आदिमानवाने ईश्वराचे रूप कसे शोधले व भक्तीमार्ग कसा उदयास आला, त्याचे विवरण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 10:15 AM2021-07-17T10:15:14+5:302021-07-17T10:16:02+5:30
इंद्र, अग्नी, वरूण, शिव, विष्णू, काली, दुर्गा, गणपती इ. सर्व देवता आहेत, पण ईश्वर हा एकमेवाद्वितीय परमपुरुष आहे.
आपण त्या सर्वशक्तीमान जगन्नियंत्याला ईश्वर किंवा परमेश्वर म्हणतो. तो जगदुत्पत्तिकर्ता, जगत्पालक व जगविनाशक आहे, अशी आपली पक्की धारण आहे. त्या महत्तम शक्तीला आपण ईश, ईश्वर, परमेश्वर, देव, देवता किंवा ब्रह्म म्हणतो. पण या शब्दांचे मूळ खरे अर्थ सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वज्ञ सर्वशक्तीमान, निर्गुण, निराकार, परमशक्ती होय. संस्कृतीदर्शन या पुस्तकात लेखक शंकर काश्यपे या ईशतत्त्वाचा सविस्तर खुलासा करताना लिहितात-
ईश म्हणजे ताब्यात ठेवणे, नियमन करणे, सत्ता चालवणे या विंâवा अश म्हणजे व्यापून राहणे या धातूपासून ईश्वर हा शब्द बनला आहे. तर देव म्हणजे जी दिव्य शक्ती अदृश्य रूपाने सर्वत्र संचार करते, भक्तांची श्रद्धा भक्ती उत्कट झाल्यावर जी दृश्य रूपानेही प्रकट होते, जी पूजा स्वीकारून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करते, त्यांचे जीवन निर्भय, निराबाध करते, जी भक्ताजवळच असते, जिची पूजा अर्चा केल्याने प्रसन्न होते, जी सृष्टीतील पंचमहाभूते भक्ताला अनुकूल करते, ती शक्ती म्हणजे देव किंवा देवता.
इंद्र, अग्नी, वरूण, शिव, विष्णू, काली, दुर्गा, गणपती इ. सर्व देवता आहेत, पण ईश्वर हा एकमेवाद्वितीय परमपुरुष आहे.
आदिमानवाला ईश्वर हा निर्गुण, निराकार, सर्वशक्तीमान आहे याचा बोध झाला, तरी त्याची कल्पना, पूजा, भक्ती त्या स्वरूपात करता आली नाही. आदिमानवाने वादळी वारे, विद्युत्पात, मेघगर्जना, महापूर, अतिवृष्टी, भूकंप इ. उत्पात पाहिले आणि आपण त्यांच्याशी सामना करू शकणार नाही हे जाणले. त्यांना वाटले की प्रचंड शक्तीच्या देवता आहेत. या देवतांनी आपले अहित, अशुभ करू नये म्हणून त्याने त्यांना नमस्कार केला. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गद्य-पद्य प्रार्थना केल्या.
या देवदेवता माणसाला क्रूर वाटल्या. पण माणूस जसजसा सुसंस्कृत होऊ लागला, तसतसा या देवता कृपाळू आहेत, त्यांची प्रार्थना केल्यास त्या आपल्याला सन्मार्ग दाखवतात हे लक्षात आल्यावर भक्तीमार्ग उदयास आला.
या देवतांच्या मागे कोणती तरी अध्यात्मिक शक्ती वास्तव्य करते, असे वैदिक ऋषींच्या लक्षात आले आणि पुढे याच कल्पनेचे वेदान्ताच्या ब्रह्म कल्पनेत रूपांतर झाले. या देव देवता अवतार कार्य करणाऱ्या होत्या. म्हणजेच विशिष्ट उद्देश पूर्ण झाल्यावर अवतार कार्य संपवणाऱ्या होत्या. परंतु हे चराचर सांभाळणारी शक्ती अखंड कार्यरत होती.