दत्त उपासना तुलनेत थोडी अवघडच; म्हणून मार्गशीर्षात आहारात पाळली जातात 'ही' पथ्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 02:31 PM2023-12-12T14:31:12+5:302023-12-12T14:31:31+5:30
१३ डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरु होत आहे. तुम्ही दत्त भक्त असाल तर आहारात कोणती पथ्य पाळायची ते जाणून घ्या!
आपल्या धर्मशास्त्राने मांसाहारच काय तर कांदा आणि लसूण सुद्धा वर्ज्य सांगितला आहे. अनेकजण मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि सण उत्सवाला या गोष्टी टाळतात, तर काही जण ठरावीक महिन्यांत या गोष्टींचा त्याग करतात. जसे की मार्गशीर्ष हा दत्त गुरूंना समर्पित असल्याने या महिन्यातही अनेक जण पथ्य पाळतात. पण ती का आणि कशी पाळायची त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
तर प्रश्न येतो, कांदा-लसूण व्यर्ज्य का? 'पलाण्डुभक्षणं पुनरुपनयन्' ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते. म्हणजे कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे सांगण्यात येते. धर्मशास्त्राने कांद्याचा महानिषेध केलेला आढळतो. वास्तविक जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद तसे निषिद्ध आहेत. पण हिंदू धर्मात विशेषकरून कांदा व लसूण हे सर्वथैव त्याज्य मानले जातात.
कांद्याचे शास्त्रीय व मानसशास्त्रीयदृष्ट्या प्रयोग झाले आहेत. कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा असतो. म्हणून कांद्याला मदन म्हटले आहे. विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णासारखे उदरविकार संभवतात. इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे. हृदयरोग्यास लसूण उपकारक मानला जातो. त्याप्रमाणे कांदा उष्णताराहक असल्यामुळे अंगात ज्वराधिक्य झाल्यास पोटावर, मस्तकावर कांद्याचा खिस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात. पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात, त्याचा सर्रास वापर केल्यास ते पकृतीस, संस्कारास, विचारास हानिकारक ठरतात. कांद्याचा वापर सोवळ्याच्या स्वयंपाकात करत नाहीत. नैवेद्य, धार्मिक विधी, व्रतवैकल्य इ. प्रसंगी जेवणात कांदा, लसूण वापरला जात नाही.
उपासाच्या दिवशी तसेच सकाळच्या वेळी कांदा, लसूण टाळणे इष्ट ठरते. कांदा, लसूण सोडा असे सांगणे कदाचित आताच्या काळात शक्य होणार नाही, कारण तो सर्वांच्याच आहाराचा भाग झाला आहे. परंतु आपल्याकडे म्हण आहे त्याप्रमाणे, ऊस गोड लागला, म्हणून तो मूळासकट खाऊ नये. धर्मशास्त्राची बंधने देखील त्यासाठीच आहे. जीभेचे चोचले न संपणारे आहेत. ते पुरवताना हयात खर्च होते. म्हणून योग्य वेळी पारमार्थिक ध्यान लावण्यासाठी, धर्मशास्त्राचे उपदेश जरूर पाळावेत आणि आध्यात्मिक उन्नती करून घ्यावी, हेच योग्य ठरते.