Diwali 2021 : एरव्ही कोणत्याही अमावस्येला शुभ कार्य केले जात नाही; अपवाद लक्ष्मीपूजनाचा! का? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 12:44 PM2021-11-03T12:44:42+5:302021-11-03T12:45:23+5:30
Diwali 2021 : आपल्याही अंधारलेल्या आयुष्यात नवआशेचे, चैतन्याचे दीवे लावावेत व अंधारावर मात करत प्रयत्नपूर्वक लक्ष्मीकृपा प्राप्त करावी, हाच संदेश या सणातून मिळतो.
लक्ष्मीची पूजा आपण वर्षभर करतो. कारण तिच्या कृपेशिवाय आपला उदरनिर्वाह अशक्य आहे. सध्याचे जग तर प्रचंड व्यवहारी झाले आहे. इथे प्रत्येक जण लक्ष्मीचा उपासक आहे. असे असताना अश्विन कृष्ण अमावस्येची तिथी लक्ष्मीपूजेसाठी का योजली असावी ते जाणून घेऊ.
लक्ष्मीपूजेच्या तिथीमागची पौराणिक कथा -
राक्षस कुळात जन्माला आलेल्या बळीराजाला दानाचा कैफ होता. तो उतरवण्यासाठी व त्याच्या बंदिवासात बंदिस्त असलेल्या सज्जनांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि अश्विन कृष्ण अमावस्येला बळीराजाकडे तीन पावलं जमीन मागितली. वामनाच्या तीन पावलांनी त्रैलोक्य व्यापून टाकले. बळीराजाची मालमत्ता दानात त्याच्या हातून निसटून गेली. त्याचा कैफ उतरला. तो पाताळात गेला. त्यावेळेस भगवान विष्णूंनी आपली प्रिय पत्नी लक्ष्मी आणि अन्य देवतांची बळीराजाच्या बंदिवासातून सुटका केली. त्यावेळेस लक्ष्मी मातेचे सर्वांनी वाजत गाजत स्वागत केले व भगवान विष्णूंचे आभार मानले. तो सोहळा लक्ष्मी पूजन या नावे साजरा होऊ लागला.
दिवाळीत लक्ष्मी देवीचे कृपाशीर्वाद हवेत?; राशीनुसार ‘असे’ करा पूजन, होईल बरकत
लक्ष्मीपूजनाचा संदेश :
दिवाळी हा हिंदूंचा सण असला, तरी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सर्वांनाच असते. प्रत्येकजण आपापल्या परीने भक्तीपूर्वक लक्ष्मीपूजन करतो. व्यापारी मंडळी आजच्या दिवशी पूजेनंतर वर्षभराचा जमा खर्च लिहिण्याची वही पूजेत ठेवतात. त्याला चोपडी पूजन म्हणतात. इतर अमावस्या शुभ कार्यासाठी योग्य मानल्या जात नाहीत, अपवाद असतो लक्ष्मीपूजनाचा! आपल्याही अंधारलेल्या आयुष्यात नवआशेचे, चैतन्याचे दीवे लावावेत व अंधारावर मात करत प्रयत्नपूर्वक लक्ष्मीकृपा प्राप्त करावी, हाच संदेश या सणातून मिळतो.