साईबाबांचे अवतार म्हणून परिचित असलेले सत्यसाईबाबा यांची पुण्यतिथी; घेऊया कार्याचा आढावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 07:00 AM2023-04-24T07:00:01+5:302023-04-24T07:00:01+5:30
जनसामान्यांसाठी मदत करणारे अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेले सत्यसाईबाबा यांचे आजही जगभरात मोठ्या संख्येने अनुयायी आहेत.
सत्य साईबाबा हे अर्वाचीन भारतातील आध्यात्मिक गुरू होते. त्यांचे जगभरात पसरलेले भक्त त्यांना ईश्वरी व्यक्तिमत्त्व आणि शिर्डीच्या साईबाबांचा अवतार मानतात. भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या प्रभावाखाली आलेल्या लोकांमध्ये समाजातील मोठमोठ्या हस्तींचा समावेश होता. राजकारणापासून क्रीडा आणि चित्रपट जगतापर्यंत त्यांना गुरू मानले जायचे. यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्यापासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत त्यांना गुरू मानत होते.
समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. मोफत किंवा अल्पखर्चात शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देत असलेल्या संस्था त्यांच्या प्रेरणेने सुरू झाल्या. २० व्या शतकात आंध्र प्रदेशात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा सत्यसाई बाबांनी ७५० गावांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. बाबांनी आध्यात्मिक शिकवणीसोबतच सामाजिक क्षेत्रातही अनेक सेवाकार्य केले. मानवसेवेला त्यांनी सर्वश्रेष्ठ धर्म म्हटले. याची सुरुवात पुट्टापर्थीमध्ये एका लहानशा हॉस्पिटलच्या बांधकामापासून झाली, जी आता २२० पलंगाची सुपर स्पेशालिटी सत्य साई इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस बनली आहे.
आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे आणि तेच त्यांचे जन्मगावसुद्धा आहे. सत्य साई बाबा यांनी आपल्या हयातीत अनेक चमत्कार केल्याचे म्हंटले जाते. म्हणूनच त्यांनी काही वेळा सुपर ह्युमन म्ह्णून देखील संबोधले जात. लोकांमध्ये फिरताना आपले चमत्कार दाखवत कधी बहुमूल्य हार, अंगठी, दागिने किंवा अंगारा असे सगळे जादुई पद्धतीने प्रस्तुत करणे अनेकदा चर्चच्या आले होते यावरूनच त्यांना टीकेचा देखील सामना करावा लागला होता.
१९४४ मध्ये सत्य साई बाबा यांनी पुट्टपर्थी गावकऱ्यांसाठी एका मंदिराची उभारणी केली होती.आध्यात्मिक बाबींच्या सोबतच सामाजिक कार्यात देखील सत्य साई बाबांचा मोलाचा वाटा होता, मोफत हॉस्पिटल, क्लिनिक, पाणपोई, ऑडिटोरियम, आश्रम, शाळा इत्यादींची बांधणी करून त्यांचा गोरगरिबांना वापर करायला दिल्याने अनेकदा त्यांना देवाचे रूप मानले जायचे.
२०११ साली मार्च मध्ये सत्य साई बाबा यांना श्वसनात त्रास होऊ लागल्यावर पुट्टपर्थी येथील शांतिग्राम श्री सत्य साई सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. यानंतर एकाच महिन्यात त्यांची अवस्था आणखीनच बिकट झाल्याने २४ एप्रिल, २०११ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी देह ठेवला.