फाशीची शिक्षा मिळूनही प्रधानाने केला जन्मदिवसाचा जल्लोष, आणि शेवटी...!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 05:17 PM2021-06-18T17:17:24+5:302021-06-18T17:17:40+5:30
संकटाच्या भीतीने आताच्या आनंदाचा क्षण गमवू नका. काय सांगावं? ज्या संकटाला घाबरतोय, ते कदाचित आपल्या वाट्याला येणारही नाही!
एकदा एका राज्यात राजाचा न्यायदरबार भरला होता. त्यात एका तुरळक खटल्याचा निवाडा करताना राजाने रागारागात गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली. तो गुन्हेगार त्याचा प्रधान होता आणि त्यादिवशी तो दरबारात गैरहजर होता. राजाने सैनिक पाठवले आणि प्रधानाला सूचना द्यायला सांगितली, 'आज संध्याकाळी ६ वाजता त्याला फाशी सुनावली जाणार आहे, त्याने शिक्षा भोगण्यास तयार राहावे!'
राजाचा निरोप घेऊन सैनिक प्रधानाच्या घरी पोहोचले. तिथे तर कौटुंबिक सोहळा रंगला होता. लोक नाचत गात होते. खमंग पदार्थांचा वास येत होता. गाण्यांचे आवाज कानावर पडत होते. सगळीकडे रोषणाई केली होती. चौकशी केल्यावर कळले, की त्या दिवशी प्रधानाचा वाढदिवस होता. सैनिकांना ही बातमी देताना खूप वाईट वाटले, पण निरोप देणे भाग होते. म्हणून त्यांनी प्रधानांना बाजूला बोलावले आणि राजाचा निरोप दिला.
ही वार्ता कळताच माहोल स्तब्ध झाला. वातावरणात शोक कळा पसरली. प्रधानांनी मात्र निरोप ऐकून हसत राजाचे आभार मानले आणि सैनिकांना म्हणाला, 'राजासाहेबांचे फार उपकार झाले. त्यांनी सायंकाळची शिक्षा सुनावल्यामुळे आज माझा जन्मदिवसाचा सोहळा माझ्या सर्व आप्त जनांबरोबर साजरा करता येईल.' हे ऐकून सगळे अचंबित झाले. प्रधानाने सर्वांना सोहळ्याचा आनंद घेण्याची विनवणी केली. हृदयावर दगड ठेवून सगळे जण त्याच्या आनंदात सहभागी झाले.
सैनिकांनी राजाला हा निरोप दिला. राजाला आश्चर्य वाटले, ज्याला आज फाशीची शिक्षा मिळणार आहे, ती व्यक्ती आपला जन्मदिवस साजरा करतेय? म्हणून राजा स्वतः प्रधानाच्या घरी पोहोचला. तिथे सगळा सोहळा पाहून तो चकित झाला. त्याने प्रधानाची भेट घेतली. प्रधानाने राजालाही आपल्या आनंदात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
राजा प्रधानाला म्हणाला, 'तुला शिक्षेची भीती वाटत नाही? तू चक्क आनंद साजरा करतोय?'
प्रधान म्हणाला, 'राजेसाहेब, तुमच्यामुळे मला शेवटचा वाढदिवस पूर्ण साजरा करून मग जगाचा निरोप घेण्याची संधी मिळाली आहे. मग मी ही संधी का दवडावी? म्हणून मी आताचा क्षण जगून घेत आहे!'
राजाने प्रधानसमोर हात जोडत म्हटले, 'तुझ्यासारख्या सकारात्मक विचारसरणीच्या लोकांची जगाला गरज आहे. तुम्ही जगले पाहिजे! तुझी शिक्षा मी रद्द करत आहे. असाच आनंद तू स्वतः घेत राहा आणि इतरांना देत राहा...!'
म्हणून संकटाच्या भीतीने आताच्या आनंदाचा क्षण गमवू नका. काय सांगावं? ज्या संकटाला घाबरतोय, ते कदाचित आपल्या वाट्याला येणारही नाही!