Deep Amavasya 2022: दीप अमावस्येला घरातील लहान मुलांना ओवाळण्याची प्रथा का व कशी सुरू झाली? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:41 PM2022-07-21T14:41:55+5:302022-07-21T14:42:22+5:30
Deep Amavasya 2022: दीप अमावस्येला आपल्या घरातील मुलांना तसेच त्यांच्या समवयस्क मित्रांचे औक्षण करावे अशी प्रथा आहे. पण त्यामागचा हेतू काय ते जाणून घेऊ!
यंदा गुरुवारी २८ जुलै रोजी दीप अमावस्या आहे. यादिवशी आपण घरातील सर्व दिवे घासून पुसून लख्ख करालच, त्याबरोबर घरातील लहान मुलांना औक्षण करायला विसरू नका.
आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाचे महत्त्वही वेगवेगळे आहे. अगदी अमावस्येचे महत्त्वही धर्मशास्त्राने अधोरेखित केले आहे. जसे की आषाढ अमावस्या. हा दिवस दिव्याची आवस अशा नावानेही ओळखला जातो. या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते. का, कशासाठी ते पाहू...
भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, फुलवात, वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला `प्राणज्योत' म्हणतात. घरातील मुलांना `वंशाचे दिवे' म्हणातात, इतका हा दीप मानवाशी निगडित झालेला आहे.
दीप म्हणजे काय, तर प्रकाश! जेथे प्रकाश असतो, तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो. अंधार म्हणजे काय? तर संकट आणि दीप म्हणजे काय, तर तेज! जिथे तेज असते, तिथे संकटही घाबरून पळते. असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हर तऱ्हेच्या संकटांवर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी, यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दीव्याने ओवाळले जाते. आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत, यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कारविधी आहे. या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत सापडतो.
या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत सापडतो. यमुनेच्या तीरावर दररोज गाई गुरे मृत्यूमुखी पडत होती. तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले. त्याने यमुनेत उडी टाकून कालियामर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन, त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले. म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दीव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने व त्या दीवशी दीव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस अशी ओळख मिळाली. यासाठीच श्रावणात जिवती पूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पहायला मिळते व तिचे मनोभावे पूजन केले जाते.
चला, तर आपणही आपल्या घरातील लेकरांना, तसेच त्यांच्या मित्रपरिवाराला दीव्यांनी ओवाळून त्यांना दीव्याचे तेज लाभू देत अशी प्रार्थना करूया आणि त्यांच्याही मनात संस्कृतीचे दीप प्रज्वलित करूया.