Dhan Teras 2021 : धनत्रयोदशीला यमराजाने यमदूतांना कोणते वचन दिले व ते आपल्याला उपयोगी कसे ठरेल, ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 10:50 AM2021-11-02T10:50:49+5:302021-11-02T10:51:33+5:30

Diwali 2021 : आज सायंकाळी धनाची पूजा झाली की यमराजासाठी दक्षिण दिशेला तोंड केलेला एक दिवा लावला जातो.

Dhan Teras 2021: Read what Yamaraja promised to Yamaduta on Dhantrayodashi and how it will be useful to you! | Dhan Teras 2021 : धनत्रयोदशीला यमराजाने यमदूतांना कोणते वचन दिले व ते आपल्याला उपयोगी कसे ठरेल, ते वाचा!

Dhan Teras 2021 : धनत्रयोदशीला यमराजाने यमदूतांना कोणते वचन दिले व ते आपल्याला उपयोगी कसे ठरेल, ते वाचा!

Next

आज धनत्रयोदशी. आज घरोघरी सायंकाळी अलंकाराची, धनाची पूजा केली जाते. जे दागिने सुरक्षेच्या दृष्टीने आपण तिजोरीत ठेवतो, ते आजच्या दिवशी बाहेर काढून, लखलखीत करून त्यांची पूजा केली जाते. गणपती, विष्णू-लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग तसेच नाणी नोटांच्या रुपातील द्रव्यनिधी यांची पूजा करण्याचा प्रघात आहे. धनस्वरुपातील लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. व ही सर्व पूजा झाली, की यमराजासाठी आठवणीने खास दिवा लावला जातो. त्यालाच यमदीपदान असे म्हणतात.

Diwali 2021 : धनत्रयोदशीला दीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही असे म्हणतात; कारण... 

दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित केला जातो व यमराजाचे स्मरण करून नमस्कार केला जातो. अकाली, आकस्मिक मृत्यू न येता संपूर्ण आयुष्य आनंदाने, समाधानाने व्यतीत केल्यावर यमलोकीची यात्रा घडावी, या हेतूने यमदीपदान केले जाते. या प्रथेमागे एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी - 

एकदा सहज म्हणून यमराजाने आपल्या दूतांना विचारले, `तुम्ही एखाद्याचे प्राण हरण करता, तेव्हा तुम्हाला दु:खं होत नाही का?' 
त्यावेळी धीर करून यमदूतांनी उत्तर दिले की, `असा एकदा अतिशय हृद्य प्रसंग आला होता. हेमराज राजाला पुत्र झाला. त्याच्या षष्ठीच्या दिवशी सटवाईने भविष्य वर्तवले की, `हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल.' हे ऐकून राजाने मुलाला कडेकोट बंदोबस्तात एका चिरेबंदी, अभेद्य अशा खास स्थानी ठेवले. 

यथाकाल म्हणजे सोळाव्या वर्षी त्याचा विवाह झाला. चौथ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही त्याचे प्राण हरण करण्यास गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी शोककल्लोळ झाला, तो ऐकून आणि बघून आम्हीदेखील हेलावलो, दु:खी झालो. पण आपली आज्ञा कशी मोडणार? म्हणून आम्हा प्राण हरण करावेच लागले. 

आम्ही अतिशय दु:खी झालो होतो. म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की, अपमृत्यू टाळता येईल असा काही उपाय असल्यास सुचवावा!''
त्यावेळी यमाने सांगितले, 'धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळनंतर जो कोणी दीपदान करून धनत्रयोदशी व्रत करील, त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना अपमृत्यू येणार नाही.' 

तेव्हापासून हे व्रत आणि दीपदानाची परंपरा सरू झाली व ती आजतागायत सुरू आहे. कोणाच्याही वाट्याला अपमृत्यु येऊ नये अशी यमराजाला प्रार्थना करूया आणि आपणही आज सायंकाळी दक्षिण दिशेला तोंड करून आशेचा एक दिवा लावूया. 

Web Title: Dhan Teras 2021: Read what Yamaraja promised to Yamaduta on Dhantrayodashi and how it will be useful to you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.