ईश्वरत्व ओळखावयास हवे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 01:25 PM2021-04-08T13:25:07+5:302021-04-08T13:26:28+5:30
ईश्वराने मनुष्यप्राण्याला बुद्धीस्वातंत्र्य दिले असल्यामुळेच आजचा मानव हा ईश्वरालाच रिटायर्ड करण्याची भाषा बोलू लागला, ही कृतज्ञता आहे की कृतघ्नता कळत नाही..!
- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी
( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३.)
भारतीय संस्कृती व सनातन धर्म हा विश्वव्यापक आहे. याचे कारण या धर्मांत देव नाही असे ठिकाणंच नाही. तो सर्वत्र भरलेला आहे. खरं तर सर्वांतरयामी ईश्वराचं अस्तित्व आहे हा सिद्धांत फक्त याच धर्मांत आहे.
जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ।
हा भक्तीयोग निश्चित । जाण माझा ॥
एवढी विश्वव्यापक धर्मदृष्टी अन्यत्र कुठे आहे..? संतांचा भागवत धर्म हा तर फक्त मानवतावादाचीच शिकवण देतो. समता, बंधुता व एकता यातून खरा समाजवाद तर या देशांत संत महात्म्यांनी भक्तीच्या माध्यमांतूनच निर्माण केला.
टाळकुट्यांनी देश बुडविला, संताळ्यांनी प्रारब्धाच्या नावाखाली समाज निष्क्रीय बनविला, पारलौकिक जीवनाचे तत्वज्ञान मांडून माणसाला प्रयत्नवादापासून परावृत्त केले, असे आरोप प्रत्यारोप करणाराही संत साहित्याचा सूक्ष्म अभ्यास केला तर त्यांच्या नक्की लक्षांत येईल की, या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत, महंत, त्यागी, संन्यासी, अवलिया, फकीर जन्माला आले म्हणूनच तर हे राष्ट्र महान् राष्ट्र ठरले. रंजल्या गांजल्यांपर्यंत, तळागाळांतील व्यक्तिंपर्यंत ज्ञानाची भांडारं खुली झाली.
सकळांसी येथे आहे अधिकार ।
कलियुगी उद्धार हरिनामे ॥
अशी हाक दिली व सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंत मुक्तीचा मार्ग खुला केला. जगाचा समतोल राखण्यासाठी हे सर्व कार्य ईश्वरानेच संतांच्या माध्यमांतून अवतार घेऊन पूर्ण केले.
जगद्नियंत्या परमेश्वराने चराचर सृष्टी निर्माण केली त्याचवेळी सर्व प्राणिमात्रांच्या जीवनाची व्यवस्था निश्चित केली. सर्वांना अन्न, सर्वांना पाणी, सर्वांना सूर्यप्रकाश यांत ईश्वराने कधी भेदभाव केला का..? सर्वांच्या शरीरातील रक्त लाल रंगाचेच आहे या रक्तांत कुठे फरक आहे का..? सर्वांना बुद्धी दिली. आता तिचा वापर कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. ईश्वराने मनुष्य प्राण्याला हे बुद्धीस्वातंत्र्य दिले असल्यामुळेच आजचा मानव हा ईश्वरालाच रिटायर्ड करण्याची भाषा बोलू लागला, ही कृतज्ञता आहे की कृतघ्नता कळत नाही..!
मानवांतील ईश्वरता ओळखायला सुद्धा सर्वभूतात्म्यैकबुद्धी लागते. ती असेल तरच खरा देव कळेल..! आज ईश्वराने दिलेला अनमोल किंमतीचा हा देह, हे शरीर आम्ही स्वार्थ, कपटीपणा, मत्सर, सूडभावना, तिरस्कार या विकारात खर्च करण्यापेक्षा त्याच्याच प्राप्तीसाठी खर्ची घातलं तर किती चांगलं होईल..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥