Datta Jayanti 2022: दत्त गुरूंचा पवित्र ग्रंथ गुरुचरित्र वाचण्याआधी 'हे' वीस नियम वाचून, समजून घ्या मगच सुरुवात करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 01:09 PM2022-11-30T13:09:29+5:302022-11-30T13:09:49+5:30

Datta Jayanti 2022: ७ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती आहे. त्यानिमित्त कोणाला सात दिवसात गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तर त्यांच्यासाठी ही नियमावली!

Datta Jayanti 2022: Before reading Datta Guru's holy book Gurucharitra read, understand 'these' twenty rules and then start! | Datta Jayanti 2022: दत्त गुरूंचा पवित्र ग्रंथ गुरुचरित्र वाचण्याआधी 'हे' वीस नियम वाचून, समजून घ्या मगच सुरुवात करा!

Datta Jayanti 2022: दत्त गुरूंचा पवित्र ग्रंथ गुरुचरित्र वाचण्याआधी 'हे' वीस नियम वाचून, समजून घ्या मगच सुरुवात करा!

googlenewsNext

श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने  आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे, याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. प.पू. टेंबेस्वामी महाराज सांगत असत, की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही, तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या.

Datta Jayanti 2022: गुरुचरित्राचे पारायण सुरु करायचे असेल तर दत्तजयंतीपूर्वीची हीच ती वेळ; वाचा सविस्तर माहिती!

तीन दिवस, सात दिवस किंवा नित्य ५ ओव्यांचे पारायण करतानादेखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे. ते नियम कोणते, याबाबत केशवतनय माहिती देतात-

१. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आन्हिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते, त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून, त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे, असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले, तरी श्रीदत्तात्रेयदेवता प्रीत्यर्थ किंवा श्रीदत्तात्रेयदेवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा.

२. नंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

३. वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे. 

४. वाचनापूर्वी संध्या व १०८ गायत्री जप अवश्य करावा.

५. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे.

६. वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे.

७. वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये, मध्येच कुणाशी बोलू नये.

८. पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी.

९. कायिक, वाचिक, मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे.

१०. या सात दिवसांत दाढी करू नये. तसेच केस व नखे कापू नयेत.

११. पारायण काळात तिखट, मीठ, आंबट, कांदा, लसूण, परान्न कटाक्षाने टाळावे. एकभूक्त राहावे. सायंकाळी दूध प्यावे.

१२. जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हाव़े 

१३. समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा. 

१४. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा. 

१५. रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी. 

१६. वाचनात यांत्रिकपणा नको. मनोभावे वाचन करावे. 

१७. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मधेच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने `यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो.' असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच, सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा.

१८. या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळावा, तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकिकत आली असेल, त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये. ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते, तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे. 

१९. स्त्रियांनीदेखील आपला मासिक धर्म पार पाडून शुचिर्भूत होऊन श्रीदत्तचरित्राचे पारायण करावे.

२०. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे, इप्सित फळ आपोआप मिळते, असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. 

 

Web Title: Datta Jayanti 2022: Before reading Datta Guru's holy book Gurucharitra read, understand 'these' twenty rules and then start!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.