विविध कर्मे, पूजा अथवा संस्कारांसाठी विविध दिशा सांगितलेल्या असतात. त्यामागील शास्त्रीय कारण काय? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:27 PM2022-01-04T12:27:36+5:302022-01-04T12:27:58+5:30
सर्व तपशील वैज्ञानिकदृष्ट्या तपासून पाहिला तर असे दिसून येते की, पूर्व पश्चिम या दोन दिशांचा संबंध सूर्याकर्षणाकडे तर दक्षिण उत्तर या दिशांचा संबंध चुंबकीय आकर्षणाकडे आहे.
चार मुख्य दिशा, चार उपदिशा व ऊर्ध्व-अध अशा दोन दिशा मिळून एकूण दहा दिशा होतात. त्यापैकी काही विशिष्ट तांत्रिक कर्मे सोडल्यास बहुतेक सर्व कर्मांस चार मुख्य दिशांपैकी एकीकडे मुख करून ते कर्म केले जाते.
सूर्योदय ही पूर्व व सूर्यास्त ही पश्चिम दिशा कल्पून आठ दिशा मानलेल्या आहेत. त्याचे अधिपती असे - पूर्व- इंद्र, आग्नेय- अग्नी, दक्षिण-यम, नैऋत्य- नैर्ऋती, पश्चिम-वरुण, वायव्य- वायू, उत्तर-सोम, ईशान्य- ईश्वर, ऊर्ध्व -ब्रह्म, अधरा-अनंत.
निरनिराळ्या शास्त्रवचनांचे संकलन केल्यास असा निष्कर्ष निघतो की, प्रात:संध्या देवकर्य, यज्ञकार्य, आचमन, प्राणायाम यासाठी पूर्वदिशा, सायंसंध्या, देवतास्थापन, पुण्यसंचय यासाठी पश्चिम दिशा, श्राद्धाचे वेळी विप्रांची उत्तर व कर्त्याची दक्षिण दिशा, यमतर्पण, यमाचे उपस्थान यासाठी दक्षिण दिशा, स्वाध्याय, ऋषिकर्म, योगाभ्यास यासाठी उत्तर दिशा जातकर्माचे वेळी बालकाच्या पित्याची व वेदारंभाच्या वेळी बटूची, सोडमुंजीच्या वेळी आचार्याची व दीक्षाग्रहण करताना साधकाची पूर्वदिशा, विावाहात अक्षतारोपण करताना वराची पूर्व व वधूची पश्चिम दिशा अशा प्रकारे विविध प्रसंगी विविध दिशा सांगितल्या आहेत.
वरील सर्व तपशील वैज्ञानिकदृष्ट्या तपासून पाहिला तर असे दिसून येते की, पूर्व पश्चिम या दोन दिशांचा संबंध सूर्याकर्षणाकडे तर दक्षिण उत्तर या दिशांचा संबंध चुंबकीय आकर्षणाकडे आहे. देवकार्यादि कर्मासाठी पूर्व दिशा सांगण्याचे कारण ही कार्ये मध्यान्हपूर्वी होत असतात. ब्राह्ममुहूर्तापासून मध्यान्हपर्यंत सूर्याचे आकर्षण असल्यामुळे ज्ञानतंतू विशेष उत्तेजित असतात. जगताचे नियमन करणारी यम देवता दक्षिणस्थित संलग्न आहे. पितरांचा वास दक्षिणेकडे असल्यामुळे त्यंना आवाहन करताच ते दक्षिणस्थि होऊन उत्तरेकडे मुख करतात. अशा वेळी श्राद्धकर्त्यांचे मुख आपोआपच दक्षिणेकडे वळते.
यवनधर्मीय लोक काबाच्या दिशेकडे मुख करून नमाज पडतात. त्याचप्रमाणे सनातन धर्मीय लोक पठण, स्वाध्याय, योगाभ्यास इत्यादि कार्ये हिालयाच्या दिशेकडे म्हणजे उत्तरेकडे मुख करून करत असतात. उत्तरेकडे हिमालय, मानस सरोवर इ. अतिपवित्र आध्यात्मिक क्षेत्रे आहेत.
योगाभ्यास व तत्सम साधना करताना उत्तरेकडे मुख करून बसण्याची प्रथा आहे. विवाहात अक्षतारोपणाचे वेळी वराचे मुख पूर्वेकडे म्हणजे चढत्या दिशेकडे असल्यामुळे त्याची सर्वांगीण उन्नती सूचित होते. वधूचे मुख पश्चिमेकडे असल्यामुळे तिच्यातील लज्जा, नम्रता, मृदुता, आर्जव, हे स्त्रीसुलभ कोमल गुण सूचित होतात.
अशा प्रकारे आह्निक, साधना, उपासना इ. सर्व कर्मात दिशांचे महत्त्व सांगितले आहेच. पण त्याखेरीज भोजनासाठीदेखील पूर्व, पश्चिम, उत्तर दिशा सांगितल्या आहेत, ते दिशांचे महत्त्व जाणूनच!