अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण यशस्वी लोक त्यावर मात कसे करतात ते बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:51 AM2023-05-25T11:51:14+5:302023-05-25T11:57:49+5:30
दुसऱ्यांच्या सुखाकडे बघून असूया करण्यापेक्षा ते त्यांच्या दुःखावर, संकटावर मात कसे करतात ते जाणून घ्या.
समाजात अनेक व्यक्ती आपल्याला नेहमी हसतमुख दिसतात. त्यांना पाहता आपल्याला प्रश्न पडतो की या लोकांच्या आयुष्यात समस्या आहेत की नाही? त्यांच्याकडे पाहून आपल्याला असूया वाटते. मात्र समस्या नाहीत असा एकही मनुष्य नाही. समाजाचे हे अवलोकन करूनच समर्थ रामदास स्वामी म्हणाले, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे!' याचाच अर्थ समस्या त्यांनाही असतातच, तरी ते खुश कसे राहतात याचे उत्तर देत आहेत अध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू!
प्रभुजी सांगतात, 'या जगात असे एकही कुलूप नाही ज्याची चावी नाही. ज्यावेळी कुलूप बनवले जाते त्यावेळी त्याची चावीसुद्धा बनवली जातेच! हे कुलूप म्हणजेच आपल्या समस्या. या समस्यांवर मार्ग असतोच. तो शोधणाऱ्यांना मिळतो. तो शोधायचा कसा ते समजून घ्या.
या जगात प्रत्येकाला समस्या आहेत. मात्र काही जण फक्त समस्यांचा विचार करत बसतात तर काही जण समस्यांतून निघण्याचा मार्ग शोधण्यावर भर देतात. हिंदीत सांगायचे तर समस्यांच्या बाबतीत 'भागलो' म्हणजे पळून जा नाहीतर 'भाग लो' म्हणजे भाग घ्या! समस्येपासून पळून जाणं हा काही उपाय ठरत नाही. आपण जेवढे प्रश्नांपासून दूर पळू तेवढे प्रश्न आपल्या जास्त मागे लागतात. त्यामुळे हुशारी यातच आहे की त्या समस्यांचा सामना करा. समस्यांपासून दूर पळून नाही तर समस्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग शोधा!
मात्र अनेकदा समस्यांतून मार्गही मिळेनासा होतो, अशा वेळी हुशार लोक काय करतात? तर समस्यांपासून आपले लक्ष विचलित करतात. अर्थात दुसऱ्या विषयांत आपले मन गुंतवतात. तसे केल्याने समस्यांचे ओझे वाटत नाही तर समस्यांशी लढण्याचे बळ मिळते. अनेक प्रश्न असे असतात जे पटकन सुटत नाहीत. अशा वेळी त्याला धीराने सामोरे जाणे हा एकमेव पर्याय उरतो. उदा. एखाद्या कुटुंबात दिव्यांग, मतिमंद, आजारी बाळ जन्माला आले, तर बाळ झालं या सुखापेक्षा पालकांना बाळाच्या व्याधींची चिंता सतावते. अशा वेळी बाळाला सोडून देणे हा पर्याय नसतो, तेव्हा पालक मानसिक दृष्ट्या स्वतःला सक्षम बनवतात आणि आपल्या पोटच्या गोळ्याचे सर्वतोपरी पालन पोषण करतात. हे मानसिक बळ, सामना करण्याची वृत्ती म्हणजेच कुलुपाची चावी आहे हे लक्षात ठेवा.
प्रत्येकाजवळ समस्यांतून बाहेर निघण्याची चावी आहे. स्वतः जवळ चाचपून बघा. तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी!'