Datta Jayanti 2023:दत्त उपासनेइतकीच दत्त जन्माची कथाही तेवढीच प्रासादिक; आज वेळ काढून वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 07:00 AM2023-12-26T07:00:00+5:302023-12-26T07:00:02+5:30

Datta Jayanti 2023: आज दत्त जयंती, त्यानिमित्ताने दत्त उपासना आपण करालच, त्याबरोबर दत्त जयंतीची जन्मकथा वाचणेही तेवढेच गरजेचे आहे!

Datta Jayanti 2023: The story of Datta birth is as grand as Datta worship; Take the time to read today! | Datta Jayanti 2023:दत्त उपासनेइतकीच दत्त जन्माची कथाही तेवढीच प्रासादिक; आज वेळ काढून वाचाच!

Datta Jayanti 2023:दत्त उपासनेइतकीच दत्त जन्माची कथाही तेवढीच प्रासादिक; आज वेळ काढून वाचाच!

दत्त जन्माची कथा  :

अतिशय महान तपस्वी अत्री ऋषी यांची पत्नी अनुसूया अतिशय सद्गुणमंडित होती. तिच्या पतिव्रतेची चर्चा थेट इंद्रलोकात होऊ लागली. तत्कालीन व्यवस्थेनुसार ज्याचे पुण्य जास्त त्याला इंद्रपद मिळत असे. अनुसूयेच्या पतिव्रतेचे तेज पाहून इंद्रदेवाला भीती वाटू लागली. त्याने तिनही देवांकडे धाव घेतली आणि आपले इंद्रपद धोक्यात आहे असे सांगितले. 

योगायोगाने तिनही देव कैलासावर एकत्र जमले होते. इंद्रदेव तिथे पोहोचले आणि त्यांनी आपली व्यथा तिघांसमोर मांडली. तीनही देवांबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नीदेखील तिथे उपस्थित होत्या. एका स्त्रीसमोर दुसऱ्या स्त्रिचे कौतुक कोणत्याही स्त्रिला सहन होत नाही. अनुसूयेचे कौतुक ऐकताच, तिघींनी कान टवकारले. कोण आहे ती, हे जाणून घेण्यासाठी नारदाला बोलावून घेतले. 

तीनही देवस्त्रियांची उत्सुकता पाहून नारद महर्षी अनुसूयेचे आणखीनच रसभरित वर्णन करू लागले. तिघींचे रागरंग बदलू लागले. एका क्षणाला त्यांनी नारदाला हटकले व म्हणाल्या, `पुरे झाले कौतुक. आम्हा तिघींपैकी कोणी स्त्री या विश्वात श्रेष्ठ असूच शकत नाही.' यावर नारद म्हणाले, `ठीक आहे, घ्या तिची परिक्षा!'

तिघी एकासूरात `घेणारच' असे म्हणाल्या आणि तिघींनी त्रिदेवांकडे कटाक्ष टाकला. तिघींनी फर्मान सोडले, `आता ताबडतोब जा आणि कोण अनुसूया आहे, तिची परीक्षा घ्या.' त्रिदेवांनी समजूत काढली, पण कोणी ऐकायला तयार होईना. बायकोचा हट्ट पुरवावा लागणार अशी चिन्हे दिसू लागल्यावर, भगवान विष्णूंनी ध्यान लावून पाहिले. अत्रि ऋषी आश्रमात नाहीत, हीच वेळ जाण्यासाठी योग्य आहे, अन्यथा कितीही वेशांतर करून गेलो, तरी ते आपल्याला निश्चित ओळखतील, हे विष्णूंना ठाऊक होते. त्रिदेव जाण्यासाठी निघाले, तोच त्यांच्या पत्नी म्हणाल्या, `साधी परीक्षा नाही, सत्वपरीक्षा घ्या!'

देवींना काय सुचवायचे आहे हे लक्षात घेऊन त्रिदेव अलख निरंजन म्हणत साधूंच्या वेषात अत्रि ऋषींच्या आश्रमाबाहेर आले. अतिथींचा आवाज ऐकताच अनुसूया जोंधळे घेऊन अन्नदान करायला बाहेर आली. त्या तेज:पूंज अतिथींना पाहून स्तिमीत झाली. ती दान देणार, तेवढ्यात विष्णूंनी तिला विवस्त्र होऊन अन्न द्यावे, अशी मागणी केली. 

एका पतिव्रतेकडे अशी मागणी करण्याचे धाडस कोणत्या साधूंमध्ये असावे? असा विचार करत अनुसूयेने अत्रि ऋषींचे स्मरण केले. तिला अतिथी धर्म चुकवायचा नव्हता, तसेच विवस्त्र होऊन पातिव्रत्यही भंग होऊ द्यायचे नव्हते. या समस्येचा मध्य काढताना अनुसूया मनातल्या मनात म्हणाली, अशी मागणी करणारे सामान्य साधू नाहीत. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी मी विवस्त्र होईन, पण त्यांनीदेखील माझे बाळ झाले पाहिजे, कारण त्यांनी भिक्षा मागताना माझा उल्लेख माते असा केला होता.' अशा विचाराने तिने आपल्या पतीचरणांचे उदक घेऊन अतिथींवर शिंपडले आणि तिच्या तपसामर्थ्याने ती तिघेही बालके झाली. त्यांना पाहून अनुसूयेचा वात्सल्याने ऊर भरून आला. तिने शर्थ पूर्ण केली आणि बालकांचे पोट भरल्यावर पाळणा बांधून झोपवले. अत्रि ऋषी परत आल्यावर तिने सगळी हकीकत सांगितली.

स्वर्गलोकात तिनही देवस्त्रिया पतीची वाट पाहू लागल्या. नारद महर्षींनी सर्व वृत्त कथन केले. आपले पती आता मोठे झाल्यावर परत येणार हा विचारच त्यांना सहन झाला नाही. अनुसूयेच्या पतीव्रतेसमोर तिघी जणी नतमस्तक झाल्या. आपला अहंकार दूर ठेवून त्या अनुसूयेला शरण आल्या आणि आपला पती परत मागू लागल्या. अनुसूयेने पती चरणोदक शिंपडून बाळांना पूर्ववत केले परंतु तिचा पाळणा रिकामा झाला. तेव्हा, तिच्यावर प्रसन्न होऊन तीनही देवांनी अनुसूयेच्या उदरी जन्म घेणार असा आशीर्वाद दिला. त्यानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला सूर्यास्ताच्यावेळी (सायंकाळी ६.४०) दत्तात्रेयांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांचा अंश चंद्र, विष्णूंचा अंश दत्तात्रेय आणि शंकराचा अंश दूर्वास अशी तिनही बालके अनुसूयेच्या आणि अत्रि ऋषींच्या छत्रछायेत वाढू लागली.

Web Title: Datta Jayanti 2023: The story of Datta birth is as grand as Datta worship; Take the time to read today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.