Dev Uthani Ekadashi 2021 : येत्या प्रबोधिनी एकादशीला विठुरायाकडे 'हे' मागणे मागायला विसरू नका...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 10:42 AM2021-11-12T10:42:46+5:302021-11-12T10:43:08+5:30
Dev Uthani Ekadashi 2021 : स्वार्थापुरते इतरांचे गुण गाणारे आम्ही पामर, ज्याने सर्वस्व दिले त्याचेच गुण गायला विसरतो. परंतु, संत मात्र 'अमृताहूनी गोड नाम तुझे देवा' म्हणत नामस्मरणात तल्लीन होतात. ती समाधी अवस्था अनुभवायची असेल, तर आवडीने हरीनाम घेतले पाहिजे.
प्रबोधिनी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशी, पांडुरंगाचा आणि भक्तांच्या भेटीचा दिवस. दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कार्तिकी एकादशीला भक्त भगवंताची समक्ष भेट होणार आहे. अशा वेळी भगवंताकडे दुसरे काही मागण्याऐवजी तुकाराम महाराजांनी मागितलेले मागणेच भक्त मागतील का? काय होते ते मागणे?
हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा,
गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी,
नलगे मुक्ति धन संपदा, संत संग देई सदा,
तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी।
गेल्या दोन वर्षांत जी अनोखी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे भक्त-भगवंताची देहाने ताटातूट झाली असेल, परंतु मनाने ताटातूट कधीच झाली नाही आणि होणारही नाही. हा अतूट प्रेमाचा धागा दोहोंना बांधून ठेवणारा आहे. हेच प्रेम तसूभरही कमी होऊ नये, म्हणून तुकाराम महाराज पांडुरंगाला विनवतात, हेच दान आमच्या पदरात टाक, की तुझा विसर आम्हाला कधीच पडणार नाही. मुखाने तुझे गुण गाऊ आणि तुझ्या भजनात दंग होऊन नाचू, तो आनंद सोहळा अनुभवण्यासाठी तुझी आठवण सतत आम्हाला राहू दे.
शेकडो वर्षांच्या परंपरेचे स्मरण करून हेचि दान देगा देवा म्हटलेच पाहिजे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात, 'मागणाऱ्याला कमीपणा नाही आणि देणाऱ्याच्या दातृत्वाला उणेपणा नाही, असे हे मागणे आहे. इथे मागणाऱ्या याचकाला आपण याचक असल्याचा अभिमान आहे. याचक आहोत, यातच सन्मान आहे. हे मागणे सकाम असले, तरी ते निष्कामालाही निष्काम करणारे आहे. निरिच्छेलाही निरिच्छ बनवणारे आहे, असे आगळे वेगळे मागणे संतांनी मागावे आणि आपण केवळ पुनरुच्चारण करावे.'
आठवण कोणाची ठेवावी लागते, तर आपण ज्यांना विसरतो त्यांची! परंतु, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी अशी अवस्था झालेल्या संतांना देवाचा विसर पडणे शक्यच नाही. तरीदेखील तुकाराम महाराज समस्त जनांच्या वतीने हे मागणे मागत आहेत आणि पांडुरंगाने ते दान पदरात टाकावे, अशी विनंतीदेखील करत आहेत. आपल्या रोजच्या कामाच्या व्यापात देवाचा विसर पडू नये, तर देवाच्या साक्षीने प्रत्येक काम पार पडावे, हा त्यामागचा हेतू आहे.
स्वार्थापुरते इतरांचे गुण गाणारे आम्ही पामर, ज्याने सर्वस्व दिले त्याचेच गुण गायला विसरतो. परंतु, संत मात्र 'अमृताहूनी गोड नाम तुझे देवा' म्हणत नामस्मरणात तल्लीन होतात. ती समाधी अवस्था अनुभवायची असेल, तर आवडीने हरीनाम घेतले पाहिजे.
या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकायला नको, म्हणून आम्ही पापभिरू, देखल्या देवा दंडवत करतो. परंतु, जेव्हा हरीनाम गोड वाटू लागेल आणि परमार्थाचा प्रवास सुरू होईल, तेव्हा विषयांची आसक्ती कमी होऊन धन, संपत्ती, मोक्ष अशी कुठलीच अभिलाषा उरणार नाही. आम्ही केवळ सत्संगाचे मागणे मागत राहू. संतसहवासात राहून तुझे स्मरण करत राहू. प्रत्येक काम तुला अर्पण करू, मुखाने चांगलेच बोलू, कानाने चांगलेच ऐकू , मतीने चांगलाच विचार करू. ही सवय एकदा का जडली, तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागला, तरी बेहत्तर, आम्ही त्यात सुखच मानू असे तुकाराम महाराज म्हणतात.
तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी!
चला तर मग, आपणही तुकाराम महाराजांप्रमाणे पांडुरंगाकडे मागणे मागुया आणि प्रबोधिनी एकादशीला आपल्या अंतस्थ परमेश्वराला साद घालुया.
जय हरी!