation of Gurucharitra; Read the detailed information!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.