दत्त जयंती: गुरुचरित्रातील ‘या’ ११ गोष्टी कालातीत; आजही येतो अनुभव, दत्तगुरुंचा उपदेश काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:57 IST2024-12-05T14:54:41+5:302024-12-05T14:57:39+5:30

Datta Jayanti 2024 Guru Charitra: गुरुचरित्राचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असेच आहे. जाणून घ्या...

datta jayanti 2024 know about what exactly does gurucharitra teach us and these 11 things are timeless dattaguru updesh in guru charitra | दत्त जयंती: गुरुचरित्रातील ‘या’ ११ गोष्टी कालातीत; आजही येतो अनुभव, दत्तगुरुंचा उपदेश काय?

दत्त जयंती: गुरुचरित्रातील ‘या’ ११ गोष्टी कालातीत; आजही येतो अनुभव, दत्तगुरुंचा उपदेश काय?

Datta Jayanti 2024 Guru Charitra: मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी ०४ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत असून, १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२ वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त संप्रदायात गुरुचरित्रण पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरुंची विशेष कृपा होते, अशी मान्यता आहे.

कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे, अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते, असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते. श्रीगुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. तसेच दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे, असे म्हटले जाते.

अत्यंत प्रासादिक ग्रंथ

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.  १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला, असे सांगितले जाते. श्री गुरूंच्या चारित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून अल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे. गुरुचरित्रातील अनेक शिकवणी, उपदेश अगदी कालातीत असून, आजही याची अनुभूती घेऊ शकतो, असे सांगितले जाते. 

गुरुचरित्र उपदेशातून आपल्याला नेमके काय शिकायला मिळते?

१. आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते.

२. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते.

३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते.

४. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. 

५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. 

६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे.

७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही.

८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले.

९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते.

१०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दरवेळी एकाच रुपात येत नाहीत. 

११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ||

|| श्री गुरुदेव दत्त ||
 

Web Title: datta jayanti 2024 know about what exactly does gurucharitra teach us and these 11 things are timeless dattaguru updesh in guru charitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.