जिंकणे आणि हरणे हा तर खेळाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 03:02 AM2020-06-23T03:02:32+5:302020-06-23T03:02:49+5:30
‘हे बघ तू जेव्हा जिंकतोस, तेव्हा आई तुला जास्तीचे देते का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ ‘आणि जेव्हा तू हरतोस तेव्हा मी तुला उपाशी ठेवतो का?
-प्रल्हाद वामनराव पै
एक आजोबा आपल्या नातवाबरोबर नेहमी कॅरम खेळत असत. नातू नेहमी जिंकावा म्हणून ते मुद्दाम हरत; पण त्याच्या बाबांबरोबर खेळताना मात्र बाबा त्याला कधी जिंकू देत नसत. तो त्या बाबांबरोबर खेळताना हरायचा. हरल्यामुळे त्याला रडू यायचे. एक दिवस आजोबांनी त्याला समजावले, ‘हे बघ तू जेव्हा जिंकतोस, तेव्हा आई तुला जास्तीचे देते का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ ‘आणि जेव्हा तू हरतोस तेव्हा मी तुला उपाशी ठेवतो का?’ तो पुन्हा म्हणाला, ‘नाही’. मग त्यांनी त्याला सांगितले, ‘जिंकणे आणि हरणे हा खेळाचा परिणाम आहे. तो आपण हसत-हसत स्वीकारला पाहिजे आणि जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा तो खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे, तरच खेळाचा आनंद सतत मिळेल!’ मित्रांनो, क्रिकेटची मॅच संपल्यावर आपण टी.व्ही.वर पाहतो, हरलेल्या संघाचे खेळाडू जिंकलेल्या खेळाडूंचे हसत-हसत अभिनंदन करत असतात. खेळ म्हटला की, कोणीतरी हरणार अन् कोणीतरी जिंकणार! म्हणून हे आपल्याला खिलाडूवृत्तीने स्वीकारता आलं पाहिजे. फुटबॉलचा संघ एकदा जिंकतो. संघातील सगळे खेळाडू आनंद साजरा करत असतात; पण एवढा संघ जिंकूनही त्यातील एक खेळाडू मात्र नाराज असतो, कारण काय? तर त्या विजयी सामन्यात त्याला एकदाही चेंडू टोलवायला मिळालेला नसतो! म्हणजे संघभावनेपेक्षा वैयक्तिक आनंदाचा विचार तो जास्त करत होता. हेसुद्धा खिलाडूवृत्तीच्या अभावामुळेच होतं! मुलांनो, जीवन जगात असताना या खिलाडूवृत्तीची फार गरज असते. कारण अनेकांशी आपला रोज संबंध येत असतो. प्रत्येकाचा स्वभाव, वागणं, बोलणं वेगळं असतं; पण खिलाडूवृत्तीने आलेल्या प्रसंगाचा स्वीकार करायचा असतो. जिंकणं जसं महत्त्वाचं आहे तसंच ‘हरणं’ आनंदाने स्वीकारणंही! रडत स्वीकारलं तर त्रास होणार! हसत स्वीकारलं तर आपला अभ्यास, सराव कुठे कमी पडला, आपलं काय चुकलं, कोणतं ज्ञान मिळविलं पाहिजे, या विचाराने प्रगती नक्की साधाल!