Deep Amavasya 2022: दीप अमावस्येला दिव्यांना वस्त्र नेसवून नव्हे तर दिवे उजळून करा दीपपूजा; जाणून घ्या शास्त्रशुद्ध पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:25 PM2022-07-20T12:25:55+5:302022-07-20T12:32:32+5:30

Deep Amavasya 2022: यंदा २८ जुलै रोजी दीप अमावस्या आहे. त्यानिमित्त या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजेची शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेऊया... 

Deep Amavasya 2022: On Deep Amavasya, do Deep Puja by lighting the lamps, not by dressing the lamps; Learn the scientific method! | Deep Amavasya 2022: दीप अमावस्येला दिव्यांना वस्त्र नेसवून नव्हे तर दिवे उजळून करा दीपपूजा; जाणून घ्या शास्त्रशुद्ध पद्धत!

Deep Amavasya 2022: दीप अमावस्येला दिव्यांना वस्त्र नेसवून नव्हे तर दिवे उजळून करा दीपपूजा; जाणून घ्या शास्त्रशुद्ध पद्धत!

googlenewsNext

पुढच्या गुरुवारी २८ जुलै रोजी दीप अमावस्या (Deep Amavasya 2022) आहे. तिलाच दिव्यांची आवस असेही म्हणतात. यादिवशी दिव्यांची पूजा केली जाते. मात्र अलीकडे काही जणांनी आपली कलाकुसर पणाला लावून दिव्यांनाही वस्त्र परिधान करून गौराईसारखे सजवल्याचे फोटो समाज माध्यमांवर बघायला मिळतात. परंतु तसे करणे योग्य नाही. दीप पूजेची शास्त्र शुद्ध माहिती जाणून घेण्याआधी नव्याने सुरू झालेली प्रथा का चुकीची आहे ते आधी जाणून घेऊ. 

लेखक व हिंदू संस्कृतीचे अभ्यासक मकरंद करंदीकर लिहितात, ''दिव्यांना वस्त्र नेसवलेला फोटो गेली २ वर्षे सर्व माध्यमांवर व्हायरल होत आहे. या दोन समया अत्यंत कलात्मकतेने सजविल्या आहेत. गौरी पूजनासाठी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी सजविल्या जातात त्यांची आठवण येते. हे सजविणाऱ्यांचे कौतुकच करायला हवे, परंतु दिव्यांची पूजा ते उजळल्यावर होते. त्यामुळे खरेतर या समयासुद्धा पूजनाआधी उजळायला ( पेटवायला ) हव्यात. पण यात तेल घातल्यावर ते ओघळून नेसविलेल्या साड्यांवर येऊ शकते.अशी तेलात भिजलेली वस्त्रे ही चटकन पेट घेण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे दिव्यांच्या अमावस्येला दीपपूजन करतांना अशा सालंकृत समया किंवा अन्य सालंकृत दिवे उजळू / पेटवू नयेत. कृपया काळजी घ्यावी.अशी सजावट केलेल्या दिव्यांच्या पुढे, अन्य दिवे उजळावेत. भक्ती आणि मांगल्य या दोन्हींची अनुभूती जरूर घ्यावी.'' (Deep Amavasya 2022)

आता जाणून घ्या दीप पूजनाची शास्त्रोक्त पद्धत: 

आपले जे दैनंदिन संस्कार आहेत, त्यात संध्याकाळी देवापुढे समई लावून 'दिव्या दिव्या दिपत्कार...' हा श्लोक म्हणून दिव्याची प्रार्थना करतो. हा संस्कार आजही सर्व कुटुंबात पाळला जातो. तिन्ही सांजेला संस्कारी घरातून `शुभं करोतिचे' मंजुळ सूर कानी पडतात. काही ठिकाणी ही प्रार्थना घरातील लहानथोर मिळून करतात. त्यामुळे अशा घरात रोजच दीपपूजा होते. मात्र ज्या घरांमध्ये असे होत नाही, त्यांनी दीप अमावस्येपासून हा संस्कार अंगवळणी पाडून घ्यावा, असा शास्त्रसंकेत आहे. प्रकाशाचे महत्त्व अंधारात कळते. लाईट गेले की एका मेणबत्तीवर प्रकाशाची भिस्त असते. अशा प्रकाशाची पूजा करून आपले जीवन प्रकाशमयी व्हावे, ही कृतज्ञता या पूजेत आहे.

आषाढी अमावस्येला (Aashadh Amavasya 2022) घरातील सर्व दिव्यांची आरास मांडून पूजा केली जाते. पूर्वी विजेचे दिवे नसल्याने घरात अनेक दिवे असत. आज विजेमुळे घरात समई, निरांजन, पणती असे मोजके दिवे असतात. त्या दिव्यांना स्वच्छ करून, उजळून घ्यावे असे शास्त्रकार सांगतात. अनेक ठिकाणी या दिवशी पिठाचे दिवे प्रज्वलित करून त्यांचीही पूजा केली जाते. 

नित्य व नैमित्तिक पूजेतही दीपपूजन केले जाते. यावरून दीपपूजेचे धार्मिक व सांस्कृतिक असे दोन्हीही दृष्टीने महत्त्व लक्षात येते. दिव्याच्या प्रकाशाने नेहमी अंधाराचे निवारण होते. दिव्याच्या प्रकाशाने वस्तू उजळून निघते. तेजोमय दिसते. म्हणून दिवा हे मांगल्याचे, शुभंकरतेचे प्रतिक आह़े दीपपूजेने आंतरिक अज्ञानही दूर होते. शत्रुबुद्धी नष्ट होते. विकार कुंठित होतात. दिवा हे ज्ञानाचे द्योतक आहे. दीपतेजाने बुद्धी स्थिर राहते. शिवाय ज्ञानाच्या एका दिव्याने हजारो दिवे लावता येतात. विजेचे दिवे कितीही सुंदर व शक्तिशाली असले तरीही त्या दिव्यांनी इतर दिवे प्रकाशित होऊ शकत नाहीत. आपल्या वैदिक संस्कृतीत म्हणून दीपपूजेला मोठे महत्त्व आहे. 

या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते देवापुढे ठेवून दिव्यांभोवती रांगोळ्या काढतात. दिवे तेवूनच त्यांची गंध-फुलं-धूप अर्पून पूजा केली जाते व त्यास मनोभावे नमस्कार केला जातो. दिव्यांना दूध-साखरेचा नैवेद्य दाखवून लाह्या अर्पण केल्या जातात. अशी यथासांग पूजा करून दिव्यांचे तेज आपल्याला मिळून आपले अज्ञान, अंधकारमय आयुष्य उजळून निघावे, अशी प्रार्थना करावी. 

Web Title: Deep Amavasya 2022: On Deep Amavasya, do Deep Puja by lighting the lamps, not by dressing the lamps; Learn the scientific method!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.