धर्माचरण ही अंधश्रद्धा नाही, तर त्याला विज्ञानाचाही दुजोरा; वाचा फायदे आणि तोटे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 02:17 PM2021-05-07T14:17:13+5:302021-05-07T14:17:45+5:30
केवळ आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी धर्माची विटंबना न करता हिंदू धर्म आणि धर्माचरण यांचा सखोल अभ्यास करणे, ही काळाची गरज आहे.
मंगळावर भराऱ्या मारणाऱ्या विज्ञानाला वैदिकांचा एकही धर्माचार असिद्ध ठरवता आलेला नाही. किंबहुना विज्ञानाच्या प्रत्येक प्रगतीबरोबर हे धर्माचार शास्त्रीय ठरत आहेत. धर्म अंधश्रद्धेला खतपाणी कधीच घालत नाही. धर्मातील बाबी या शास्त्राला धरून असतात. याबाबत अभ्यासक सुधा धामणकर लिहितात, 'धर्माचार पालनासाठी स्थलविचार, कालविचार, ऋतुविचार, मुहूर्तविचार, स्नानाने देहशुद्धि, मंत्रोच्चाराने चित्तशुद्धि, पापनाश व देवता साक्षात्कार, उपासनेने चित्तशुद्धि व चित्ताची एकाग्रता, अंतर्मनाची जागृति, बाह्य मनोलय, आसनाविधी, सोवळे-ओवळे, स्पर्शास्पर्शपालन, आहारपावित्र्य, भोगपावित्र्य इ. लाभ पदरी पडतात, याला विज्ञानाने देखील दुजोरा दिला आहे.'
आचारपालनाने बीजशुद्धि, वंशशुद्धि, वंशसातत्य, संकरजन्य दोषांतून मुक्तता, अन्नशुद्धि, आरोग्यप्राप्ति, पर्यावरण शुद्धि, दीर्घायुष्यता, स्त्रीपावित्र्याचे संरक्षण, सुसंततिलाभ, सर्व प्रकारच्या कर्तव्याचे पालन, कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था इ. अनेक लाभ प्राप्त होतात. आचारत्यागामुळे अकालमृत्यू येतो, असेही म्हटले जाते. तर आचारपालनाने दीर्घायुष्य लाभते.
आचारपालनाला दोन प्रकारचे, दृष्ट आणि अदृष्ट लाभाचे फळ आहे. उपयुक्त सर्व दृष्ट फळांप्रमाणेच पूर्वजांना सद्गति, असद्गतितून मुक्तता, यमदंडापासून मुक्तता, परलोकात सद्गति, आध्यात्मिक उन्नति, देवता कृपा, देवता साक्षात्कार इ. अदृष्ट लाभही मिळतात.
आचारत्यागाने अनारोग्य, अल्पायुष्य, स्वैराचार, उत्छृंखलता, अनाचार, दुराचार, व्यभिचार, कामक्रोधादि विकारांचे आक्रमण चित्ताची अशांतता, नैतिकतेत शैथिल्य, व्यसनाधिनता, कौटुंबिक अशांति, कलह, विघटन, इ. द्वारा दु:ख, दारिद्र्य भोगावे लागते. परलोकात अधोगति, पारलौकिक अकल्याण, पापपरिणामांचा भोग भोगावा लागतो.
आचार पालनात कंटाळा, आलस्य, अविश्वास, विरोध, टिंगल टवाळी इ. रूपाने आचारपालनाचा त्याग इ. चालू आहे. आचारपालन जवळ जवळ दिसेनासेच झाले आहे. तथापि गेली हजारो वर्षे ते आचार आजसुद्धा टिवूâन राहिले आहेत त्या अर्थी त्या आचारांमध्ये शास्त्रीयता, उपयुक्तता, विज्ञानुकूलता असली पाहिजे आणि आहे हे मान्य करावयास हवे.
खोल विचार, संशोधन, प्रत्यक्षानुभव, विचारांत घेता वेदिकाचे सर्व आचार निसर्गनिय, आयुर्वेद, विज्ञान ज्योतिष, देश काल स्थिती, मानसशास्त्र, प्राणिशास्त्र, वंशशास्त्र, समाजशास्त्र इ. सर्वांशी अनुकूल मिळते जुळते आहे, हे सिद्ध होते.
म्हणून केवळ आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी धर्माची विटंबना न करता हिंदू धर्म आणि धर्माचरण यांचा सखोल अभ्यास करणे, ही काळाची गरज आहे.