एक बेट निर्जीव होण्याला गिधाडांचा ऐतखाऊपणा कारणीभूत ठरला की मनमानीपणा? वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 01:05 PM2022-06-23T13:05:48+5:302022-06-23T13:07:07+5:30

ज्येष्ठांचे सल्ले ऐकावेत, कारण ते अनुभवाचे बोल असतात. त्या विचारांवर वेळीच विचार केला नाही तर आपलीही अवस्था या गिधाडांसारखीच होणार!

Did vultures' arrogance or arbitrariness cause an island to become lifeless? Read the parable! | एक बेट निर्जीव होण्याला गिधाडांचा ऐतखाऊपणा कारणीभूत ठरला की मनमानीपणा? वाचा ही बोधकथा!

एक बेट निर्जीव होण्याला गिधाडांचा ऐतखाऊपणा कारणीभूत ठरला की मनमानीपणा? वाचा ही बोधकथा!

googlenewsNext

गिधाडांची प्रजाती आता दुर्मिळ होत चालली आहे. शहरी भागात तर त्यांचे दर्शन सहसा होत नाहीच. मात्र एकदा जंगलात राहणारा गिधाडांचा एक समूह जंगलतोड होऊ लागल्याने उडत उडत एका निर्मनुष्य बेटावर पोहोचला. ते बेट निर्मनुष्य असले, तरी सागरी जीव, वन्य जीव तिथे मुबलक प्रमाणात होते. गिधाडांनी विचार केला काही काळ इथेच मुक्काम करू. 

जेवणाची, राहण्याची उत्तम सोय झाल्याने गिधाडं त्या वातावरणाला सरावली. त्यांच्यातल्या तरुण गिधाडांनी तर आमरण इथेच राहायचे असा संकल्प केला. तेव्हा बुजुर्ग गिधाड म्हणाले, तशी चूक कदापिही करू नका. आज इथे आयते अन्न मिळत आहे, भविष्यात मनुष्याने इथेही अतिक्रमण केले तर कुठे जाल?'
त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ऐतखाऊ तरुण गिधाड जनावरांच्या मांसाचे लचके तोडत होते. 

काही काळाने बुजुर्ग गिधाडाने मुक्काम हलवायचा ठरवला. त्याच्याबरोबर दोन चार जुने साथीदार आले. त्यांना आपल्या प्रजातीची काळजी वाटू लागली. आपण आयुष्यभर कष्ट करून, अन्न शोधून आपली उपजीविका भागवली, पण या तरुणांना सगळे आयते मिळत राहिले तर यांना कठीण प्रसंगाची जाणीव कशी होणार? ते स्वत्व गमावून बसतील आणि सुस्त होऊन निकामी होतील. परंतु समजूत काढूनही कोणी त्यांची साथ न दिल्याने उरलेली गिधाडे बेटावर राहिली, बाकीची दुसऱ्या जंगलात निघून गेली.

काही काळाने आपल्या नातलगांच्या भेटीने बुजुर्ग गिधाडे बेटावर परत आली. तिथे पाहतो तर काय आश्चर्य? जवळपास सगळी गिधाडे मरणासन्न अवस्थेत पडली होती. त्यांची विचारपूस केली असता, जीर्ण आवाजात तो तरुण गिधाड म्हणाला, 'आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमचे ऐकले नाही त्याची शिक्षा आज भोगत आहोत. तुम्ही सांगीतल्या नुसार एकदिवस एक जहाज या बेटावर आले आणि त्या जहाजातून बिबटे सोडण्यात आले. त्यांनी इथले सगळे जीव खाऊन पोटं भरली आणि आम्ही उडण्याची क्षमता गमावून बसलो आहोत, प्रतिकार करण्याची आमच्यात ताकद राहिलेली नाही हे ओळखून त्यांनी आमच्यावरही वार केला.'

बुजुर्ग गिधाडाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षणाच्या लोभापायी ही गिधाडं ऐन तारुण्यात आपला आनंद गमावून बसली. आपली प्रजाती नष्ट झाली. ऐतखाऊपणा यांना नडला! आयुष्यात केवळ सुख उपभोगत राहिलात तर दुःखाची झळ सहन करायची ताकद राहणार नाही. म्हणून प्रत्येक जिवाने हर तऱ्हेच्या परिस्थितीत न डगमगडता परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. तसेच एकाच ठिकाणी चिकटून न बसता नवनवे अनुभव घेत आयुष्य समृद्ध केले पाहिजे. 

Web Title: Did vultures' arrogance or arbitrariness cause an island to become lifeless? Read the parable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.