दत्त जयंती: गुरुचरित्राची फलश्रुती, सर्व ५२ अध्यायातून काय प्राप्त होते? पाहा, संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:57 IST2024-12-06T13:53:42+5:302024-12-06T13:57:25+5:30
Datta Jayanti 2024 Guru Charitra: गुरुचरित्रातील सर्वच अध्याय प्रभावी असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...

दत्त जयंती: गुरुचरित्राची फलश्रुती, सर्व ५२ अध्यायातून काय प्राप्त होते? पाहा, संपूर्ण यादी
Datta Jayanti 2024 Guru Charitra: मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी ०४ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत असून, १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२ वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त संप्रदायात गुरुचरित्रण पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरुंची विशेष कृपा होते, अशी मान्यता आहे.
कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे, अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते, असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. तुम्ही-आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की, सुख-दु:ख आलेच! मग सुखप्राप्ती व्हावी आणि दु:खनिवृत्ती व्हावी ही सर्वाचीच अपेक्षा असते. श्रीगुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे. मनोकामना तर पूर्ण होताच पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वास्तू यांतील बाधाही नाहीशी होते. दर्शन कसे घडते? तर सप्ताह काळात वा सप्ताहाचे शेवटी, तसेच ग्रंथ पठण-श्रवण-लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झाले की, बहुधा नैवेद्याचे वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
सर्व ५२ अध्यायातून काय प्राप्त होते? श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती
- अध्याय १: नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
- अध्याय २: कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
- अध्याय ३: गुरुकोपाचे शमन होते. व्रताची पूर्तता होते.
- अध्याय ४: स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
- अध्याय ५: शारीरिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
- अध्याय ६: दैवी कोप दूर होतो. विद्या प्राप्ती होते.
- अध्याय ७: पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
- अध्याय ८: बुद्धिमांद्य नाहीसे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
- अध्याय ९: सर्व शुभ कामना गुरु कृपेने पूर्ण होतात.
- अध्याय १०: नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
- अध्याय ११: वाचा दोष तसेच वेड नाहीसे होते.
- अध्याय १२: संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
- अध्याय १३: सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
- अध्याय १४: प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
- अध्याय १५: तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
- अध्याय १६: आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
- अध्याय १७: ज्ञान व गुरु कृपा यांचा लाभ होतो.
- अध्याय १८: संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
- अध्याय १९: भाग्य वृद्धी होते. सद्गुरुंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातर पुण्य लाभते.
- अध्याय २०: गुरू स्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
- अध्याय २१: मृत्यू भयापासून मुक्तता .
- अध्याय २२: वांझपण दूर होते.
- अध्याय २३: पिशाच्च बाधा नष्ट होते. राज मान्यता प्राप्त होते.
- अध्याय २४: भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनःशांती लाभते.
- अध्याय २५: अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
- अध्याय २६: शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
- अध्याय २७ : गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती.
- अध्याय २८: वाईट कर्माचे दोष दूत होतात , सतपथ सापडतो.
- अध्याय २९: स्त्री छल दोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
- अध्याय ३०: कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
- अध्याय ३१: पतीवर येणारे विघ्ने टळतात.
- अध्याय ३२: वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
- अध्याय ३३: वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते.
- अध्याय ३४ : प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
- अध्याय ३५ : हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
- अध्याय ३६: चुकीच्या समजुती जाऊन अंत:करण शुद्ध होते.
- अध्याय ३७: मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
- अध्याय ३८: निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
- अध्याय ३९: सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
- अध्याय ४०: रोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
- अध्याय ४१: सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
- अध्याय ४२: विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते.
- अध्याय ४३: गर्व व क्रोध नाहीसा होऊन एश्वर्याची प्राप्ती होते.
- अध्याय ४४: मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
- अध्याय ४५: रोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
- अध्याय ४६: स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
- अध्याय ४७: पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
- अध्याय ४८: गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते. विघ्ने टळतात.
- अध्याय ४९: तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
- अध्याय ५०: ग्रंथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
- अध्याय ५१: सुख, समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
- अध्याय ५२ : श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
|| दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ||
|| श्री गुरुदेव दत्त ||