अपार मेहनत घेऊनही तुम्हाला वाटते की अपयश आले? पण ती तर यशाची सुरुवात असते!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 08:00 AM2021-06-08T08:00:00+5:302021-06-08T08:00:02+5:30
प्रयत्न करणे हे आपल्या हाती आहे, त्या प्रयत्नाचे फळ काय द्यायचे, ते देव बघून घेईल. निराश होऊ नका.
आजचा जमाना इन्स्टंट फूड चा आहे. सगळे काही आपल्याला दोन मिनिटात हवे असते. अगदी यश सुद्धा! परंतु कोणतीही चांगली गोष्ट मिळवायची तर त्यात सातत्य, मेहनत, चिकाटी, प्रयत्न यांचे खतपाणी घालावे लागते, तरच यशाचा अंकुर फुटतो आणि भविष्यात त्याचा वटवृक्ष होतो. आज बी पेरले तर उद्या झाड उगवेल ही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. याचाच अर्थ लागवड वाया गेली का? तर नाही, हा काळ बीज रुजण्याचा, अंकुर फुटण्याचा आणि त्याच्या वाढीचा असतो. त्याचप्रमाणे तुमचे प्रयत्न कधीच वाया जात नाहीत, फक्त ते योग्य दिशेने असावे लागतात. याबाबत प्रख्यात व्याखाते गौर गोपालदास प्रभू छानशी गोष्ट सांगतात...
एका तरुणाला आयुष्यात अचाट काहीतरी साध्य करायचे असते. पण नेमके काय हेच माहीत नसते. एक दिवस तो विचारात बुडालेला असताना त्याला कुठूनतरी अदृश्य आवाज येतो, 'तुला अचाट कामगिरी करायची आहे ना, मग तुझ्या गावाजवळ असलेला भला मोठा डोंगर सहा महिने सातत्याने हलव आणि मग परिणाम बघ!'
आपल्याला नक्कीच देवाने हा आदेश दिला असावा, अशा विचाराने त्या तरुणाने दुसऱ्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत डोंगर हलवण्यास सुरुवात केली. देवाने सांगितल्या प्रमाणे तो एकही दिवस आळस न करता सलग सहा महिने डोंगर हलवण्याचा प्रयत्न करत राहिला. परंतु डोंगर तसूभरसुद्धा जागेवरून हलला नाही. हे पाहून निराश होऊन त्याने उद्यापासून हे काम बंद करायचे असे ठरवून टाकले. त्या दिवशी त्या तरुणाला पुन्हा तोच आवाज आला. 'निराश का होतोस?'
तरुण म्हणाला, 'निराश होऊ नको तर काय करू? मला अचाट कामगिरी करायची होती. सहा महिने मेहेनत घेऊनही काहीच फरक पडला नाही.'
देवाने म्हटले, 'फरक नाही पडला असे का म्हणतोस? आरशासमोर उभा राहा, तुझा शर्ट काढ आणि रोज मेहनत घेतल्यामुळे केवढे पोलादी शरीर तयार झाले आहे बघ. भविष्यात यश मिळाले तर ते पचवण्यासाठी ताकद हवी. ती ताकद तुझ्यात निर्माण झाली आहे. आता याहून अचाट कामगिरी करण्यासाठी सिद्ध हो!'
प्रयत्न करणे हे आपल्या हाती आहे, त्या प्रयत्नाचे फळ काय द्यायचे, ते देव बघून घेईल. निराश होऊ नका. यश मिळाले, तरी ते पचवता आले पाहिजे, यासाठीच अपयशाला यशाची पहिली पायरी म्हटले आहे. ज्याअर्थी तुम्हाला वारंवार अपयश येत आहे, त्याअर्थी तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात, हे लक्षात ठेवा आणि प्रयत्न सोडू नका. काय सांगावं, तुमच्या अपार कष्टांनी अपयशाचा डोंगर हलेलही!