Datta Jayanti 2022: आजपासून दत्त नवरात्र प्रारंभ; दत्त उपासना अवघड नाही, ती सोपी करून सांगताहेत संत तुकोबाराय!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 07:02 AM2022-12-01T07:02:26+5:302022-12-01T07:02:49+5:30
Datta Jayanti 2022: दत्त उपासना म्हटली की अनेकांच्या मनात सोवळ्या ओवळ्याची भीती निर्माण होते, संत तुकाराम महाराज ती भीती दूर करून उपासनेचा सोपा मार्ग दाखवतात.
आजपासून दत्त नवरात्र सुरु होत आहे. मार्गशीर्ष अष्टमी ते पौर्णिमा अर्थात तारखेनुसार यंदा १ ते ८ डिसेंबर २०२२ या दरम्यान दत्त नवरात्र साजरी केली जाईल. श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाला प्रारंभ होईल. श्री गुरुचरित्राचे पठण करणे, हे एक व्रत आहे. व्रत म्हटले की आचार-विचारांची शुद्धता आली. पावित्र्य जपण्याची जबाबदारी आली. अनेकांना या कारणांसाठी गुरुभक्ती करताना काही उणिवा राहून जातील, अशी भीती वाटते. मात्र ही भीती वाटण्याचे कारणच नाही. कारण ती गुरुमाऊली आहे. जी आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवते. तिथे फक्त अनन्यभावे शरण जाणे अपेक्षित असते. जसे तुकाराम महाराज दत्त गुरूंना शरण गेले.
तीन शिरे सहा हात। तया माझा दंडवत ॥
काखे झोळी पुढे श्वान। नित्य जान्हवीचे स्नान ॥
माथा शोभे जटाभार। अंगी विभूती सुंदर ॥
शंखचक्रगदा हाती। पायी खडावा गर्जती ॥
तुका म्हणे दिगंबर। तया माझा नमस्कार ॥
संत तुकोबारायांनी केलेले श्री दत्ताचे हे सार्थ वर्णन ऐकून तत्क्षणी डोळ्यासमोर उभी राहते, ती श्रीदत्ताची सुंदर मूर्ती. संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्रीदत्त. भक्तांनी हाक देताच हजर होणारे म्हणून हे दत्त. श्री दत्त हे अत्रीऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय. ज्या मातेला कुणाविषयीच राग.. व्देष.. असूया नाही ती 'अनसूया' अशा मातेचे हे पुत्र. कुणाविषयी असूया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र. मग याच अनसूयेच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखविणारा आनंद जन्मतो.
श्री गुरुसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी !!" याच विश्वासाने जगतांना हा प्रचंड आत्मविश्वास देणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांच्या चरणाशी भक्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणास बसले आहेत. दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच. परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्तगुरु. रज, सत्व, तम या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे श्री दत्तगुरु. अशा दत्त गुरूंच्या सेवेत श्री गुरुचरित्राचे पठण जरी करता आले नाही, तरी दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून मागणे मागायचे,
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो,
दत्ता दिगंबरा याहो सावळ्या मला भेट द्या हो,
दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो।