Diwali 2021 : मालिकांमध्ये दाखवतात तेवढे सासू सुनेचे नाते वाईट नसतेच मुळी; वाचा वसुबारसेची सासू सुनेची कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 06:25 PM2021-10-28T18:25:23+5:302021-10-28T18:26:57+5:30
Vasu baras 2021 : कथेतील आदर्श ठेवून घराघरातील सासू सुनेचे नाते बहरले, तर खऱ्या अर्थाने वसुबारसेची कथा सुफळ संपूर्ण होईल, नाही का?
सासू सुनेचे नाते म्हणजे विळी भोपळ्याचे नाते, असा समज-गैरसमज समाजात पसरलेला आहे. विशेषत: मालिकांमध्ये सासू सुना एकमेकींच्या जीवावर उठलेल्या दाखवल्या जातात. परंतु वास्तवात अशी अनेक कुटुंबं आढळतील, जिथे सासू सुनांमध्ये मायलेकीसारखे दृढ नाते निर्माण होते. अगदी तसेच नाही, तर किमान ऋणानुबंध जुळतो हे निश्चित! नव्या सुनेच्या चूका पदरात घेणारी आणि तिच्या वतीने देवाकडे क्षमा मागणारी सासू वसुबारसेच्या कथेत आढळते.
आटपाट नगर होतं. तिथे एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होती. ढोरं, म्हशी होत्या. गव्हाळी, मुगाळी, वासरं होती. एके दिवशी काय झाले, अश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली. शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, 'मुली, इकडे ये!'
सून आली. काय, असे विचारती झाली. तशी म्हातारी म्हणाली, `मी शेतावर जाते. दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे, मुगाचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव.' असे सांगून ती निघून गेली.
सून नवीन होती. वयाने लहान होती. माडीवर गेली. गहू, मूग काढून ठेवले. पण त्यालाच गव्हाळी, मुगाळी म्हणतात हे तिला माहीत नव्हते. ती खाली आली. गोठ्यात गेली, गव्हाळी, मुगाळी वासरं उड्या मारत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली.
दुपार झाली. तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासुने पाहिले. तांबडे मास दृष्टीस पडले. तिने आश्चर्याने विचारले, 'हे काय?'
सुनेने सांगितले. सासू घाबरली. गैरसमजातून चूक घडली. म्हणून ती तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली, 'देवा, देवा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला. तिला याची क्षमा कर. गाईची वासरं जीवंत कर. असे झाले नाही तर संध्याकाळी मी आपले प्राण देईन.'
म्हातारी देवापाशी बसून राहिली. देवाने तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंत:करण पाहिले. संध्याकाळी गायी आल्या. हंबरडा फोडू लागल्या. तशी म्हातारी व्याकुळ झाली. देवाचा धावा करू लागली. गायींचा आक्रोश आणि म्हातारीचा दृढनिश्चय पाहून देवाने वासरांना जीवंत केले. ती उड्या मारत गायीजवळ गेली.
सुनेला आश्चर्य वाटले. म्हातारीने देवाचे आभार मानले. म्हातारीने गाय वासरांची पूजा केली. त्यांना स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. सुनेने गाय-वासराची आणि सासुची व देवाची क्षमा मागितली. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवब्राह्मणांचे द्वारी, पिंपळाच्या पारी, गाईच्या गोठी सुफळ संपूर्ण!
हाच आदर्श ठेवून घराघरातील सासू सुनेचे नाते बहरले, तर खऱ्या अर्थाने वसुबारसेची कथा सुफळ संपूर्ण होईल, नाही का?