Diwali 2020: 'जिथे कलह, वाद-विवाद होतात, तिथे लक्ष्मी थांबत नाही.' 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 7, 2020 07:30 AM2020-11-07T07:30:00+5:302020-11-07T07:30:02+5:30

Diwali 2020 : लक्ष्मी म्हणजे केवळ बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम नव्हे, लक्ष्मी म्हणजे तिजोऱ्या आणि कपाटे भरभरून ठेवलेला दोन नंबरचा पैसाही नव्हे. लक्ष्मी म्हणजे सत्य आणि शांती. या स्वरूपातील लक्ष्मीने सर्वांच्या घरी निरंतर अधिवास करावा, हीच आपणही लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करायची. 

Diwali 2020: 'Lakshmi does not stop where there are quarrels and disputes.' | Diwali 2020: 'जिथे कलह, वाद-विवाद होतात, तिथे लक्ष्मी थांबत नाही.' 

Diwali 2020: 'जिथे कलह, वाद-विवाद होतात, तिथे लक्ष्मी थांबत नाही.' 

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

चोर-दरोडेखोरांजवळ अमाप पैसा असतो. परंतु, तो त्यांना कधीच लाभत नाही. कारण तो पैसा त्यांनी वाममार्गाने कमावलेला असतो. त्यांच्या तिजोरीतून लक्ष्मी वारंवार बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते. याउलट जिथे कष्ट, श्रम, प्रामाणिकपणा आहे, तिथे लक्ष्मी सन्मानाने जाते, राहते आणि वृद्धिंगत होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तिची पूजा करतोच, अशा वेळी तिच्याकडे काय मागितले पाहिजे, हे सांगणारी एक बोधकथा. 

आटपाट नगराच्या कोण्या एका रंकावर लक्ष्मी प्रसन्न झाली. हा रंग जन्मापासून दरिद्री असल्यामुळे त्याला कुठल्याही कामात अर्थलाभ होत नसे, हाताला यश लाभत नसे. अगदी अटीतटीचा, निर्वाणीचा उपाय म्हणून लक्ष्मीची उपासना त्याने केली आणि त्यामुळे लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली. प्रसन्न होऊनही लक्ष्मी चिरकालासाठी त्याच्याकडे येऊन राहू शकत नव्हती तडजोड म्हणून लक्ष्मीने प्रेरणा दिली आणि त्या राज्यातल्या राजाचा प्रधान झाला, त्याचा सगळा जीवनक्रमच बदलला. दिवस कसे सरले, त्याला कळलेच नाही आणि बारा वर्षांचा काळ निघून गेला. 

हेही वाचा : Diwali 2020 : दिवाळीचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व जाणून घेऊया

बारा वर्षानंतर लक्ष्मी जशी आली, तशी निघून जाऊ लागली. पण त्यापूर्वी तिने ह्या पूर्वाश्रमीचा रंक असलेल्या प्रधानाची भेट घेतली. ती त्याला म्हणाली, `मी निघाले, आता यापुढे तू तुझा संसार सांभाळ.' प्रधान गडबडला. लक्ष्मी नसल्याने काय होते, याचा दारुण अनुभव त्याने घेतला होता. पुन्हा त्याला तो अनुभव नको होता. पण काय करणार? लक्ष्मीने दिलेली बारा वर्षांची मुदत संपून गेली होती.  तो आणि त्याची बायको-मुले गयावया करू लागली, रडू लागली, गडाबडा लोळू लागली. 

लक्ष्मी म्हणाली, `हे बघा, मी तर या घरातून जातच आहे, पण तुम्हाला असे दु:खात लोटून जाणे, मला बरे वाटणार नाही. तुम्ही माझ्याकडे काही मागा, तेवढे मी देते आणि बाकीचे सगळे घेऊन जाते.' प्रधान म्हणाला, `माते, आम्हाला विचार करायला एक दिवसाची मुदत दे.'

लक्ष्मीकडे काय मागावे, याबद्दल तो बायकोशी बोलला. बायको म्हणाली, `ही सोन्याच्या जरीने मढवलेली पैठणी आणि तो सप्तपदरी चंद्रहार एवढे माझ्यासाठी ठेवायला सांगा. बाकीचे नेले तरी चालेल.' प्रधानाचा मोठा मुलगा म्हणाला, `ज्या घोड्यावरून मी रोज रपेट करतो, तो मला राहू द्या.' मोठी मुलगी म्हणाली, `मी माझ्या मैत्रिणींना जे चार दागिने दाखवते आणि चार घोड्यांच्या रथातून फिरते, तो राहू द्या, बाकीचे न्या.' प्रधानांची धाकटी मुलगी चुणचुणीत होती. ती म्हणाली, 'बाबा, प्रत्येक जण त्याला काय हवे, ते मागत आहे, लक्ष्मींने तुमच्या घराला काय हवे आहे, ते मागायला सांगितले आहे. तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा. कारण एकदा लक्ष्मी गेली, की तिच्यासकट बाकी गोष्टीही आपोआप जातील.'

प्रधान विचारात पडला. असे काय मागावे, की घरातला आनंद चिरकाल टिकून राहील? त्याने मुलीलाच विचारले, 'बाळ, तूच सांग मी काय मागू?' मुलीने वडिलांना सांगितले, 'सत्य आणि शांती घरात ठेव आणि कलह तू घेऊन जा, असे लक्ष्मी मातेला सांगा.' प्रधान आनंदून गेला. त्याने हेच मागणे लक्ष्मीकडे मागितले. ते ऐकून लक्ष्मीही गंभीर झाली आणि प्रधानाला म्हणाली, 'वत्सा, जिथे सत्य असते, तिथे माझा अधिवास असतो आणि जिते माझा अधिवास असतो तिथे कलह नसतो. कलहाचे आगमन झाले, की मी निघून जाते. तुझ्या मागाणीप्रमाणे इथे सत्य राहिले, म्हणजे मलाही राहावेच लागेल.'

लक्ष्मी म्हणजे केवळ बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम नव्हे, लक्ष्मी म्हणजे तिजोऱ्या आणि कपाटे भरभरून ठेवलेला दोन नंबरचा पैसाही नव्हे. लक्ष्मी म्हणजे सत्य आणि शांती. या स्वरूपातील लक्ष्मीने सर्वांच्या घरी निरंतर अधिवास करावा, हीच आपणही लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करायची. 

हेही वाचा : Diwali 2020: लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...शंभर वर्षांपूर्वी दिवाळी कशी होती पहा

Web Title: Diwali 2020: 'Lakshmi does not stop where there are quarrels and disputes.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी