धनत्रयोदशी: ‘असे’ करा धन्वंतरी पूजन, लक्ष्मी होईल प्रसन्न; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 08:10 AM2023-11-08T08:10:17+5:302023-11-08T08:11:52+5:30
Dhantrayodashi 2023: दिवाळीतील धनत्रयोदशी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी धन्वंतरीसह लक्ष्मी पूजन केले जाते. जाणून घ्या...
Dhantrayodashi 2023: भारतीय संस्कृती, परंपरेत वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशीपासून दिवाळीला सुरुवात होते. भाऊबीज सणापर्यंत दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीतील सर्वच दिवसांना विशेष महत्त्व आहे. अश्विन कृष्ण त्रयोदशी हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला बोलीभाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाल्याची मान्यता आहे. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मी देवीचीही पूजा करतात. धन्वंतरी पूजन कसे करावे? धन्वंतरी पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घेऊया...
शुक्रवा, १० नोव्हेंबर २०२३ रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. या दिवशी सोन्या-चांदीशिवाय अन्य वस्तू आवर्जून खरेदी केल्या जातात. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू १३ पटीने वाढतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. धनत्रयोदशीचा सण योग्य पद्धतीने साजरा केल्यास वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही, असेही म्हटले जाते. (Dhanteras 2023 Date And Time)
धनत्रयोदशीचे महत्त्व
अश्विन कृष्ण त्रयोदशी तिथीला धन्वंतरी हातात अमृताने भरलेले कलश घेऊन समुद्रमंथनातून प्रकट झाले. धन्वंतरी भगवान विष्णूचे अवतार मानले जाते. या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याचेही विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळीचा सण साजरा करण्यास सुरुवात होते. लक्ष्मीपूजनाच्या आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धनाची पूजा केली जाते. यावर्षी धनत्रयोदशी शुक्रवारी आली आहे. शुक्रवार हा देवीचा वार. लक्ष्मीचा वार. चांगल्या मार्गाने, चांगल्या हेतूने कमावलेली संपत्ती आपल्या घरात टिकून राहावी, वृद्धिंगत व्हावी, यादृष्टीने धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. तिन्हीसांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता आहे. या दिवशी यमदीपदान केले जाते. धनत्रयोदशीला दिवे लागणीच्या वेळी घराबाहेर एक दिवा लावून त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार करावा. यामुळे अपमृत्यु टळतो, असा समज आहे. (Dhanteras 2023 Significance)
यंदा धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त काय?
धनत्रयोदशी: शुक्रवार, १० नोव्हेंबर २०२३
अश्विन कृष्ण त्रयोदशी प्रारंभ: शुक्रवार, १० नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटे.
अश्विन कृष्ण त्रयोदशी समाप्त: शनिवार, ११ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०१ वाजून ५७ मिनिटे.
धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळात गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. या पूजेसाठी शुभ मुहूर्त सायंकाळी ०५ वाजून ४७ मिनिटांपासून ते ०७ वाजून ४७ मिनिटांपर्यंत आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी ०१ तास ५६ मिनिटे असेल. (Dhantrayodashi 2023 Puja Vidhi in Marathi)
धन्वंतरी पूजनविधी
धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर धन्वंतरी पूजनाचा संकल्प करावा. धन्वंतरीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करावी. धन्वंतरी पूजनाच्या आधी गणपती पूजन करावे. यानंतर धन्वंतरीचे आवाहन करावे. धन्वंतरीची षोडशोपचार पूजा करावी. पूजा झाल्यानंतर 'ॐ श्री धनवंतरै नम:' या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. तसेच 'ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धनवंतराये:अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय। त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूपश्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री अष्टचक्र नारायणाय नमः', असे म्हणून धन्वंतरीला मनापासून नमस्कार करावा. शक्य असल्यास धन्वंतरी स्तोत्राचे पठण करावे.