Dhanteras 2024: धन्वंतरी, महालक्ष्मी आणि कुबेराची 'अशी' करा पुजा आणि म्हणा प्रभावी मंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:18 PM2024-10-29T12:18:01+5:302024-10-29T12:19:19+5:30
Dhanteras 2024: धनत्रयोदशीला कुबेर, लक्ष्मी आणि धन्वंतरीची पूजा केली जाते, ती शास्त्रोक्त पद्धतीने व्हावी म्हणून जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी!
कार्तिक महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या वर्षी धनत्रयोदशीचा दिवस २९ ऑक्टोबर मंगळवारी आला आहे. समुद्रमंथनातून धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रगट झाले, तो आजचाच अर्थात धनत्रयोदशीचा (Dhanteras 2024) दिवस. म्हणून अनेक ठिकाणी या दिवसाला धन्वंतरी जयंती (Dhanvantari Jayanti 2024) असेही म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर, आयुर्वेदाचे स्वामी धन्वंतरी, तसेच सुख-समृद्धीची देवता महालक्ष्मी यांची पूजा केली जाते.
धनत्रयोदशीची तिथी : (Dhanteras Muhurta 2024)
त्रयोदशी तिथीची सुरुवात: २९ ऑक्टोबर, सकाळी १०:३२ पासून
त्रयोदशीची समाप्ती तारीख: ३० ऑक्टोबर, दुपारी १:१६ पर्यंत
पूजेचा मुहूर्त : (Dhanteras Puja Muhurta 2024)
धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त केवळ अर्धा तासाचा आहे. सायंकाळी ६ वाजून ३० मीनिटांनी सुरू होऊन ८ वाजून १२ मीनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे. या वेळेत पूजा पूर्ण झाली नाही, तरी हरकत नाही, परंतु पूजेचा आरंभ या वेळेत अवश्य करावा. धनाची पूजा झाल्यावर सायंकाळी दक्षिणेकडे दिव्याची वात करून एक दिवा यमराजांनादेखील अर्पण करावा आणि अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना करावी.
पूजा विधी : (Dhanteras Puja Vidhi 2024)
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर महाराज किंवा देवी महालक्ष्मी यांची विधीवत पूजा करावी. कुबेर महाराजांची पूजा का? कारण, त्यांना धनसंपत्तीचे प्रमुख मानले जाते. भगवान शंकरांनी त्यांना धनपतीचे वरदान दिले आहे. म्हणून धनप्राप्तीसाठी कुबेर महाराजांची पूजा केली जाते. तसेच धन्वंतरी हे आरोग्याची देवता आहेत. आपल्या घरात केवळ संपत्ती येऊन उपयोग नाही, तर ती उपभोगण्यासाठी चांगले आरोग्यही असायला हवे, म्हणून त्यांचीही पूजा. तसेच आपल्या घरातील धन-संपत्ती वृद्धिंगत व्हावी आणि लक्ष्मी चांगल्या मार्गानेच घरात यावी आणि कायमस्वरूपी स्थीर राहावी, म्हणून महालक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षता, धूप, दीप, चंदन, उटी, पाने, फुले, श्रीफळ देवाला अर्पण करून पुढील मंत्रांचे उच्चारण करावे.
कुबेर महाराजांच्या पूजेच्या वेळी म्हणावयाचा मंत्र-
ओम श्री, ओम ऱ्हीम, ओम ऱ्हीम, श्री क्लीं वित्तेश्वराय नम:।
धन्वंतरी पूजा मंत्र-
ओम धन्वंतरये नम:।
पूजेच्या वेळी म्हणावयाचे श्लोक :
ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय
त्रिलोकपथाय, त्रिलोकनाथाय श्री महाविष्णूस्वरूप,
श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नम:।
या देवी सर्वभुतेषु, लक्ष्मीरूपेण संस्थिता,
नम: स्तस्यै, नम: स्तस्यै, नम: स्तस्यै नमो नम:।