Deep Amavasya 2023: आषाढ अमावस्येला दुहेरी योग- वाचा, कधी आणि कशी करायची पूजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:21 PM2023-07-13T13:21:02+5:302023-07-13T13:21:47+5:30
Soamavati Amavasya 2023: सोमवारी १७ जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे, तिला आपण दीप अमावस्या असेही म्हणतो; हा योग सोमवारी जुळून आल्याने या तिथीचे महत्त्व वाढले आहे.
आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्या साजरी केली जाते. आषाढी अमावास्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे याला दीप अमावास्या असेही म्हटले जाते. अमावस्येच्या रात्री अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते.
अमावस्या ची सुरुवात नेमकी कधी?
दिनदर्शिकेत १६ जुलै रात्री दहा वाजून सहा मिनिटांनी अमावस्येची तिथी सुरू होणार असे दर्शवले आहे. मात्र अमावस्येची तिथी १७ जुलैचा सूर्योदय पाहणार असल्याने आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या १७ तारखेला साजरी केली जाईल आणि १७ ला मध्यरात्री १२ वाजता अमावस्या संपेल.
आषाढ अमावस्या सोमवारी आल्यामुळे ही दीप अमावस्या सोमवती अमावस्या सुद्धा असणार आहे त्यामुळे ही अमावस्या खास आहे विशेष आहे.
दीपपूजन केल्याने घरात धन धान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे व सोमवती अमावस्या आल्याने त्याला महादेवाच्या उपासनेची जोड देणेही श्रेष्ठ ठरेल.
दीप अमावस्या कशी साजरी करावी
दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी.सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. कणकेचे गोड दिवे (उकडलेले) बनवतात. कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे पक्वान्न म्हणून आणि नैवेद्य म्हणून केले जातात.
अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडले जातात. या सर्वांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृ तर्पण दिलं जातं. या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्ज्वलित करतात. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांन मुक्ती मिळते असे मानले जाते.त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.
सोमवती अमावस्येनिमित्त :
या दिवशी सोमवती अमावस्या आल्याने शंकर मंदिरात जाऊन दीप दान करणे पुण्यदायी ठरेल. तसेच त्या दिवशी सायंकाळी शुचिर्भूत होऊन महादेवाला अभिषेक घालावा किंवा ते शक्य नसल्यास ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करावा!