२ डिसेंबर : माउलींच्या संजीवनी समाधीचे ७२५ वे वर्ष; यानिमित्त ज्ञानेश्वरी उपक्रम जाणून घ्या व सहभागी व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 12:54 PM2021-11-30T12:54:29+5:302021-11-30T12:54:54+5:30
आजवर आपण अनेकदा ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला असेल, या उपक्रमाच्या निमित्ताने संकल्प सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करूया.
गुरुवार दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२५ वा संजीवनी समाधी सोहळा सुरु होणार आहे. या दिनानिमित्त माउलींच्या अफाट कामाप्रती कृतज्ञता आणि त्यांनी लिहिलेले अमृताचे कण वेचण्याचा प्रयत्न म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अनेक ठिकाणी सुरु होणार आहे. या निमित्ताने आपल्यालाही या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर पुढील सविस्तर माहिती वाचा.
कोल्हापूर येथील ब्राह्मण सभेने ज्ञानेश्वरी पारायणाचा उपक्रम आखला आहे व या उपक्रमात आपले कुटुंबीय इष्ट मित्र नातेवाईक यांनी सहभाग घेऊन या पारायणाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे. या उपक्रमाचे वैशिष्टय म्हणजे आपण घरबसल्या या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहोत. त्यासाठी पुढील नियमावलीचे पालन करावे.
पारायणाचा प्रारंभ ते समारोप- गुरुवार दिनांक २ डिसेंबर २०२१ ते १३ फेब्रुवारी २०२२.
रोज पारायण कसे करावे- रोज क्रमाने १२० ओव्या ७५ दिवस वाचाव्यात. ७६ व्या दिवशी उरलेल्या ३० ओव्या वाचाव्यात. पारायणानंतर रोज पसायदान म्हणावे .शेवटच्या दिवशी ग्रंथपूजन व नैवेद्य दाखवावा.
पारायणाची वेळ -आपल्या सोयीची.
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
आप्पा पाटगावकर - 99 75 911 236
बाळासाहेब पाटील - 88 30 22 34 42
एकनाथ महाराज म्हणतात 'एक तरी ओवी अनुभवावी.' आजवर आपण अनेकदा ज्ञानेश्वरी वाचण्याचा संकल्प केला असेल, या उपक्रमाच्या निमित्ताने संकल्प सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करूया. जय हरी माउली!