Diwali 2020: वसुबारस ते भाऊबीज, जाणून घ्या दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 6, 2020 01:00 PM2020-11-06T13:00:18+5:302020-11-06T13:28:56+5:30

Diwali 2020 : उत्सवाचा माहोल घेऊन दिवाळी हजर झाली आहे. एक-दोन नाही, तर पाच दिवसांचा हा सण. चला, तर दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज होऊया आणि कोणत्या दिवशी कशी तयारी करायची आहे, जाणून घेऊया.

Diwali 2020: From Vasubaras to Bhaubij, Find out the date, time, moment and features of Diwali | Diwali 2020: वसुबारस ते भाऊबीज, जाणून घ्या दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष

Diwali 2020: वसुबारस ते भाऊबीज, जाणून घ्या दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

दरवर्षी दिवाळीची सुटी मिळते, पण यंदा सुटीत दिवाळी आली आहे' समाजमाध्यमांवर ही पोस्ट वाचली आणि मागचे आठ महिने झरझर डोळ्यासमोरून गेले. त्यात थोडे नैराश्य होते, थोडा रिकामेपणा, थोडा आळस, थोडा कंटाळा. मात्र, अशातच आपला उत्साह वाढवण्यासाठी आणि आपल्याला दिलासा देण्यासाठी बाप्पा येऊन गेले, देवीनेही वातावरणात चैतन्य पसरवले आणि आता पुन्हा एकदा उत्सवाचा माहोल घेऊन दिवाळी हजर झाली आहे. एक-दोन नाही, तर पाच दिवसांचा हा सण. मात्र, तिचे वेध पंधरा दिवस आधी आणि तिची आठवण पंधरा दिवस नंतर मनात घोळत राहते. चला, तर दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज होऊया आणि कोणत्या दिवशी कशी तयारी करायची आहे, जाणून घेऊया.

वसुबारस : कार्तिक कृष्ण द्वादशीचा दिवस गोवत्स द्वादशी म्हणून साजरा केला जातो. त्यालाच आपण वसुबारस असेही म्हणतो. ११ नोव्हेंबर रोजी गुरुवारी रात्री १२ वाजून ४० मीनिटांनी द्वादशी सुरू होऊन १२ नोव्हेंबर रोजी ९ वाजून ३० मीनिटापर्यंत असणार आहे. त्यादिवशी गोमातेची आणि वासराची  पूजा करण्याचा मुहूर्त सायंकाळी ५.२९ ते रात्री ८. ७ मीनिटांपर्यंत असणार आहे.

हेही वाचा : Diwali 2020: लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...शंभर वर्षांपूर्वी दिवाळी कशी होती पहा

धनत्रयोदशी :  १३ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी धनत्रयोदशी आहे.  १२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून ३० मीनिटांनी त्रयोदशीची तिथी सुरू होणार असून १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.५९ मीनिटांपर्यंत असणार आहे. अकाली मृत्यू येऊ नये, म्हणून या दिवशी सायंकाळी घराबाहेर म्हणजे पूर्वीच्या प्रथेनुसार परसाकडे दीवा लावला जात असे. हा दीवा यमाला दान केला जात असे, म्हणून त्या विधीला यमदीपदान असे म्हणतात. या दिवशी धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त सायंकाळी ५.२८ मीनिटांनी सुरू होऊन ५.५९ मीनिटांपर्यंत असणार आहे. 

नरक चतुर्दशी : दिवाळीचा तिसरा दिवस, कार्तिक कृष्ण चतुर्दशी. मात्र इंग्रजी कॅलेंडरनुसार अनेकदा चतुर्दशी आणि अमावस्या तिथी एकत्र येते. त्यामुळे नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी केले जाते. यंदाही दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्या आहेत. परंतु त्यांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.५९ मीनिटांनी चतुर्दशी तिथी सुरू होणार असून १४ नोव्हेंबरला दुपारी २.१७ मीनिटांपर्यंत असणार आहे. हा दिवस नरक चतुर्दशीचा म्हणजेच अभ्यंग स्नानाचा, पहिल्या अंघोळीचा असणार आहे. नरकासूराचे प्रतीक म्हणून याच दिवशी पहाटे अंघोळ झाल्यावर कारिंटे पायाने फोडण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. 

लक्ष्मीपूजन : १४ आणि १५ नोव्हेंबरला अमावस्या आहे. ही  तिथी १४ नोव्हेंबरला दुपारी २ नंतर सुरू होऊन दुसऱ्या दिवशी १० वाजून ३६ मीनिटांपर्यंत असणार आहे. म्हणून १४ नोव्हेंबरला सायंकाळी लक्ष्मीपूजन करता येणार आहे. त्याच दिवशी दर्श अमावस्या तसेच शनि अमावस्या असणार आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजेबरोबरच शनिपूजादेखील लाभदायक ठरेल.

गोवर्धन पूजा : दिवाळीचा चौथा दिवस गोवर्धन पूजेसाठी तसेच अन्नकूट यासाठी राखीव ठेवलेला असतो. भगवान श्रीकृष्णांनी गोकुळावर आलेले नैसर्गिक संकट परतावून लावण्यासाठी आणि गोकुळवासियांचा अतिवृष्टीपासून बचाव करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. निसर्ग हाच आपला देव आहे, त्याची राखण करा, पूजन करा, सन्मान करा, हा संदेश भगवंतांनी आपल्या आचरणातून दिला होता. हे स्मरणात ठेवण्यासाठी दिवाळीच्या चौथ्या दिवशी गोवर्धनाची प्रतीकात्मक पूजा केली जाते. किंवा कृष्णाला दूध-सारखरेचा नैवेद्य दाखवला जातो आणि निसर्गाशी नाते जोडावे, म्हणून या दिवशी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गोमातापूजन केले जाते. गोरगरीबांना अन्न,धान्य,शिधा दिला जातो. 

भाऊबीज : दिवाळीचा शेवटचा पण महत्त्वाचा दिवस भाऊबीजेचा. त्यालाच यम द्वितीया असेही म्हणतात. ते यासाठी कारण, भाऊबीजेच्या दिवशी यमाची बहीण यमी हिने आपल्या भावाकडे समस्त भावांच्या प्राणांचे दान मागून घेतले होते. परंतु, हे दान सृष्टीनियमाविरूद्ध असल्याचे यमाने सांगितले. बहिणीचे मन मोडू नये, म्हणून यमराजाने भाऊबीजेच्या दिवशी शक्यतो भावा-बहिणीची ताटातूट होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. तेव्हापासून या सणाला यम द्वितीया असे देखील म्हटले जाऊ लागले. भाऊबीजेचा शुभमुहूर्त दुपारी १.१० मीनिटांनी सुरू होऊन  दुपारी ३. १८ मीनिटांपर्यंत असणार आहे.

हेही वाचा : Diwali 2020: शनि अमावस्येनिमित्त जाणून घ्या शनि महात्म्य आणि शनि महाराजांची उपासना!

Web Title: Diwali 2020: From Vasubaras to Bhaubij, Find out the date, time, moment and features of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी